Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी...माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा’- मधुकर भावे

‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी...माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा’- मधुकर भावे

१ डिसेंबरला सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ‘कुंडल’ या क्रांतिकारी गावी गेलो होतो.  ‘कुंडल’ आणि ‘येडेमच्छींद्रं’ ‘येडेनिपाणी’ ही तीन गावे १९४२ च्या प्रती सरकाराची आजची ‘तीर्थक्षेत्रे’  १९४२ च्या सातारा जिल्ह्यातील त्या महान चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर त्यांच्या सेनेचे सेनापती असलेले जी. डी. ऊर्फ बापू लाड यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या व्याख्यानमालेकरिता गेलो.तीन व्याख्याने आयोजित केली गेली.पहिले व्याख्यान माझे  होते... विषय होता.. ‘स्वातंत्र लढा आणि त्यानंतरचा महाराष्ट्र’ ही व्याख्यानमाला  जी. डी. बापूंनी (गणपती दादासाहेब लाड) सुरू केली होती. जी. डी. बापू गेल्यावर ‘क्रांतीअग्रणी व्यख्यानमाला’ या नावाने आज ३० वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे.   १९४२ क्रांती लढ्यात जी. डी. बापू अग्रणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा, जी. डी. बापू, नागनाथ नायकवडी, हिंदूराव पाटील, शेकड्यांनी नावे आहेत... दादांनी छातीवर गोळी झेललेली... हिंदूराव (कवी पी. सावळाराम यांचे मोठे बंधू) गोळीबारा बळी पडलेले. जी. डी. बापूंच्या उजव्या पायाच्या पोटरीत गोळी घुसलेली...  

असा हा क्रातिकारकांचा लढा सातारा जिल्ह्याला लंडनच्या ब्रिटीश सरकारच्या छातीत धडकी भरवणारा ठरला. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले... पण त्यापूर्वी १९४२ पासून सातारा जिल्ह्यातील ५०० ते ६०० गावांत ब्रिटींशांच्या पोलिसांना दहशत होती ती क्रांतिकारकांची. बापू त्यातील अग्रणी. शेतकरी कुटुंबात बापूंचा जन्म. घरची स्थिती फार चांगली नाही. बाहेरचे वातावरण देशप्रेमाने भारलेले... मॅट्रीक झालेले बापू ‘इंग्रजांच्या कॉलेजात जायचे नाही...’ म्हणून देशी आयुर्वेद कॉलेजात दाखल झाले. त्याचवेळी गांधीजींची ‘चलेजाव’ची हाक आली... आणि त्या लढ्यात बापू उतरले.... क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नेतृत्त्व त्यांनी स्वीकारले. क्रांतिसिंहाबद्दलची कृतज्ञाता बापूंनी लिहिलेल्या ‘संषर्ष यात्रा’ पुस्तकात पानापानांत जाणवते. पण, बापूंचा लढा अिधक वैचारिक होता.. ते सांगत होते की, माझी लढाई केवळ इंग्रजांशी नाही... इंग्रज सरकारच्या पाठींब्यावर निर्माण झालेली सावकारशाही.... दडपशाही... गुंडगिरी ही माणसं इंग्रज नाहीत... पण, त्या इंग्रज राजवटीचा फायदा घेवून शेतकऱ्याला लूटत आहेत... बापूंनी आणि त्यांच्या चळवळीने अशा ‘लुटारूंचा’ शोध घेतला. लुबाडणूक करणाऱ्या  सावकरांना सरळ केले... गुंडगिरी करून अत्याचार करणाऱ्या  गुंडांना ‘प्रती सरकार’चा तडाखा दिला.  त्यांच्या पुस्तकात एक छान उदाहरण आहे... त्यांची लांबच्या नात्यातील एक आजी, तिच्या घरी बापू एकदा जातात.... ती आजी म्हणते की, ‘अरे बापू, तुझं स्वराज्य मिळायचं केव्हा...? काल सावकाराने माझ्या शेळ्या-मेंढ्या जप्त केल्या... भांडी-कुंडी जप्त केली... मग आम्हाला तुझ्या लढ्याचा फायदा काय?’ बापू ऐकत राहिले... त्यांच्या तुफान सेनेतील लोकांनी सावकाराला उचलून आणला.  त्याच्या किर्द-खतावण्या आणल्या.  व्याजाने चढवलेल्या खोट्या रकमांची खातरजमा केली आण मग ते दप्तर जाळून टाकले... त्या म्हातारीच्या शेळ्या-मेंढ्या आणि भांडी-कुंडी आणून तिच्या ताब्यात दिली.  सावकाराकडून लिहून घेतले. ‘आता काही येणे नाही...’म्हातारीला म्हणाले... ‘मिळालं का तुला स्वराज्य?’ म्हातारी म्हणाली, ‘हो. या सावकारानं मला लय लुटलयं...’ 


