Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोने तस्करांना मदत करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्याला अटक, सव्वा दोन कोटींचं सोनं ताब्यात

सोने तस्करांना मदत करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्याला अटक, सव्वा दोन कोटींचं सोनं ताब्यात

मुंबई: सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. सोन तस्करांना मदत करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. मंगळवारी ही कारवाई झाली. अधिकाऱ्यांनी आरोपीकडून सोन्याचे 33 लगड जप्त केले असून त्याचे वजन सुमारे पावणेचार किलो असल्याचं समजतं. या सोन्याची किंमत तब्बल सव्वा दोन कोटी रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली. या मोठ्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्यांना पकडण्याची कारवाई बऱ्याच काळापासून सुरू असून त्यात आता विमानतळ कर्मचाऱ्याचाच समावेश असल्याचे समोर आले आहे. कुंपणानेच शेत खाल्याचा हा प्रकार असून यामुळे मोठा गदारोळ माजला आहे.

गेल्या 15 दिवसांत 10 वेळा तस्करीत केली मदत

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे अनेक प्रकार गेल्या अनेक काही महिन्यात उघडकीस आले. याच तस्करांना मदत करणाऱ्या आरोपीला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अक्षय कुळे असे आरोपीचे नाव असून तो विमातळावर काम करतो. त्याने गेल्या 15 दिवसांमध्ये किमान 10 वेळा तरी सोन्याच्या तस्करीसाठी मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.


संशयाच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अक्षय याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे काळ्या रंगाच्या पाकिटामध्ये काही वस्तू सापडली. ती पाकिटे उघडून सखोल तपासणी केली असता त्यात दोन मोबाईल कव्हर्स होती आणि त्या दोन्ही कव्हर्समध्ये अनुक्रमे 17 आणि 16 असे पिवळ्या रंगाचे धातू सापडले. त्यांची तपासणी करण्यात आली असता, ते सोनं असल्याचे निष्पन्न झालं.

आरोपी कुळे याच्याकडे सोन्याच्या एकूण 33लगड सापडल्या असून त्याचे वजन 3 हजार 845 ग्रॅम आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2 कोटी 14 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अक्षयला अटक करण्यात आली. आरोपी अक्षय हा विरारमधील मनवेलपाडा येथील रहिवासी आहे. त्याची तौकशी केली असता अक्षय याने गेल्या 15 दिवसांमध्ये किमान 10 वेळा अशा पद्धतीने सोन्याच्या तस्करीत मदत केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यासंदर्भात सीमाशुल्क विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहे.

याप्रकरणामध्ये अन्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का? याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करीत आहे. तसेच आरोपी विमानतळावर कोणकोणत्या विभागात कार्यरत होता, याबाबतची माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.