अधिवेशनाला गेलेल्या मंत्र्यांची मच्छी-मटणाची फरमाईश! शेविंग ब्लेड अन् बॉडीस्प्रेचीही मागणी; चार हजारांचा कोटींच्या उलाढालीची शक्यता
राज्याचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून सुरू होत असून संपूर्ण मंत्रिमंडळ सचिवालय नागपुरात दाखल झाले. अधिवेशनकाळात मंत्री, सचिव, अधिकाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेला देण्यात आली. हा खर्च करण्यासाठी टार्गेटही निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. इतरही विभागाला अशा प्रकारचे टार्गेट असल्याचे समजते. यामुळे अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले असून काही जण या संधीचे सोने करण्याचा प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. एका कॅबिनेट मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून तर दोन महिन्यांपूर्वी यादी एका विभागप्रमुखाला पाठविण्यात आली.
इतकेच नव्हे तर, संबंधित मंत्र्याचे पीए जिल्हा परिषदेत येऊन सुद्धा गेले. संबंधित मंत्र्यांच्या पीएने राज्याच्या याच विभागाच्या नागपूर कार्यालयाच्या प्रमुखाची भेट घेतली. जेवणावळीसाठी आचारी, सकाळचा नाश्ता, चहा, कॉपी, दुपारचे जेवण, सायंकाळचा चहा ठरला आहे. रात्रीचा मेन्यू मात्र दिवस पाहून ठरविण्यात आला आहे.
मासे, मटण, चिकन, असे तिन्ही मेन्यू नमूद आहे. शेविंग ब्लेड पासून बॉडी स्प्रेची मागणीही करण्यात आल्याची चर्चा आहे. काहींना हॉटेलच्या मुक्कामाचा सर्व खर्च तर कुणावर जेवण, आंघोळीला लागणारे साबण, सोडा, परफ्यूमचा भार देण्यात आला. एका विभागाला तर दोनशे कार्यकर्त्यांची जेवणावळी सांभाळायची आहे.त्यासाठी साध्या मेन्यूपासून ते मांसाहारीचे मेन्यू ठरले आहेत. जवळपास दर दिवसाचा खर्च एक लाखाच्या घरात आहे. त्यामुळे या विभागप्रमुखाचे टेन्शन वाढले आहे. हा खर्च करायचा कसा, असा प्रश्न अधिकन्यांना पडला असून रकमेच्या जुवळाजुळवसाठी धावपळ सुरू आहे. माहितीनुसार, शिक्षण विभागाला सर्वाधिक टार्गेट देण्यात आल्याची चर्चा आहे.
पंचायत समिती स्तरावरून बीडीओंनी ग्रामसेवकांना टार्गेट दिल्याचे समजते. बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, कृषी विभाग, लघुसिंचन आणि पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी ही काही उपअभियंत्यांच्या खांद्यावर देण्यात आल्याची चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.