जी. डी. बापूंचे लग्न ते भूमिगत असताना झाले. वाजंत्री नाही... भटजी नाही... अगठा कापून त्या रक्ताने वधू-वरांनी एकमेकांनी टिळे लावले. ग. दी माडगुळकरांनी मंगलास्टके म्हटली... झाले लग्न...  आणखी एकआठवण बापू सांगतात...  ‘१९३४ साली क्रांतिसिह नाना पाटील यांनी कुंडल येथे रात्रशाळा काढली. ती त्या गावातील पहिली शाळा. बापू तेव्हापासून नानांचे भक्त. पाच वर्षांच्या या लढ्यात बापूंना इंग्रज सरकार पकडू शकले नाही. भूमिगत राहून बापूंनी हा लढा लढवला. तासगावचा मोर्चा... इस्लामपूरचा मोर्चा... तेथील युनियन जॅक खाली उतरून तिरंगा चढवणे... चळवळीसाठी लागणारा पैसा याकरिता धुळ्याहून नंदूरबारलाजाणारा पाच लाखांच्या शासकीय खजिन्याच्या वाहनावर हल्ला करून हा पैसा स्वातंत्र्य चळवळीसाठी वापरला गेला... त्याचा पै अन पैचा हिशेब बापूंनी दिलेला आहे. डॉ. उत्तमराव पाटील त्यांच्याकडे एक लाखाची गठडी कशी दिली आणि त्यांनीही कसा हिशेब दिला, हा सगळा तपशील वाचताना अंगावर काटा येतो. त्या सगळ्या धाडसाचा... त्यागाचा... समर्पणाचा एक प्रचंड अंगार हे बापूंचे जीवन होते. तिकडे वसंतदादांनी छातीवर गोळी झेलली. पोलिसांच्या पाठलाग चालू झाल्यावर अण्णा पत्रावळे यांनी कृष्णा नदीच्या पूरामध्ये उडी मारली. आणि त्यातच ते वाहून गेले. पांडू मास्तरही असेच मारले गेले. बापूंच्या पायातील पोटरीत गोळी घुसली. त्या स्थितीत तासभर ते पळत होते. नागनाथ नायकवडी यांच्या खांद्यावर गोळी लागली. तो सगळा तपशील वाचताना अंगावर काटा येतो.  नवीन पिढीला हा संग्राम काहीही माहिती नाही. 

कुंडलला गेल्यामुळे एक मोठे समाधान वाटले. बापूंच्या स्वातंत्र्य चळवळीचा मोठा इितहास त्यांचे चिरंजीव आमदार अरुण लाड यांनी भव्य स्मारकात ‘न भुतो न भविष्यती’ इतक्या प्रभावीपणे चित्रबद्ध केला आहे. बापूंचे हे चित्र स्मारक ‘सर्वोत्तम’ म्हणता येईल, इतके जबरदस्त आहे. जिवंत वाटते. क्रांतिसिंह नाना पाटील आणि बापूंचे पुतळे इतके भव्य, उतुंग आणि हुबेहूब साकार झाले आहेत. त्या कलावंतांचीही कमाल आहे... कुंडल हे  स्वातंत्र्य चळवळीचे तीर्थक्षेत्र आहे, याची नुसती जाणीव होत नाही तर... ते सगळं प्रदर्शन पाहात असताना अंगावर काटा येतो...  काय ती त्यागी माणसं... त्यांचा त्याग, देशभक्ती... त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट... भूक-तहान सगळे विसरून स्वातंत्र्यासाठी उभारलेला त्यांच्या जीवनाचा तो धगधगता यज्ञा... बापूंचे ते स्मारक महाराष्ट्रातील अनेक लोकांना माहितीही नसेल... मी अरुण लाड यांना विनंती केली... महाराष्ट्रातील सर्व शाळांना पत्र पाठवा... त्या विद्यार्थ्यांना कुंडलला बोलवा... ‘स्वातंत्र्य कसे मिळाले, याची माहिती आजच्या तरुण मुलांना फार नाही. त्यासाठी किती त्याग केला, याची कल्पना नाही. किती बलिदाने झाली... कितीजणांनी खस्ता खाल्ल्या... आणि त्यांची स्वप्नं काय होती....  हे सगळं समजायला हवं...’ 

