Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘आधी निवडणुका जिंका... नेता नंतर ठरवा...’ - मधुकर भावे

‘आधी निवडणुका जिंका... नेता नंतर ठरवा...’ - मधुकर भावे


भाजपा विरोधात ‘इंडिया आघाडी’ ची बैठक दिल्लीत  झाली. ही चौथी बैठक होती. पूर्वीच्या तीन बैठकांत फक्त चर्चा होत होती. १९ डिसेंबरच्या दिल्लीच्या बैठकीत ‘भाजपविरोधात  लोकसभा निवडणूक जागा वाटप’ यावर निर्णय झाला. ३१ डिसेंबरपर्यंत हे जागावाटप ठरणार आहे, असे सांगितले गेले. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, या आघाडीने ठरवल्याप्रमाणे भाजपा उमेदवाराच्या विरोधात- ‘एकास एक’ अशी लढत झाली तर लोकसभा निवडणूक भाजपाला सोपी जाणार नाही. एका अर्थी भाजपा आज घाटमाथ्यावर आहेे. तीन निवडणुकीत घाट चढून, भाजपा शिखरावर  पोहोचलेला आहे. आता त्याच्यापुढे काही नाही. जो आहे तो उतार आहे. त्यामुळे कोणी कितीही सांगितले तरी, भाजपाची घसरगुंडी होणार हे नक्की... त्यांच्या जागा कमी होणार... २०१९ एवढे बहुमत मिळणार नाही. उलट ‘इंडिया आघाडी’च्या निर्णयाप्रमाणे विरोधी पक्षाच्या सर्वांनी शेवटपर्यंत ही एकजूट टिकवली... ‘एकास-एक’ उमेदवाराची लढत झाली... तर भाजपाला ही निवडणूक अिजबात सोपी जाणार नाही. देव-धर्म, राम मंदिर, ३७० कलम, काश्मीरात निवडणुकांचे आश्वासन... हे सगळे मुद्दे मदतीला असले तरी ‘एकास-एक’ अशी लढत भाजपासाठी अवघडच आहे. जरी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांत भाजपाला विधानसभेत बहुमत मिळाले असले तरी, तिन्ही राज्ये मिळून फक्त दहा लाख मते भाजपाला जास्त मिळाली आहेत. एक किंवा दीड टक्का एवढाच मतांचा फरक आहे. एक तर्क असा मानला जातो की, लोकसभा निवडणुकीत भाजपाला अधिक फायदा होईल. कारण, मोदींचे नेतृत्त्व आहे. इंडिया आघाडीने अतिशय हुशारिने मोदी हा विषय बाजूला ठेवला आहे. ही निवडणूक देशाचे संविधान वाचवण्याची आहे, लोकशाही वाचवण्याची आहे... सगळ्या शासकीय यंत्रणा सत्ताधारी पक्षासाठी वापरण्याच्या विरोधातील आहे. आणि तीन निवडणुकांतून मिळालेले बहुमत हुकूमशाहीत परिवर्तीत केले जात आहे. यावर आक्षेप घेणारी इंडिया आघाडी अधिक प्रभावी मुद्द्यांवर बळकट झाल्यासारखी दिसते आहे.

अजून पाच महिने आहेत.  आघाडीत २८ पक्ष आहेत. त्यातील अगदी किरकोळ पक्ष सोडून दिले तरी, जागावाटप ‘एकास-एक’ या निर्णयावर झाले तरच, भाजपाच्या विरोधात वातावरण तयार होईल. या निवडणुकीकरिता भाजपा अनेक मुद्द्यांचा वापर करील... फोडा-फोडी करील... पैशाचाही प्रयोग मोठा होईल... जात-धर्म शिवाय राम मंदिराचे लोकार्पण तर निवडणुकीच्या तोंडावर त्याचकरिता ठेवले गेले आहे. भाजपाला आर्थिक विषयावर निवडणूक लढवता येत नाही. त्यांना धार्मिक मुद्देच हयातभर पुरलेले आहेत. तेच पुन्हा वापरून फूट पाडण्याचे काम होईल. पण, मतदारांची मानसिकता निश्चितपणे वेगळी आहे. शिवाय दहा राज्यांत भाजपा सत्तेत नाही. दक्षिणेतील एकही राज्य भाजपाच्या हातात नाही. अर्थात दक्षिणेच्या राज्यातील १२८ जागांपैकी सर्वच्या सर्व जागा इंडिया आघाडीला मिळतील, असा त्याचा अर्थ नाही. उलट इंिडया आघाडीने या निवडणुकीला भाजपाकडून आणि पंतप्रधानांकडून जे ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ असे राजकीय चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो खोडून काढला पाहिजे. 

