Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'प्राध्यापकाने बाथरुममध्ये नेलं, नंतर गुप्तांगाला...,' 500 विद्यार्थिनींची थेट PM मोदींकडे तक्रार; म्हणाल्या 'तो फार...'

'प्राध्यापकाने बाथरुममध्ये नेलं, नंतर गुप्तांगाला...,' 500 विद्यार्थिनींची थेट PM मोदींकडे तक्रार; म्हणाल्या 'तो फार...'


हरियाणाच्या सिरसा येथे प्राध्यापकाकडून तब्बल 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलींनी याविरोधात आवाज उठवला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. हा सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकाला निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे.

पत्राच्या प्रती कुलगुरू डॉ. अजमेर सिंग मलिक, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, तसेच वरिष्ठ राज्य सरकारी अधिकारी आणि निवडक माध्यम संस्थांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या पत्रातून प्राध्यापकावर घाणेरडे आणि अश्लील कृत्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रात करण्यात आलेल्या आरोपांनुसार, तो मुलींना कार्यालयात बोलवायचा, यानंतर बाथरुममध्ये नेऊन त्याच्या गुप्तांगाला हात लावून अश्लील कृत्य करत असे. आपण विरोध केला असता याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचाही मुलींचा आरोप आहे. 


पत्रात दावा करण्यात आला आहे की, गेले अनेक महिने हा प्रकार सुरु आहे. आरोपी प्राध्यापकाने आपली एक चांगली प्रतिमा तयार केली आहे. संबंधित प्राध्यापकाला यासंबंधी कधीच जाब विचारण्यात आला नाही. पोलिसांनी याप्रकरणी विशेष तपास समिती तपास करणार असल्याचं सांगितलं आहे. "आयपीएस अधिकारी दिप्ती गार्ग यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आम्ही अनेकांचे जबाब नोंदवले आहेत," अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकांत जाधव यांनी दिली आहे. एसआयटी विद्यापीठात गेली असून, तिथेही जबाब नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 

मुलींनी आरोप केला आहे की, कुलगुरुंनी आमची मदत करण्याऐवजी कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली. कारण या प्राध्यापकाच्या राजकारणात ओळखी आहेत. दरम्यान कुलगुरुंनी हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न केला. मुलींना चांगले मार्क देण्याचं आमिष दाखवत त्यांनी हा प्रयत्न केला. 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेश कुमार बन्सल यांनी निनावी पत्र मिळाल्याची पुष्टी केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. विद्यापीठाची स्वत:ची समिती या आरोपांचा तपास करत आहे. हे गंभीर आरोप आहेत. पत्रात कोणाचंही नाव नाही, मात्र आम्ही तपास करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.

"याप्रकरणी आम्ही नंतर कारवाई करणार आहोत. जो दोषी असेल त्यांना सोडणार नाही. पण जर कोणी दोषी नसेल तर उगाच त्यांची बदनामी करु नये," असं कुलसचिवांनी सांगितलं. डॉक्टर बन्सल यांनी संबंधित सीसीटीव्ही पोलिसांकडे सोपवलं असल्याचं सांगितलं आहे. पण पत्रात प्राध्यापकाने आधीच सर्व सीसीटीव्ही डिलीट केले असल्याचा आरोप केला आहे.

पत्रात मुलींनी कुटुंबियांची बदनामी होण्याच्या भीतीने त्यांची ओळख उघड केलेली नाही. जोपर्यंत विद्यापीठावर लोकांकडून दबाव टाकला जात नाही तोपर्यंत तोपर्यंत त्यांना प्राध्यापकावर कारवाईची अपेक्षा नाही असं मुलींनी म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

सिरसाच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी दीप्ती गर्ग यांनी सांगितलं की, तपास सुरू आहे आणि काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपी प्राध्यापकाचीदेखील चौकशी करण्यात आली आहे, सुश्री गर्ग म्हणाल्या की, प्राथमिक चौकशीत पुरेसे पुरावे आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.