जी. डी. बापूंच्या जन्मशताब्दी समारोपाला मला आमंत्रण आले, हे मी माझे भाग्य समजतो...  व्याख्यानाला प्रचंड गर्दी होती. अर्थात ती बापूंच्या आदरामुळे होती. हल्ली व्याख्यानाला माणसं जमत नाहीत. कुंडलचा अनुभव फार विलक्षण होता. सभा जिवंत वाटली. नियोजन चोख होते. स्वत: अरुणभाऊ श्रोत्यांमध्ये बसले होते. हा साधेपणा फार भावला.

१९५९ पासून बापू २०११ ला अखेरचा श्वास घेईपर्यंत, बापूंच्यासोबत अनेक वेळा त्यांच्यासोबत चळवळीत होतो...  १३ मार्च १९६६ ला  त्यावेळच्या सचिवालयाला एक लाख बैलगाड्यांचा घेराव घालण्याचा प्रचंड मोर्चा शे. का. पक्षाने आयोजित केला होता. त्याचे नेतृत्त्व बैलांचा कासरा हातात धरून जी. डी. बापू, उद्धवराव पाटील यांनी केले होते. तो फोटो मी ‘मराठा’त पहिल्या पानावर छापला होता. आज अशा मोर्चाची कल्पना तरी करता येईल का? सगळच विलक्षण होतं... नेतेही आणि आंदोलनेसुद्दा. जी. डी. बापू, उद्धवराव पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, दाजीबा देसाई हे तर शे. का. पक्षाचे त्यावेळचे धुरीण. बापू  हे १९५७ ते १९६२ विधानसभेत आमदार... १९६९ ते १९७५ विधान परिषदेत...  त्यांची सगळी भाषणे शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नाभोवती िफरत असायची. ही सगळी स्वातंत्र्य चळळीतील त्यावेळची काँग्रेसच्या विचारांनी भारावलेली माणसं.... काँग्रेस पाहून अलग झाली. दाभाडी प्रबंधात त्याची शास्त्रशुद्ध मिमांसा आहे. स्वातंत्र्य कोणाकरिता मिळवले? आपण कशाकरिता लढलो? याची मिमांसा जी. डी. बापूंनी तर्कशुद्धरितीने केली आहे.  शेतकरी आणि कामरागांचे राज्य येईल, अशी अपेक्षा होती. आलेल्या सरकारातून समाजात फार मोठी विषमता निर्माण झाली. श्रीमंत आणि गरिब यांच्यात मोठी दरी झाली.  ज्या साम्यवादात किंवा समाजवादात ‘श्रीमंतीची वाटणी’ अपेक्षीत होती ती झाली नाही. मुठभर श्रीमंत झाले. विशिष्ट वर्गाच्या हातात सत्ता गेल्या. स्वातंत्र्यासाठी लढलेले िकंवा नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी लढलेले कामगार आणि शेतकरी होते. आणि नेमके हेच दोन महत्त्वाचे  घटक विषमतेच्या धोरणाखाली चिरडले गेले. बापूंनी याची मिमांसा अितशय शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे. आजही शेतकरी आणि कामगार हे देशातील महत्त्वाचे घटक  सगळ्यात उपेक्षित आणि कर्जबाजारी आहेत. कोणत्याही ‘बनिया’ला (हा बापूंनी त्यांच्या आत्मकथनात वापरलेला शब्द आहे.) आत्महत्या करावी लागली नाही. ती शेतकऱ्याला करावी लागत आहे. एवढ्या प्रचंड लढ्यानंतर शेतकऱ्यानेच उत्पादन केलेल्या शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याचा नाही.

