Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत संजयकाका पाटील यांची मतदार संघात जुळवाजुळव सुरू केली


सागंली : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास अद्याप वेळ असताना त्यानंतर होणार्‍या विधानसभेसाठी जत विधानसभा मतदार संघात नेतेमंडळींनी मशागत सुरू केली आहे. विशेषत: भाजपमध्ये उमेदवारीसाठीची आतापासूनच चुरस लागलेली असताना भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी माडग्याळ कालव्यातील म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा पूजन करीत असताना या योजनेचे श्रेय सर्वच राजकीय नेत्यांचे असल्याचे सांगत मतभेदांची दरी सांधण्याचा प्रयत्न चालविला आहे.


काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सोबत घेउन न बोलावता माजी आमदार विलासराव जगताप यांच्या घरी चहापाण्यासाठी जाउन दिलजमाई झाल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात यामध्ये फारसे तथ्य सध्या तरी दिसत नाही. तर दुसर्‍या बाजूला जतसाठी २५ कोटींचा निधी आणल्याचे भांडवल करून आमदार पडळकर यांची मतदार संघात साखरपेरणी सुरू असली तरी उपरा आणि स्थानिक असा वाद धुमसू लागला आहे.

जत हा राजकीय नेत्यांसाठी सुरक्षित मतदार संघ असल्याचे विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पहिल्यांदा निवडला. त्यात त्यांना यशही आले. मात्र, जतचे आरक्षण वगळताच त्यांनी मिरज मतदार संघ गाठला. प्रकाश शेंडगे यांनीही कवठेमहांंकाळ मतदार संघ सोडून जतचे प्रतिनिधीत्व केले. या मतदार संघामध्ये जगताप यांचा हक्काचा मतदार असल्याने त्यांची राजकीय ताकद प्रत्येकवेळी विचारात घेतली जातेच, गत निवडणुकीमध्ये याच जगतापांचा पराभव काँग्रेसच्या सावंत यांनी करीत आश्‍चर्याचा धक्का दिला. मात्र, आपल्या पराभवाला केवळ आणि केवळ भाजपचे खासदार संजयकाका पाटील हेच जबाबदार असल्याचा जाहीर आरोप करून जगताप यांनी राळ उडवली होती.


आता जतचे गेल्या चार दशकाचे राजकारण हे म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर शिजत आले आहे.यामुळे माडग्याळ कालव्यातील पाण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेतेमंडळी करणार हे स्पष्ट असताना खासदार पाटील यांनी याचे श्रेय सर्वच राजकीय नेत्यांना असल्याचे सांगत सर्वच नेत्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातून त्यांना केवळ खासदारकीची निवडणूक पार पाडण्याची मनिषा दिसून येते. जगताप यांनी न बोलावता त्यांच्या घरी चहाला जाउन संबंध सुधारले असल्याचा संदेश देत असताना आमदार पडळकर, आमदार सावंत यांना सोबत घेउन टी डिप्लोमासी साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, जाहीर भाषणात जगताप यांनी जत मतदार संघातील सर्वच इच्छुक आमदारांना आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगत दिलजमाईची डिप्लोमासी आपण गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत इच्छुकांच्या मनात धास्ती कायम ठेवली आहे.

आमदार पडळकर यांनीही गेल्या सहा महिन्यापासून जतवर लक्ष केंद्रित केले आहे. जतचे प्रश्‍न सभागृहात मांडण्याबरोबरच विकास कामासाठी आमदार निधीही उपलब्ध करून दिला आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात जतसाठी २५ कोटींचा निधी आपण मंजूर केल्याचा गाजावाजा सध्या केला जात असून याचे फलकही गावोगावी लावण्यात आले आहेत. मात्र, जतची स्वाभिमानी जनता उपरा उमेदवार मान्य करणार का हाही महत्वाचा मुद्दा आहे.मतदार संघातील धनगर समाजाचे मतदान लक्षात घेउन आमदार पडळकर यांची साखर पेरणी सुरू असली तरी हा हस्तक्षेप मतदारांना मान्य होण्यासारखा दिसत नाही. 

कारण जतच्या पूर्व भागातील ४८ गावांसाठी मंजूर करण्यात आलेली सुधारित म्हैसाळ योजना पूर्णत्वासाठी कोणी काय केले, काय करणार हेही महत्वाचे ठरणार आहे. रस्ते, चौक सुधारणा, गटारी ही कामे मंजूर केली म्हणजे मतदार संघाचा विकास झाला असे म्हणता येणार नाही. विकासासाठी पायाभूत सुविधा देण्याबरोबरच पुढच्या पिढीला आश्‍वासक वाटणारा कृषी विकास होणे महत्वाचे आहे. तरूणांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार संधी निर्माण करणारा औद्योगिक विकास किती केला यावर मूल्यमापन होणार आहे
मतदार संघात लोकसभेची निवडणुकीपासूनच विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू असून काँग्रेसमध्ये आमदार सावंत यांच्या उमेदवारीला कोणी आव्हान दिलेले नसले तरी भाजपमध्ये मात्र उमेदवारीची लढाई अधिक तीव्र स्वरूपात राहणार आहे. माजी आमदार जगताप, यांच्याबरोबरच आमदार पडळकर, भाजपचे प्रचार प्रमुख तमणगोडा रवि पाटील यांची यासाठीची मोर्चेबांधणी सुरू आहे. मतदार संघात स्थानिक विरूध्द उपरा असा सुरू झालेला सुप्त संघर्ष लोकसभेनंतर तीव्र स्वरूपात राजकीय पटलावर येण्याची चिन्हे आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.