हा मुद्दा अतिशय घातक आहे. जात-धर्माची वाटणी जेवढी घातक आहे तेवढीच ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ असे मुद्दे लोकशाहीलाच घातक आहेत. या अखंड देशाची विविधता जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच महत्त्व या ‘विविधतेतील एकते’ला आहे. भारताची तीच खरी शक्ती आहे. त्यामुळे जातीय, धर्मिक, प्रांतीक मुद्दे येऊ देता कामा नयेत. इंडिया आघाडीने जागा वाटपाच्या आगोदरच प्रचाराच्या मुद्यांवर एकसूत्रता ठरवली पाहिजे. राष्ट्रीय मुद्दयांवर कोणी बोलायचे... त्याचे जबाबदारी नेमकी कोणावर... इंडिया आघाडीतील २८ पक्षांपैकी सगळेच नेते एकाचवेळी बोलू लागले तर वेगळे आवाज निघू शकतील... शिवाय आजपर्यंतच्या आघाड्यांचे अनुभव असे आहेत की, त्या आघाडीतील कोणतातरी एक पक्ष भलता मुद्दा उपस्थित करून आघाडीत विघ्न आणतो. काही पक्ष जाणीवपूर्वक हे काम करू शकतील... १९७७ सालच्या निवडणुकीत आणिबाणिच्या विरोधात जनता पक्षाची निर्मिती झाली तरी... ‘दुहेरी निष्ठा’ या एका मुद्द्यावर दीड वर्षात  समाजवादी पक्षामुळे जनता पक्ष फुटला. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर काँग्रेस विरोधातील सर्व पक्षांनी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ या बॅनरखाली आपले पक्ष गुंडाळून ठेवले. महाराष्ट्राला या समितीने अिभवचन दिले होते की, ‘मुंबई आणि सीमाभागासह महाराष्ट्र राज्य’ हे आपले ध्येय आहे... मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होताच, प्रजा समाजवादी पक्षाने ‘इम्ब्रेनाज या हंगेरीतील पंतप्रधानांच्या मुद्द्यांवर इथे महाराष्ट्रात समितीला विरोध केला. प्रजा समाजवादी पक्ष त्यावेळी समितीतून फुटला. कुठे हंगेरी देश... कुठे त्यांचा पंततप्रधान आणि कुठे महाराष्ट्राचा मुद्दा. पण, एकदा फूट पाडायची म्हटलं की, अनेक कारणे मिळतात.. त्यामुळे आघाडीने कोणते विषय हाताळायचे त्याचाही निर्णय केला पाहिजे. भाजपाकडून काही चुकीचे लोक या आघाडीत घुसवले आहेत का, यावरही लक्ष ठेवले पाहिजे. इंडिया आघाडीचा प्रवक्ता नेमका कोण? हे ही ठरले पाहिजे. कारण देशातील प्रसारमाध्यमे इंडिया आघाडीमध्ये कधी फूट पडते, यासाठी टपलेली आहेत. देशातील बहुसंख्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या आघाडीसोबत नाहीत. जाहिरातीच्या रतीबामुळे  ती कोणासोबत आहेत, हे त्यांचे प्रत्येक पान सांगत आहे... त्यांचाही नाईलाज आहे. जाहिरातीचे अमिष आहेच... आणि ती लढाऊ पत्रकारिता आता कुठे राहिली आहे? बहुसंख्य वाहिन्या, वृत्तपत्रे भाजपाच्या नळावर पाणी भरत आहेत. त्यामुळे आघाडीत फाटाफूट होण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावली जाईल... इंडिया आघाडी जेवढी मजबूत होईल, तेवढा भाजपाचा जळफळाट होईल. आणि त्याच वेगाने प्रसारमाध्यमे आघाडीच्या विरोधात कोणतेही मुद्दे उकरून काढतील... या माध्यमांनी जात-धर्म याचे कसलेही तारतम्य सांभाळलेले नाही. ओिरसात झालेल्या रेल्वे अपघातात ज्या स्टेशनजवळ अपघात झाला... त्या रेल्वे स्टेशनचा स्टेशनमास्तर मुस्लिम होता, असा शोध लावून, दोन दिवस प्रसारमाध्यमांनी असा काही धुमाकूळ घातला.... हे सगळे प्रयोग केले जातील.. आणि म्हणून आघाडीतील नेत्यांनी चार महिने प्रसार माध्यमाशी बोलूच नये... आघाडीतर्फे कोणी बोलायचे, हे एकदा ठरवून घ्या... याशिवाय आणखी एक धोका आहे... तेलंगणात पराभूत झालेले मुख्यमंत्री राव आणि ओरिसाचे मुख्यमंत्री पटनाईक या निवडणुकीत भाजपासोबत जातील... या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री भाजपाची ‘बी टीम’ होते आणि ओरिसा अजूनही आहे... आणखी एक मुद्दा... मायावती, ओवेसी, हे दोन नेते अपक्ष उमेदवार उभे करणार... तशी व्यवस्था होणार... भाजपाचा एक महत्त्वाचा मुद्दा असा राहिल की, आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडणे.... ते भाजपासाठी मदतीचे ठरेल... त्यामुळे भाजपातर्फे निवडणुकीचे ‘नियोजन’ करताना मायावती आणि ओवेसी यांच्याबद्दलची भाजपाची भूमिका अर्थपूर्ण राहिल... 

