Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरांना गुन्हेगार मानले जाणार नाही!

डॉक्टरांना गुन्हेगार मानले जाणार नाही!


कोणताही डॉक्टर रुग्णावर उपचार करताना त्याच्या मनात गुन्हेगारी हेतू नसतोच, या दृष्टिकोनाचा आयएमए नेहमीच पुरस्कार करित आलेली आहे. जोपर्यंत हानी पोहोचवण्याचा उद्देशच नसेल तोपर्यंत, वैद्यकीय अपघात किंवा अगदी निष्काळजीपणादेखील गुन्ह्याच्या मापदंडांना कसा पात्र होईल?

जर वैद्यकीय व्यवसाय, अपघात किंवा निष्काळजीपणा या गुन्हयाच्या व्याख्येत बसत नसेल तर डॉक्टरांवर फौजदारी खटला चालवणे म्हणजे अतार्किक कारवाई होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले की, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास तो खून मानला जात असे आणि त्यांना शिक्षा केली जात असे. आम्ही एक दुरुस्ती आणणार आहोत, ज्यात डॉक्टरांना यातून मुक्तता किंवा सूट देण्यात येणार आहे, त्यासाठी इंडिअन मेडिकल असोसिएशननै (आयएमए) विनंती केली होती, असे आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी सांगितले.

एकोणिसाव्या शतकातील वसाहतवादी कायद्याने होणारा अन्याय केंद्र सरकारने भारतीय न्यायसंहितेमध्ये गुन्हेगारीच्या सीमा नव्याने परिभाषित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भारतीय संसद या शतकानुशतके जुन्या अन्यायातून मुक्ती देणारा इतिहास घडवू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लॉर्ड डेनिंग यांनी म्हटल्याप्रमाणे या कायद्याने देशातील डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या डोक्यावर सतत कारवाईची टांगती तलवार असल्याच्या दडपणाखाली रुग्णावर उपचार करतील ते दडपण आता दूर होण्याच्या मार्गावर आहे, असे त्यांनी सांगितले.

या देशातील डॉक्टरांच्या दुर्दशेविषयी त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. किंबहुना, वैद्यकीय समाजाला वसाहतवादी कायद्याच्या जाचक साखळीतून मुक्त झाल्यासारखे वाटेल. या निर्णयाचे परिणाम दूरगामी आणि रुग्णाच्या हितासाठी असतील. डॉक्टर पुन्हा एकदा गंभीर क्षणी, सर्वशक्तीनिशी, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धोका पत्करण्यास मोकळे होतील. वैद्यकीय व्यावसायिक सहेतुक हानी पोहोचवण्याच्या विरोधातच काम करतात. या ऐतिहासिक निर्णयाचा परिणाम सीमांच्या पलीकडे जाईल आणि डॉक्टरांना गुन्हेगार म्हणून वागवण्याची पद्धत बदलेल, असेही ठाकरे म्हणाले.

आयएमएने गेल्या काही वर्षात घेतलेल्या तत्वनिष्ठ भूमिकेला न्याय मिळाला आहे. आयएमए देशाच्या सेवेसाठी नेहमीच कटिबध्द आहे. कोविडची लढाई आयएमए आणि भारतातील वैद्यकीय समुदायाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढली. भारत सरकारने मंजूर केलेल्या आणि भारतात उत्पादित केलेल्या कोविड लसींनी भारतातील साथीच्या रोगाचा प्रसार थोपवला. तद्वतच एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी आयएमए भारत सरकारसोबत कायमच होती, आहे आणि असेल, असे उद्गार आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी काढले. त्यावेळी उपाध्यक्ष डॉ. अनिल आव्हाड देखील उपस्थित होते. भारतातील वैद्यकीय व्यवसायासाठी होऊ घातलेल्या क्रांतिकारी बदलाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आयएमए महाराष्ट्र राज्याचे सचीव डॉ. सौरभ संजानवाला यांनी आभार मानले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.