Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काळाच्या कराळ जबड्यात...- मधुकर भावे



काळाच्या कराळ जबड्यात...
- मधुकर भावे

२४ तासांनंतर २०२३ हे वर्षे  काळाच्या कराळ जबड्यात गडप होणार....  इसवीसन सुरू झाल्यापासून तब्बल २०२३ वर्षे झाली.... आणि बघता-बघता ती काळाच्या जबड्यात फस्त झाली. काळ किती वेगाने पुढे सरकत असतो... २०२३ पूर्वी काय स्थिती असेल? आज जी स्थिती आहे ती ४०४६ साली म्हणजे बरोबर दुप्पट वर्षांनंतर काय असेल... सगळे कल्पनेच्या पलिकडचे विषय आहेत. २००० वर्षांपूर्वी पृथ्वी आणि त्यावरील माणूस...  इतिहास आणि संशोधनात पाषाण युगापासून काही माहिती आहे. शालिवहन शक सुरू झाले ते इसवीसन ७८ मध्ये. म्हणजे इसवीसनापूर्वी वर्ष गणती व्यवस्थाच नव्हती. कोणीतरी शहाण्या माणसाने वर्ष सुरू केले. १२ महिन्यांचे वर्ष ठरले. महिन्याचे कधी ३० दिवस तर कधी ३१ दिवस ठरले. तर चार वर्षांनी एका महिन्याचे २८ असे दिवस ठरले.... हे सगळे गणित ज्यांनी कोणी बसवले असेल तो केवढा मोठा गणितीशास्त्रज्ञा.... १२ तासांचा दिवस, ६० मिनिटांचा तास आणि ६० सेकंदांचे मिनीट... आज हे सगळे विषय सोपे वाटतात...  २०२३ वर्षांपूर्वी, पहिले साल सुरू करताना ज्यांच्या डोक्यातून हा सगळा गणिती विषय आला असेल, ज्याने हे गणित मांडले असेल, त्याच्या मेंदूची आणि बुद्धीमत्तेची काय कल्पना करता येईल...  त्यावेळचे ज्याला ‘जग’ म्हणता येईल असे त्या गावापुरतेच होते... हे अफाट ब्रह्मांड कोणाला माहितीही नव्हते... फार पूर्वीचे कशाला... अगदी ५०-१०० वर्षांपूर्वी गावात घडलेली गोष्ट दुसऱ्या गावात समजायला आठ दिवस लागत होते. भाऊच्या धक्क्यावरून रेवस बंदराकरिता सुटणारी रामदास बोट १७ जुलै १९४७ ला बुडाली... ६२५ प्रवाशांचा मृत्यू झाला. ती बातमी माझ्या रोहे या गावात समजायला २४ तास लागले. आमच्याच गावातील १० जण त्यात बुडून मृत्यू पावले. त्यांच्या घरी बातमी समजायला ४८ तास लागले. पोस्टमनची वाट बघत बसणे, हे त्यावेळी िकती उत्सुकतेचे होते. 