 उत्पादकाचा नाही. उद्योगपतींनी तयार केलेला कारखान्यातील मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार उद्योगपतीचा आहे. या विषमतेवर अधारित झालेली लुबाडणूक हा गेली ५० वर्षे चर्चेत असलेला विषय आहे. त्यामुळे मुठभरांच्या हातात सत्ता आणि शेतकरी कामगारांच्या डोक्यावर कर्ज.... या व्यवस्थेला आपण बदलू शकलेलो नाही. याची शास्त्रशुद्ध मिमांसा बापूंनी आणि अनेकांनी केली. बापूंची सगळी भाषणे या तळमळीची आणि चळवळीची आहेत. त्यांच्या आणि चळवळीतील त्यावेळच्या नेत्यांच्या, त्यागाला सीमाच नाही...  आजच्या पिढीला तो त्याग समजणारही नाही.  कारण आमच्या आणि नंतरच्या पिढीच्या हातात स्वातंत्र्य आणि त्याचे फायदे फुकटात मिळालेले आहेत. ज्या देशात मिळालेल्या स्वातंत्र्याचा इितहास प्राणपणाने जपला जात नाही आणि नवीन पिढीला सांगितला जात नाही, त्या देशात काय होत आहे, ते आज आपण अनुभव आहोत. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्याला कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करावी लागते. आणि ८ हजार कोटी रुपये कर्ज बुडवणारा विजय मल्ल्या  आणि निरव मोदी हजारो कोटींची कर्ज बुडवून मिजाशीत वावरू शकतात. क्रिकेट सामन्यातील एका खेळाडूला १७ कोटी रुपयांना विकत घेणारे आहेत... आणि एका अवकाळी पावसाने सगळं पीक मातीत गाडल्यावर त्यातून १७ रुपयेसुद्धा उत्पन्न मिळणार नाही.... त्याची मेहनत मातीत गेलेली आहे... बापूंचा तो सगळा संग्राम पाहताना विषमतेचे हे सगळे प्रश्न मनात घोंगावत होते. 

बापूंनी उभा केलेला ‘क्रांति सहकारी साखर कारखाना’ हा या देशातील क्रमांक एकचा साखर कारखाना मानला गेला आहे. शेतकऱ्याला सर्वात जास्त भाव देणारा... कोणाचेही कर्ज न घेणारा, अशी या कारखान्याची किर्ती आहे. सहकारातील देश आणि राज्य पातळीवरील सर्व पारितोषिके या कारखान्याने मिळवली आहेत. आणि त्याची मांडणी छान केलेली आहे.  अत्यंत अबोल पण आपले काम चोख करणारे बापूंचे पुत्र आमदार अरुण लाड आणि त्यांचा पुत्र शरद हेही समर्पणाने सहकारात काम करीत आहेत. 

बापूंच्या जयंती-शताब्दी व्याख्यानमाला समारोपात ४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना ‘क्रांतिअग्रणी बापू लाड २०२३ जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. विचारवंत राजन गवस यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. सयाजी शिंदे हे अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेतच...  पण हे सयाजी सातारा जिल्ह्यातील साखरवाडीचे... त्यांच्या वडिलांची जमीन धरणात गेली... मग सयाजी यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न आला... वॉचमनची नोकरी त्यांनी पत्करली. पगार १६५ रुपये. नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. विजय तेंडुलकर यांच्या गाजलेल्या ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाने त्यांना प्रचंड प्रसिद्ध मिळाली. तामिळनाडू सरकारने त्यांना सन्मानितही केले आहे. अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. त्याहीपेक्षा पडद्यावर खलनायक असलेले सयाजी, प्रत्यक्ष जीवनात महानायक आहेत. धरती माता ही दुसरी आईच, असे ते मानतात.  १० लाख झाडे त्यांनी लावली. आपण आईच्या उदरात आईच्या अॅक्सिजनवर जगतो. जन्माला आल्यानंतर धरणीमातेला जगवण्याकरिता झाडंच अॉक्सिजन देतात हे त्यांचे तत्त्वज्ञाान आहे.  अिभनेत्यापेक्षा सयाजीमध्ये दडलेले  हे ‘माणूसपण’ मला जास्त मोठे वाटते. त्यामुळे अरुणभाऊ लाड यांनी जी. डी. बापूंच्या नावचा जीवनगौरव पुरस्कार अतिशय योग्य व्यक्तिमत्त्वाला दिला आहे. पहिल्या दिवशी माझे व्याख्यान झाले. कसे झाले... नेहमीप्रमाणेच... लोकांना जे आवडले त्याचे श्रेय माझे नाही... मला ज्या फार मोठ्या माणसांचा सहवास लाभला त्यांच्या पुण्याईचा तो परिणाम असेल आणि वाचनाचा...  जे काही चुकले असेल ते माझे. 

