Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छोटा शकीलचा दावा; दाऊद जिवंत अन् ठणठणीत, मी दिवसभरात अनेकदा भेटलो...

छोटा शकीलचा दावा; दाऊद जिवंत अन् ठणठणीत, मी दिवसभरात अनेकदा भेटलो...


मुंबई : कुख्यात डॉन व १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमपाकिस्तानात कराचीमधील एका रुग्णालयात दोन दिवसांपासून दाखल झाल्याचे वृत्त सोमवारी सकाळपासून पसरले. त्याच्यावर विषप्रयोग झाला, त्याचा मृत्यू झाला, अशाही चर्चा होत्या. मात्र, पाकिस्तान किंवा भारत सरकारने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. दाऊदचा खास हस्तक छोटा शकील याने 'दाऊद जिवंत आणि ठणठणीत असून, मी त्याला रविवारी दिवसभरात अनेकदा भेटलो' असा दावा केला आहे.

दाऊदवर विषप्रयोग झाला असून, तो रुग्णालयात असल्याची माहिती पाकिस्तानातील काही सोशल मीडिया हँडलद्वारे प्रसारित झाली. त्यानंतर, उलटसुलट चर्चांना उधाण आले. ६७ वर्षीय दाऊद कराचीमधील एका रुग्णालयात भरती असून, रुग्णालयाच्या त्या मजल्यावर तो एकटाच आहे. वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि जवळचे नातेवाईक यांनाच तिथे प्रवेश असल्याचीही चर्चा दिवसभर रंगली होती.


काय म्हणाला छोटा शकील?

दाऊद रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर छोटा शकील याने भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना याचे खंडन केले. त्याची तब्येत उत्तम आहे, तसेच रविवारी दिवसभरात काही वेळा आपली व दाऊदची भेट झाल्याचा दावाही त्याने केला.

दाऊद व अफवा

हृदयविकाराच्या झटक्यामुळे, गँगरीन झाल्यामुळे, कोविड संसर्गामुळे दाऊदचे निधन झाल्याच्या 'बातम्या' अनेक वेळा पुढे आल्या होत्या. निकटवर्तीयांनी वेळोवेळी या बातम्यांचे खंडन केले आहे.


कुठे राहतो दाऊद?

काही वर्षांपासून कराची येथील क्लिफ्टन या उच्चभ्रू वस्तीत दाऊदचे वास्तव्य असल्याचे कळते. पाकिस्तान सरकारने नेहमीच या वृत्ताचे खंडन केले आहे; परंतु जानेवारीत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाऊदचा भाचा आलीश परकार याला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने दाऊद पाकिस्तानात असल्याची व त्याने तेथे दुसरा विवाह केल्याची माहिती तपास यंत्रणेला दिली होती.

दाऊदमुळे पाकिस्तान अडकित्त्यात : ॲड. निकम

ज्यावेळी पाकिस्तानात यादवी निर्माण होते, त्यावेळी संपूर्ण देशाची इंटरनेट सेवा बंद करण्यात येते. दाऊद पाकिस्तानमध्ये आहे की नाही, हेही पाकिस्तान सांगू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती दाऊदमुळे अडकित्त्यातील सुपारीसारखी झाली आहे, असे मत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. अलिबाग येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दाऊदवर विषप्रयोग झाला किंवा हा विषप्रयोग भारताने केला, असे पाकिस्तान बोलू शकत नाही. पाकिस्तानची भूमिका आधीपासून दाऊद आमच्या भूमीत नाही, अशी आहे. परवेज मुशर्रफ हे भारतात आले, तेव्हा हेच बोलले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.