Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणी कुख्यात म्होरक्याला अटक

सांगलीतील  रिलायन्स ज्वेल्स दरोडा  प्रकरणी  कुख्यात म्होरक्याला अटक


सांगली :  सांगलीतील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्सवरील सशस्त्र दरोड्याप्रकरणी देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या बिहारमधील दरोडेखोरांच्या कुख्यात म्होरक्याला अटक करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. पाटणा येथील आदर्श मध्यवर्ती कारागृहातून सांगली पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग (रा. चिश्तीपूर, जि. नालंदा, बिहार) असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. सांगलीतील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर दि. ६ जून रोजी दुपारी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करत सुमारे ६ कोटी ४५ लाखांचे सोने, हिऱ्याचे दागिने, रोकड, मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. गुन्हा घडल्यानंतर सर्व संशयित चारचाकी वाहनांसह दुचाकीवरून पसार झाले होते. ही घटना घडल्यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.  


या घटनेची गंभीर दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी तातडीने तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी बिहारसह, नेपाळ, पश्चिम बंगाल येथे पथके पाठवून याचा तपास केला होता. त्यामध्ये बिहारमधील कुख्यात दरोडेखोर सुबोध सिंग याने कारागृहातून मोबाईलवरून फेसबूक, इंटरनेटच्या माध्यमातून तसेच मेसेंजर, व्हिडिओ कॉल, व्हाईस ओव्हर इंटरनेट कॉल करून साथीदारांना सूचना देऊन सांगलीतील दरोडा घातला होता. गुन्हा घडण्यापूर्वी तसेच गुन्हा घडत असताना सुबोध सिंग या अन्य संशयितांच्या सातत्याने संपर्क साधून होता. तोच या दरोड्याचा सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, अकिब काझी, संदीप गुरव, सागर लवटे, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

सुबोध सिंगवर देशभरात दरोड्याचे ३२ गुन्हे 

बिहारमधील कुख्यात दरोडेखोर सुबोध सिंग याच्यावर संपूर्ण देशभरात ३२ हून अधिक दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा तो म्होरक्या असून त्याने आतापर्यंत अनेक वित्तीय संस्था, सराफी पेढ्यांना लक्ष्य केले आहे. त्याशिवाय त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला, दंगल, अवैध शस्त्र बाळगणे, फसवणूक असेही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.