दुसरे व्याख्यान विश्वंभर चौधरी यांचे झाले.. ते खूपच छान झाले. आणि  तिसरे व्याख्यान अॅड. वैशाली डोळस यांचे.  ते रविवारी (३ डिसेंबर) रात्री आहे.  कुंडलला गेलो त्याचे खूप समाधान वाटते आहे. एक महिन्यापूर्वी जयसिंगपूरला रत्नाप्पाआण्णा कुंभार यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाला गेलो होतो. डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या घटनेच्या मसुदा समिती सदस्यांमध्ये रत्नाप्पा होते. खासदार होते... आमदार होते... अनेक संस्थांने विलीन करण्यात आघाडीवर होते. सातारा-सांगली-कोल्हापूर जिल्हा म्हणजे त्यागी, मोठ्या नेत्यांची एक खाणच आहे. शाहू महाराज यांच्याच पुरोगामी  निर्णयांची माती या सगळ्या परिसरात पसरलेली आहे. त्यामुळे हा सगळा भाग पवित्र आहे. कष्ट करणारा आहे. दुष्काळी तालुके असून हिरवा गार आहे... रान भरात आलेले आहे. ना. धो महानोर पश्चिम महाराष्ट्रात असते तर पंचगंगा, कृष्णा, कोयना यांच्यामुळे समृद्ध झालेल्या या परिसराला त्यांनी िकती डोक्यारवर घेतले असते. सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांचा... वसंतदादा पाटील यांचा... किसन वीर यांचा... बाळासाहेब देसाई यांचा... राजरामबापू यांचा... बापू लाड यांचा... क्रांतिसिंह नाना पाटील यांचा... कर्मवीर आण्णा आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा. पण, तो काळ, तो त्याग, ते समर्पण आता राहिलेले नाही. काहीतरी चुकले आहे म्हणा... किंवा बिघडले आहे म्हणा... फारच थोडी व्यक्तिमत्त्वे त्याग आणि समर्पणाचा वारसा जपत आहेत. त्यात अरुणभाऊ लाड आहेत, असे माझे निरिक्षण आहे. 

जी. डी. बापूंची समाधी आणि त्यांचा चित्रित झालेला स्वातंत्र्यसंग्राम पाहून दोन दिवस अस्वस्थच होतो.  अशी ही माणसं होती. आणि आताची.... माझ्या भाषणात मी स्वातंत्र्यानंतरचा महाराष्ट्र सांगताना ‘जमेची बाजू’ही सांगितली आणि आता ‘नासत चाललेला’ महाराष्ट्रही सांगितला. सत्य सांगायलाच हवं... आणि स्पष्ट लिहायलाच हवं... पत्रकाराचा तोच धर्म आहे.   सुरुवातीला जे शिर्षक दिले आहे. त्या दोन ओळी प्रख्यात कवी सुरेश भट यांच्या कवितेमधील आहेत. त्या ओळी समोर ठेवून बापू क्रांतीच्या वणव्यावरून चालत राहिले.  त्या ओळीतील संदेश हेच बापूंचे भूमिगत काळातील जीवन होते. 

‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी...
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा’
हा नेता भूमिगत होऊन रात्री-बेरात्री िफरत राहिला. कधी लपून-छपून तर कधी कधी घोड्यावर मांड ठोकून पण, इंग्रजांना शरण गेला नाही. त्या बापूंना अभिवादन.... 
सध्या एवढेच...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.