चैत्यभूमीवर यंदा १० लाख भीम अनुयायी येणार! चोख व्यवस्था
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी यंदा जवळपास १० लाख अनुयायी मुंबईत दाखल होत आहेत. राज्य शासनाकडून उत्तम नियोजन आणि रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात आलेल्या खास रेल्वे गाड्यांमुळे मोठ्या संख्येने भीमसैनिक मुंबईत दाखल होत आहेत.
यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली येथील भीम अनुयायी सर्वाधिक आहेत, तर महाराष्ट्रातील नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला, औरंगाबाद आणि सातारा येथील भीमसैनिकांनी सोमवारीच चैत्यभूमीवर हजेरी लावली होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्य आणि देशभरातून लाखोंच्या संख्येने दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायी दाखल झाले आहेत. शिवाजी पार्कात दोन मोठी विश्रामगृहे उभारण्यात आली आहेत. देशासह राज्यभरातून दाखल होणारे अनुयायी येथे विसावत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. लाखोंच्या संख्येने विसावणाऱ्या अनुयायांना सेवा देता याव्यात, म्हणून सरकार आणि महापालिकेच्या यंत्रणा वेगाने काम करीत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून अन्नदान आणि आरोग्य यंत्रणा कुठेच कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे लाखो अनुयायांच्या साक्षीने चैत्यभूमी भीममय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दिवसाला अडीचशे ते तीनशे रुग्ण
रविवारपासून येथे दंत उपचार, ताप, सर्दी, खोकला तसेच डोळ्यांच्या आजारांसाठी शासकीय आणि पालिका रुग्णालय उपचार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात दिवसाला दहा ते १५ डॉक्टरांच्या टीमकडून अडीचशे ते तीनशे रुग्ण तपासले जात आहेत. थंडीत दात दुखण्याच्या तक्रारी अधिक असल्याने दंत तपासणी केंद्रावर अधिक गर्दी असल्याचे नायर रुग्णालयाच्या डॉ. सीमा कांबळे यांनी सांगितले.
आरोग्य सुविधेची उत्तम व्यवस्था
दरवर्षी पालिकेकडून चैत्यभूमीवर शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी मोफत आरोग्य दवाखाने, आरोग्यविषयक जागृती केंद्र तसेच औषधे देण्याची सोय करण्यात येते. यंदा मात्र पालिका प्रशासनाने या केंद्रांच्या जागेत बदल केले आहेत. शिवाजी पार्कात समर्थ व्यायामशाळेसमोरील मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश करताच डाव्या बाजूला आरोग्यविषयक सोयी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे उपचारांची आवश्यकता असलेल्या भीमसैनिकांना पालिकेच्या निवासी पंडालजवळ तत्काळ उपचार देणे सोयीचे झाले आहे. तसेच येथे रुग्णवाहिका तैनात केलेल्या असल्याने तातडीने उपचाराची गरज भासल्यास मोकळ्या मार्गाने जवळील शासकीय रुग्णालयात जाणे शक्य होणार आहे.
अभिवादनासाठी लांबच लांब रांगा
चैत्यभूमीत येऊन प्रत्यक्ष अभिवादन करता यावे; म्हणून राज्यभरातून भीम अनुयायांचे जत्थेच्या जत्थे चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. त्यामुळे रविवार सकाळी पहिल्यास सामूहिक वंदनेपासून चैत्यभूमीवर अभिवादन रांग वाढत आहे. सोमवारी ही रांग भीम ज्योतीपर्यंत गेली होती. त्यामुळे मंगळवार संध्याकाळपासून अभिवादन रांग प्रभादेवीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
समता सैनिक दलाची करडी नजर!
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा पसारा देशभर आहे. महापरिनिर्वाण दिनाची जबाबदारी मुंबई समता सैनिक दलाकडे असते. डोळ्यात तेल घालून दिवसरात्र समता सैनिक दलाचे १० हजार पुरुष-महिला जवान सेवा बजावत असल्याचे मुंबई समता सैनिक दलाचे मेजर लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.
भीम अनुयायांसाठी दोन निवासी मंडप
एके वर्षी अवकाळी पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात भीम अनुयायांसाठी उभारण्यात आलेला निवासी मंडप पडला होता. पाऊस आणि चिखलामुळे हाल झाले होते. त्याची दक्षता घेत पालिकेने यंदा भव्य असे दोन निवासी मंडप उभारले आहेत. त्यात अनुयायांना चैत्यभूमीवर सुरू असलेले अभिवादन थेट लाइव्ह पाहण्यासाठी भव्य अशा स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
ट्रक भरून पुस्तके
शिवाजी पार्कात पुस्तकांचे स्टॉल थाटण्याचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते. देशासह राज्यभरातील प्रकाशन संस्था यासाठी येथे दाखल झाल्या आहेत. राज्यातून दाखल झालेल्या प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधी पुस्तके भरून आणलेले बॉक्स ट्रकमधून खाली उतरवत होते.
सहा शाळा निश्चित
देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी शिवाजी पार्कमध्ये तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील पालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज आहेत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.