आपण ५०-१०० वर्षांचा विचार करू शकतो... माहिती मिळवू शकतो... २००० वर्षांपूर्वी काय असेल परिस्थिती....  आज माणसाचे डोके काम करणार नाही.... त्यावेळी किती तरी अडचणी असतील... प्रश्नही असतील...  संकटेही असतील... सुख, दुख:चे प्रसंग असतील.... त्यावेळची उत्तरे कशी असतील....? प्रश्न कसे सोडवले असतील...? जग किती विलक्षण आहे..  माझ्या आजच्या पिढीला  ५०-६० वर्षे मागे वळून पाहिल्यानंतर ती आजची मुंबई कशी विलक्षण वाटते ... तर ५००-१००० वर्षांपूर्वीचे जग कसे असेल?... वर्ष सरताना सूर्य मावळतानाचा फोटो आता प्रसिद्ध होईल... पण, तो खरच मावळतो का? की, आपण मावळतो...  पृथ्वी फिरते आणि सूर्य जागेवरच आहे..  पृथ्वी फिरत नसती तर .... कल्पना करून पहा... जग निर्माण होऊन किती वर्षे झाली... आणि आपण ज्याला जग म्हणतो... ती पृथ्वी... पण त्या पलिकडचे प्रचंड ब्रह्मांड आणि या पृथ्वीवरचा आपण इवलासा माणूस... आपण स्वत:ला समजतो काय... आणि आपण आहोत किती छोटे... कागदाच्या तुकड्याएवढे... पण, प्रत्येकाचा अभिमान आणि अहंकार किती? या प्रचंड विश्वापुढे आणि काळाच्या कराळ जबड्यात सगळं काही गडप होत असताना आपण किती लहान आहोत... पहाटे जाग आली आणि २००० वर्षांपूर्वीचे जग कसे असेल, याचा विचार मनात आला... पृथ्वी आणि पृथ्वीच्या पलिकडचे ब्रह्मांड किती प्रचंड असेल... जे सुनिता विल्यम्सला पाहता आले... जग निर्माण होऊन किती वर्षे झाली माहिती नाही... पण, रोजची सकाळ प्रसन्न कशी वाटते... याचे कोडे किती विलक्षण आहे...  हजारो वर्षे  आली आणि गेलीही... पण ‘सकाळ होणे’ आिण ती ‘प्रसन्न वाटणे...’ एकही दिवस सकाळ कधी पारोशी वाटत नाही. आणि आपण माणसं एक दिवस आंघोळ केली नाही तर... सगळा निसर्गच किती विलक्षण आहे... आणि आपण त्याच्यापुढे किती छोटे आहोत. कुसुमाग्रजांची एक छान कविता आठवली... 
असीम अनंत... विश्वाचे रण... 
त्यात हा पृथ्वीचा इवला कण... 
त्यातला आशिया... त्यातला भारत
छोट्याशा शहरी... छोट्यशा घरात
कोणी मी वसे... शुद्रता आहो ती... 
अफाट असे... 
याच पाच-सहा ओळींत कुसुमाग्रजांनी या प्रचंड ब्रह्मांडासमोर माणूस किती छोटा आहे... हे ही सांगून टाकले... विज्ञाानाची प्रगती माणसाच्या अफाट बुद्धीमत्तेचे चमत्कार... अगदी परवा चंद्रावर भारताचे चंद्रयान उतरले... या सर्व कतृत्त्वापुढेही माणूस लहानच आहे. आणि निसर्ग, पृथ्वी, सूर्यमाला... सर्वकाही अफाट आहे. 

अशा या अफाट जगातील एक वर्ष फस्त झाले... प्रत्येक माणूस आपला वाढदिवस  साजरा करतो... ३१ डिसेंबरला आपण वर्ष संपले म्हणून उत्सव साजरा करतो... पण, पाठीमागे वळून पाहताना सरलेले आयुष्य म्हणजे आपल्या हातातून पारा निसटून जावा इतके निसरडे वाटत जाते. 
या जगात माणसाला अनंत दु:खे आहेत. सुखाचे काही क्षण आहेत... आनंदाचेही काही क्षण आहेत... पण, प्रत्येकजण शेवटी एकटा आणि सुटा-सुटाच आहे. नाती-गोती माणसांनी निर्माण केली. सामाजिक जीवनात माणूस अधिक समरस झाला. पण, शेवटी एक क्षण असा येतो की, माणूस एकटाच असतो. अगदी चर्चगेट किंवा सी. एस.टीच्या गर्दीतसुद्धा त्या एकट्या-एकट्या माणसांचीच गर्दी होते. अशी बघता-बघता जगात गर्दी झाली... शहरांमध्ये गर्दी झाली... आणि आता गर्दी एवढी वाढत आहे की, लोकसंख्येचा स्फोट होईल, अशी भिती शास्त्रज्ञा व्यक्त करीत आहेत.

