सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांची ५.८५ कोटी तर पुण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची ३.५९ कोटींची अपसंपदालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सोलापूर, पुण्यात चौघांवर गुन्हा
मुंबई : लाच घेताना सापडलेल्या सोलापूर आणि पुण्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची कोट्यवधी रूपयांची अपसंपदा असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सोलापूर येथील सदर बझार पोलिस ठाणे तर पिंपरी-चिंचवड येथील सांगवी पोलिस ठाण्यात एकूण चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात कोट्यवधीचे घबाड सापडल्याने राज्यातील जिल्हा परिषदांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोलापूर येथील जिल्हा परिषदेकडील तत्कालीन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण आनंद लोहार (वय ५०), त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४), मुलगा निखील किरण लोहार (वय २५, सर्व रा. आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहार यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जमवलेल्या अपसंपदेबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी याबाबत तपास केला.
लोहार कुटुंबियांच्या दि. १५ नोव्हेंबर १९९३ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीत भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या तसेच कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अपसंपदेचे परीक्षण केले. त्यामध्ये त्यांनी ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रूपयांची अपसंपदा जमवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार भ्रष्टाचार अधिनियम १९८८ चे कलम १३(१) (ई), १३ (२), सहकलम भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिय सन २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) नुसार सोलापूर येथील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडील माध्यमिक विभागाकडील तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम नामदेव सुपे (वय ५९, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जमवलेल्या अपसंपदेबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याबाबत तपास केला.सुपे यांच्या १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या तसेच कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अपसंपदेचे परीक्षण केले. त्यामध्ये त्यांनी ३ कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रूपयांची अपसंपदा जमवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार भ्रष्टाचार अधिनियम १९८८ चे कलम १३(१) (ई), १३ (२), सहकलम भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिय सन २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) नुसार पिंपरी-चिंचवड येथील सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.