बिहारमधील संपूर्ण एक गावच दरोडेखोरांचे! सुबोध सिंगचा देशभरातील दरोड्यात सहभाग? कसून चौकशी; रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण
मार्केट यार्ड परिसरात 'रिलायन्स ज्वेल्स' या सराफी दुकानावर भरदुपारी घातलेल्या दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार सुबोध सिंग (रा. चिश्तीपुर, जि. नालंदा, बिहार) याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या साथीदारांची मोठी टोळी सक्रीय आहे. काही संशयितांची नावेही समोर आल्याचे समजते. द्रम्यान, देशभरातील दरोड्यात सुबोध सिंगचा सहभाग आहे का, या अनुषंगाने तपास सुरू आहे. तसेच बिहारमधील संपूर्ण एक गाव दरोडेखोरांचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.
सहा महिन्यापुर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर नियोजनबद्धरीत्या दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून, गोळीबार करत पावणे सात कोटींचे दागिने, रोकड, काही मोबाईल घेऊन पलायन केले होते.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची गतिमान यंत्रणा सुरू केली. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार, कुख्यात द्रोडेखौर सुबोध सिंग याचे नाव तपासात समोर आले. तो सध्या पॉटणा येथील आदर्श सेंट्रल जेलमध्ये असल्याची माहिती पथकास मिळाली. तेथील पोलिसांच्या सहकार्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.
तो कारागृहातून टोळीचे नियंत्रण ठेवत होता. त्यामुळेच देशभरातील रिलायन्स ज्वेल्सवर तसेच अन्य वित्तीय संस्था, सराफी दुकाने यावर पडलेल्या दरोड्यात याच टोळीचा सहभाग आहे का? या अनुषंगाने तपास सुरू आहे. विशेष कोठडीत त्याची कसून चौकशी केली जात आहेत. तसेच बिहारमधील संपूर्ण एक गाव दरोडेखोरांचेच असून ते नेपाळ सीमेवर असल्याची माहिती पोलिस सुत्रांना मिळाली. त्या अनुषंगानेही खात्री केली जात आहे. साऱ्या माहिती खात्री आणि चौकशी करण्यासाठी यापुर्वीच विश्रामबाग आणि एलसीबीचे पथक बिहारमध्ये तळ ठौकून आहे.पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करत आहेत. दरम्यान सुबोध सिंग याच्याकडील चौकशीतुन महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यातील गुन्हे उघडकीस येऊ शकतात असे सूत्रानी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.