मला मुंबईत येऊनही आता ६४ वर्षे झाली. आज २०२३ संपताना असे वाटत आहे की, आता-आताच आलो... आणि बघता-बघता ६४ वर्षे संपून गेली... आज कोणाला खरे वाटेल का? अगदी दादरच्या गोखले रोडवर तळ मजल्यावर खडू ने पाट्या लिहिलेल्या होत्या... काय होत्या पाट्या? ‘घर भाड्याने देणे आहे...’ भाडे किती ? साठ-सत्तर रुपये... महाराष्ट्र टाईम्समध्ये क्रीडा पान सुरू करणारे वि. वि. करमरकर हे गोखले रोडवर ज्या मोघे भवन मध्ये रहात होते.... ती चार खोल्यांची जागा ६० रुपये भाड्याने आम्ही त्यावेळी करमरकर यांच्यासाठी घेतली होती. सोबत पत्रकार केशव पोतदारही होते. (त्यावेळी श्री. करमरकर आणि पोतदार हे एस. एम. जोशी यांनी सुरू केलेल्या ‘लोकमित्र’ दैनिकात होते.आज गोखले रोडवरील चार रूमच्या फ्लॅटची किंमती किती? जग किती बदलले आहे हे तपासायचे असेल तर  असे अनंत विषय आहेत. त्याच गोखले रोडवर दत्तात्रय नावाचे हॉटेल आहे... त्या हॉटेलमध्ये २० पैशांची राईसप्लेट असायची... मी मुंबईत आलो तेव्हा रहायलाही जागा नव्हती. जेवायचा प्रश्न तसा कठीण नव्हता... महिना ६ रुपयांत जेवण व्हायचे... एक वेळ जेवण करून भागायचे... त्या राईसप्लेटची गंमत म्हणजे.... दोन चपात्या, एक मूगभात... एक भाजी आणि वरण जेवढे लागेल तेवढे... भूक भागायची नाही तरुण वयात २०-२० वाट्या आम्ही वरण प्यायचो... आम्ही म्हणजे कोण? मी, बाळ करमरकर, दिनु रणदिवे, केशव पोतदार असे चौघे... अनेक वेळा पुढे िक्रकेटचे पंच असलेले माधव गोठस्करही होते.  त्यावेळी आम्ही गंमत करायचो... 
भा. रा. तांबे यांची एक कविता होती.... 
मरणात खरोखर जग जगते... ती कविता जोरात म्हणून गंमतीने म्हणायचो की, ‘अरे त्या कवीराजांना सांगावे लागेल... की, मरणात खरोखर जग जगते... हे तुमचे म्हणणे खोटे आहे... ‘वरणात खरोखर जग जगते...’ कारण आम्ही निदान चार पत्रकार तरी दुपारच्या राईसप्लेटला १५-२० वाट्या वरण अनेक महिने प्यायलो आहोत. ती मुंबई आता किती बदलली...  सगळे जगच बदलते आहे. पण, जुन्या मुंबईत जी माणुसकी हाेती... लोकलमध्ये चढताना हात देणारे होते. पडताना सावरणारे होते... डब्यात चर्चा करणारे होते... चाळींमध्ये सुख-दु:ख वाटून घेणारे होते. एकाचे घरचे मंगल कार्य सगळ्या चाळीचे मंगलकार्य असायचे... ती मुंबई वेगळी होती. आजची मुंबई वेगळीच आहे... मुंबईत व्याख्यानमाला होत असत... तुडुंब गर्दी असायची... काळाच्या जबड्यात हे सगळे गिळंकृत झाले.. माणसं लहान झाली... मने लहान झाली.. पैसा मोठा झाला... बघता-बघता मुंबई बदलली... छोटी-मोठी गावं बदलली... माणूस बदलला... काळही बदलला... अनेक वर्षे संपली... जुनी माणसं काळाच्या पडद्याआड गेली...  कतृत्त्ववान माणसांना तर त्या काळात तोटा नव्हता... ती प्रचंड माणसं आज दिसत नाहीत... माणसं तीच... मेंदू तोच.... पण मने लहान झाली. अहंकार मोठे झाले. याच मुंबई-महाराष्ट्राने किती मोठी माणसं पाहिली... माझ्या नशिबाने मला आचार्य अत्रे साहेबांच्या सोबत तब्बल १० वर्षे राहता आले. अत्रेसाहेब कोणाकडेही जात नसत... पण असंख्य मोठी माणसं त्यांना भेटायला येत होते. अगदी भारतरत्न पा. वा. काणे यांच्यापासून लता मंगेशकर यांच्यापर्यंत.... आणि क्रिकेटपटू विनू मंकडसुद्धा... सगळ्याच क्षेत्रांतील उंचच उंच माणसं पहायला मिळाली.  ही माणसं पाहणे... त्यांच्याशी बोलणे... त्यांच्या मुलाखती घेणे.... केवढ्या मोठ्या विद्यापीठात ते शिक्षण होते ते... 
आज तो सगळा काळ आठवत आहे... ते दिवस आठवतात.. वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा सूर्य बुडत असताना मनातल्या आठवणी मात्र जाग्या होतात.. ती साधी-साधी माणसं मनाने किती मोठी होती... अनेकांच्या मदतीमुळे मुंबईत कसे राहता आले... सगळे अनुभव असे एकत्र केले तर ते गाठोडं खूप मोठं होईल... मी मुंबईत आलो... रहायला जागा नव्हती... शिवच्या जोगळेकर वाडीत... जिथं शिवार गेस्टहाऊस आहे त्याच्या थोडं पुढे, साठे चाळ होती.  त्या चाळीच्या मालकांनी चाळीच्या बाहेर असलेल्या जिन्याखाली अडवे-उभे पत्रे लावून सुंभाची एक खाट राहिल, एवढी जागा मला करून दिली. ती जागा मला फ्लॅटसारखी वाटली. भाडे होते महिना ३ रुपये... पण असे ते दिवस कामाने झपाटल्यासारखे होते. पगार होता महिना ६० रुपये. म्हणजे आजचे किती? ‘मराठा’त मुख्य वार्ताहर झालो तेव्हा वेजबोर्ड लागू झाले हाेते. त्यामुळे पगार वाढले होते. आणि वाढलेला पगार तब्बल २५० रुपये होता. तो पहिला पगार मिळाला तेव्हा १०० रुपयाची पहिली नोट हातात आली. त्यादिवशी ‘जगातला सर्वात श्रीमंत माणूस मी’ आहे, असे मला वाटले... 

