Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

19 वर्षीय गर्भवती रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली

19 वर्षीय गर्भवती रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. गर्भवती असलेल्या प्रेयसीनं गर्भपात करावा यासाठी तिच्यावर दबाव आणणाऱ्या प्रियकरानं तिच्यावर जीवघेणा हल्ला करत हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पीडित युवती गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पूर्व दिल्लीतील मयूर विहार परिसरात एक गर्भवती युवती जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी युवतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवतीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत होता, पण युवती त्यासाठी तयार नव्हती म्हणून त्याने हे कृत्य केलं.

पोलिसांनी शनिवारी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, ``योगेश देढा (वय 21) असं आरोपीचं नाव आहे. त्याने युवतीवर स्क्रू ड्रायव्हर, ब्लेड आणि दगडांनी हल्ला केला. आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं.`` ``आरोपीनं युवतीवर अनेकदा वार केले आणि ब्लेडनं तिचा गळा चिरला. तिचा चेहरा ओळखू येऊ नये यासाठी तिच्या चेहऱ्यावर विटांचे घाव घालण्यात आले, `` असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. गुरुवारी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अन्वये (हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ``एका आयुर्वेद क्लिनिकमध्ये काम करणारी युवती गुरुवारी सकाळी चिल्ला गावातील अग्निशमन सेवा केंद्राजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. सध्या ती लोकनायक रुग्णालयात दाखल असून ती सध्या मृत्युशी झुंज देत आहे. ती व्हेंटिलेटर आहे. `` पूर्व दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अचिन गर्ग यांनी या प्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले की, ``योगेश देढा हा चिल्ला गावचा रहिवासी आहे. युवती मृत झाली असं समजून तो तिला घटनास्थळावर सोडून निघून गेला. ``


दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ``पीडित युवती आणि योगेश हे एकाच परिसरात राहतात. ते गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघं गेल्या तीन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. युवतीनं ती गर्भवती असून लवकरच त्याच्या बाळाला जन्म देणार आहे, असं योगेशला सांगताच त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर योगशने पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तो तिला गर्भपातासाठी काही गोळ्या देत होता. पण युवतीनं योगशचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या योगेशनं बुधवारी रात्री युवती घरी परतत असताना तिच्यावर हल्ला केला.``

गर्ग म्हणाले की, ``घटनेच्या दिवशी युवती न्यू अशोक नगर मेट्रो स्टेशनबाहेर योगेशला भेटली आणि परत घरी निघाली. त्यानंतर दोघं चिल्ला येथील अग्निशमन सेवा कार्यालयाजवळच्या एका बागेत गेले. तिथं काही वेळ बसले. त्यावेळी योगशने पुन्हा गर्भपात करण्यासाठी युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेनं नकार दिल्यानं आरोपीनं तिच्यावर स्क्रू ड्रायव्हर आणि ब्लेडनं वार केले.``

``आरोपी हत्येचं नियोजन करून युवतीला भेटायला आला होता. कारण त्याच्याकडे स्क्रू ड्रायव्हर आणि ब्लेड होतं. योगेशनं पीडितेचा मोबाइल फोन आणि सिमकार्ड नष्ट केलं. हल्ल्यानंतर ती मृत झाली असं समजून तो घटनास्थळावरून फरार झाला,``असं गर्ग यांनी स्पष्ट केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ``तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शनिवारी योगेशला अटक केली आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.``


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.