Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही" देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र

"नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही" देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र


मुंबई :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता येते जाते परंतु मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.

अस आहे पत्र, 

प्रति,

श्री. अजितदादा पवार,

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सस्नेह नमस्कार,

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.  त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणा-या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

आपला,

देवेंद्र फडणवीस

गुरुवारी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यांनी तटस्थ भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मलिक जामीनावर बाहेर आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होत होतं.

सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलिकांवरुन प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडत आहेत.

आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढलं नाही? त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.