बघता-बघता २०२३ संपले... आता २०२४ उजाडेल...  म्हणजे माणसाने निर्माण केलेल्या भिंतीवर एक नवीन कॅलेंडर येईल. बघता-बघता महिना संपेल... मग एक पान उलटले जाईल... बघता-बघता १२ महिने संपतील... आणि मग ते कॅलेंडरच काढून टाकले जाईल. पुन्हा नवीन २०२५ चे कॅलेंडटर येईल... माणसांच्या जीवनाचे असेच नाही का? जुनी माणसं जाणार.... नवीन बाळं जन्माला येणार... हा सृष्टीचा िकती छान क्रम आहे.  विनोबा सांगायचे...  ‘मृत्यू हा महोत्सव आहे...’ गेलेल्या माणसाचे दु:ख वाटणे स्वाभाविक आहे... पण, जाणे अपरिहार्य आहे.  विनोबाच सांगायचे, ‘मृत्यू नसता तर काय झाले असते? आपल्याच घरात एकमेकांच्या उरावर माणसं बसली असती....’ मृत्यू ही सगळ्यात सुंदर कल्पना आहे. विनोबांना एकाने प्रश्न विचारला... ‘तुमच्या गावात सुंदर काय...’ विनोबा म्हणाले, ‘स्मशान’ तो माणूस दचकला... म्हणाला, ‘काय अभद्र बोलता...’ विनोबा शांतपणे म्हणाले, ‘अभद्र काय? ते वजा करून बघा...’ दिवस संपतो... रात्र संपते... महिना संपतो... वर्ष संपते... माणूसही संपतो... पण एकेका दिवसाची काही विलक्षण आठवण शिल्लक राहते... माणसानेही तसेच जगावे...  पण सगळ्यांना असे कसे जगता येणार... सगळीच माणसं मोठी... मोठ्या मनाची आणि प्रचंड कतृत्त्वाची कशी होणार... सरलेल्या वर्षात मनात हाच विचार आला... मोठ्या माणसाच्या उंचीला हात पोहोचत नाही... कतृत्त्वालाही हात पोहोचत नाही... पण सामान्य माणूस म्हणूनही आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवता आल्या... हेसुद्धा कुणाच्यातरी पुण्याईचे संचितच असले पाहिजे. 
सरलेल्या वर्षाला निरोप देवू या...  सरलेल्या वर्षात ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्या सर्वांना नमस्कार... ज्या कुणाशी वागताना... बोलताना... काही चुकले-माकले असेल तर त्या सर्वांनी क्षमा करावी... 

उद्याच्या नवीन वर्षात काय वाढून ठेवले आहे... हे कोणालाही सांगता येणार नाही. पण जे काही समोर येणार आहे, त्याला सामोरे जाण्याचे सर्वांना सामर्थ्य मिळो, एवढीच प्रार्थना आपल्याला करता येईल... 
३१ डिसेंबरच्या मावळणाऱ्या सूर्याला नमस्कार... आणि नवीन वर्षाच्या पहिल्या उगवत्या सूर्यालाही नमस्कार करणारच आहोत... तो आहे म्हणून प्रकाश आहे... आणि तो बापडा कधीही सुटीवर जात नाही... तो चार-आठ दिवस सुटीवर गेला असता तर.. अरे बाप रे...
सध्या एवढेच....

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.