Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अदानीकडून धारावीकरांची घोर फसवणूक, 500 नव्हे 350 फुटांचे घर

अदानीकडून धारावीकरांची घोर फसवणूक, 500 नव्हे 350 फुटांचे घर

टीडीआर घोटाळा करून धारावी पुनर्विकास प्रकल्प मिंधे सरकारने अदानीच्या घशात घातल्यानंतर आता अदानी समूहाचे मनसुबे उघड होऊ लागले आहेत. धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर मिळालेच पाहिजे, अशी स्थानिकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका आहे. मात्र, धारावीकरांना 350 चौरस फुटांचे घर देणार, असे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने आज सांगितले.

पुनर्विकासात धारावीमधील पात्र रहिवाशांना 350 चौरस फूट आकाराची सदनिका मिळेल. धारावीतील घराचे हे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 17 टक्के अधिक आहे, असा दावा कंपनीने केला आहे. 1 जानेवारी 2000 च्या आधीच्या सदनिका पात्र असतील. त्यानंतरच्या सदनिका अपात्र गटात येतील. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार प्रस्तावित, परवडणाऱया भाडय़ाच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत त्यांचे नव धारावीमध्ये पुनर्वसन करण्यात येईल, असे कंपनीने नमूद केले.

एक इंचही कमी जागा घेणार नाही; धारावीकर आक्रमक

अदानीसाठी धारावीला केंद्र आणि राज्य सरकारने विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. एफएसआय आणि टीडीआर देऊन सवलतींचा वर्षाव केला आहे. मात्र, या पुनर्विकासात सरकारने गरीब आणि कष्टकऱयांच्या फायद्याचा जराही विचार केलेला नाही. ही धारावीकरांची फसवणूक आहे, असे सांगताना धारावीकर 500 चौरस फुटांपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाहीत, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे सदस्य, शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी आज दिला.

मुंबईतील उद्योग-रोजगाराचे प्रमुख केंद्र असलेली धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली 'अदानी'च्या घशात घालण्याचा डाव केंद्र आणि राज्यातील मिंधे सरकारने आखला आहे. मात्र, याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह 15 हून अधिक राजकीय पक्ष, संघटना, संस्थांसह धारावीकरांचा विरोध आहे. त्यात वाढीव एफएसआय, टीडीआर देऊन सरकारने अदानीच्या पायावर पूर्णपणे लोटांगण घातले आहे. असे असताना अदानी समूह आणि धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने धारावीकरांना केवळ 350 चौरस फुटांचे घर देण्याचे जाहीर करून संतापाच्या आगीत तेल ओतले आहे. दरम्यान, धारावी बचाव आंदोलनातील सदस्यांनी पुढील रणनीतीसाठी आज बैठक घेतली. धारावी पूर्णपणे बंद करून सरकारला आम्ही उत्तर देऊ, अशी भूमिका समन्वयक राजेंद्र कोरडे, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे, संजय भालेराव, उल्लेश गजाकोश, संदीप कटके, विनोद जैसवाल, अनिल कासारे, श्यामलाल जैसवाल, कैलाश जैसवाल, माजी नगरसेवक वसंत नकाशे, पी. एम. जगदीश, मरियम्मल तेवर यांनी घेतली आहे.



…तर एक लाख लोकांना सहज घरे मिळतील

धारावीची एकूण जमीन 650 एकर आहे. त्यातील 300 एकर जमिनीवर धारावीकरांना 500 चौरस फुटांची घरे बांधून दिली तरी एक लाख लोकांना सहज घरे उपलब्ध होणार आहे. मात्र, सरकार गरीब आणि कष्टक-यांच्या फायद्याचा विचार करत नाही तर अदानीच्या फायद्यासाठी झटत आहे. सरकारने ठरवले तर सरकार अगदी सहज प्रत्येक धारावीकराला 500 फुटांचे घर देऊ शकेल, असे धारावी बचाव आंदोलनाचे सदस्य आणि शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी सांगितले.

आमची लढाई सुरूच राहील

पात्र-अपात्र हा मुद्दा नाहीच. आम्हाला एसआरएप्रमाणे 350 चौरस फुटांचे घर देत असाल तर मग अदानीला एवढा एफएसआय का वाढवून दिला आहे. त्यालाही एसआरएचा नियम लागू करा. धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे. आम्ही अदानीला धारावीत पाय ठेवू देणार नाही, धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर मिळेपर्यंत आमची लढाई सुरू राहणार आहे, अशी भूमिका धारावी बचाव आंदोलनाच्या सदस्यांनी घेतली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.