Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरे अदानींच्या खासगी विमानाचा वापर फुकट करतात; मोहित कंबोज यांचा आरोप

उद्धव ठाकरे अदानींच्या खासगी विमानाचा वापर फुकट करतात; मोहित कंबोज यांचा आरोप

मुंबई: धारावी प्रकल्पाविरोधात ठाकरे गटानं काढलेल्या मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानींना सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीवर टीका केली. त्यावरून आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत धारावीचा विकास करणे, टेंडर काढणे यावर विशेष रस दाखवला आणि आता यु टर्न घेत मोर्चा काढला यामागचे रहस्य काय हे सांगा. कालपर्यंत गौतम अदानी तुमचे मित्र होते, एकमेकांच्या घरी जात होता. आता विरोधक का झालात असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे.

मोहित कंबोज म्हणाले की, गौतम अदानींसोबत तुमचे संबंध काय हे देशाला कळू द्या, तुम्हाला जेव्हा विमान हवं असते, एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा तुम्ही अदानींचा फायदा उचलता आणि आज मुंबईच्या विकासाची गोष्ट आली तर तुम्ही रस्त्यावर उतरला. २१ फेब्रुवारी २०२० मध्ये अदानींच्या खासगी विमानानं मुंबई ते दिल्ली असा प्रवास तुम्ही केला. त्याचे पेमेंटही करत नाही. आदित्य ठाकरे अनेकदा अदानींच्या विमानाचा वापर करतात. ठाकरे कुटुंबाने बऱ्याचदा अदानींच्या खासगी विमानांचा आणि अनेक गोष्टींचा फायदा उचलतात असं त्यांनी म्हटलं.


तसेच आता धारावी प्रकल्पाला विरोध करत तुम्हाला कटकमिशन हवं, वसुली हवी. मातोश्री ३ बनवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलली. गौतम अदानींच्या विमानांचा वापर केला पण तुम्ही कधी त्याचे पेमेंट दिले नाही. तुमच्या कुर्त्याला खिशा नाही. तुम्ही मुंबईला लुटले आणि आता तुमच्या मनात काय हे देशासमोर येऊ द्या असं मोहित कंबोज यांनी टोला लगावला. याआधीही कंबोज यांनी धारावीच्या नावावर अदानींकडून उद्धव ठाकरेंना वसुली करायची आहे. दुबईत एक हॉटेल खरेदी केले असून त्याची डील काही महिन्यांपूर्वी छोट्या ठाकरेंनी केल्याचा दावा केला.

उद्धव ठाकरेंनी केली होती टीका

धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट देतानाच अदानी समूहाकडे टीडीआरचे हक्क जाणार आहेत. भविष्यात ज्यांना टीडीआर हवा असेल त्यांना अदानी समूहाकडूनच तो विकत घ्यावा लागेल. महायुती सरकारचा हा जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. अभ्युदय नगर, देवनार, धारावी, मिठागरे, विमानतळ, मोतीलाल नगर, आदर्श नगर आणि टीडीआर. सगळ्याच गोष्टी अदानींना द्यायच्या असतील तर उद्या हे लोक मुंबई महाराष्ट्रापासून तोडतील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते होऊ देणार नाही. धारावीचा विकास बीडीडी चाळीसारखा सरकारने स्वतः केला पाहिजे. धारावीकरांना ५०० स्क्वेअर फुटांचे घर मिळालेच पाहिजे अशी मागणी ठाकरेंनी केली.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.