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या आघाडीसाठी सध्या तीन पक्ष एकत्र आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना... शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष... तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर.... या वंचित आघाडीला लोकसभा निवडणुकीत बरोबर घेतले गेले पाहिजे. जागावाटपात काही जागा त्यांना सोडल्या पाहिजेत.... उदाहरणार्थ अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांनाच द्यावी. आणखी काही जागा त्यांना सोडता येतील. एक-एक जागा महत्त्वाची आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात ४८ पैकी फक्त १ जागा जिंकली. ती चंद्रपूरची. ते खासदार बाळू धानोरकर यांचे दु:खद निधन झाले. तिथे उमेदवार कोण आहे, हे आताच ठरवून घ्या... ती जागा काँग्रेसची आहे. आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र बोलावून उमेदवाराच्या नावाचा निर्णय करावा. नांदेडमध्ये कोण लढणार? विजयी होण्यासारखा उमेदवार कोण? ठरवून घ्या... कोणाच्यातरी मुलीला किंवा कोणाच्या तरी सुनेला असे तिकिट वाटप झाले तर सगळा विषय बिघडेल. तिच स्थिती चंद्रपूरची आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे तिकीट वाटप होताना तिन्ही पक्षांच्या एकजुटीचा फायदा आघाडीला व्हायला हवा. शिवाय उमेदवार ठरवल्यावर शिवसेनेच्या उमेदवारासाठी शरद पवारसाहेब आणि काँग्रसचे नेेते त्याच उत्साहाने प्रचारात उतरले पाहिजेत. तीच गोष्ट शिवसेनेलाही लागू आहे. राष्ट्रावादी किंवा काँग्रेसच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे त्या-त्या उमेदवाराच्या व्यासपीठावर यायला हवेत. ही आघाडी मनापासून झालेली आहे, असे वातावरण तयार झाले तरच, मतदारांचा विश्वास वाढेल. 

इंडिया आघाडीच्या बैठकीत आघाडीच्या भावी नेत्याचे नाव म्हणून ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचवले. म्हणजे ‘पंतप्रधान पदाचा उद्याचा चेहरा खरगे असतील...’ असा त्याचा अर्थ. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी खरगे यांच्या नावाला पाठींबा दिला. शिवसेनेचाही पाठींबा आहे. मात्र, आजच्या घटकेला नेत्याच्या नावापेक्षा भाजपाचा पराभव करणे महत्त्वाचे आहे. हा मुद्दा खरगे यांनी नेमका पकडला. या इंडिया आघाडीच्या एकूण बांधणीत काँग्रेस अध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे हे सातत्याने राजकीय शहाणपणाने वागत आहेत आणि बोलत आहेत. गांंधी-नेहरू घराण्यातील व्यक्तींनंतर खरगे हे पक्षाचे अध्यक्ष झाले. पक्षाच्या निवडणुकीतून बहुमताने ते निवडले गेले. अध्यक्ष झाल्यावर खरगे यांचे प्रत्येक राजकीय पाऊल अतिशय शहाणपणाने पडलेले आहे.  त्यात समतोल आहे... विचार आहे... पक्षाचे हीत आहे... सर्वांना बरोबर घेवून चालण्याचे धोरण आहे. पक्षातील फुटीरांना कसे सांभाळायचे याचे कसबही त्यांनी दाखवले. एखादा नेता दिल्लीच्या बैठकीत ‘उद्याचा पंतप्रधान’ म्हणून आपले नाव अल्यावर हुरळून गेला असता... पण, खरगे यांनी या सगळ्या चर्चा थांबवल्या. इंडिया आघाडीचा उद्याचा पंतप्रधान कोण? या मुद्द्याची चर्चा आता करूच नका... वाहिन्यावाले आता हाच मुद्दा पकडून २८ पक्षांच्या नेत्यांच्या मागे दिवसभर धावून.... त्यांच्या तोंडात दांडा घालून कोणते वेगळे नाव मिळते आहे का? यासाठी पिच्छा पुरवणार... एखादा नेता काहीतरी वेगळे बोलू शकतो... मग दिवसभर तेच नाव चालवले जाईल... याचा अंदाज खरगे यांना नेमका आला. अतिशय विचारी असा तो नेता आहे. त्यामुळे त्यांनी जे सूत्र सांगितले तेच महत्त्वाचे आहे. मोदी विरोधात उद्याचा पंतप्रधान कोण? हे लोक ठरवतील... वाट अडवली म्हणून पाणी जसे थांबत नाही... ते आपली वाट शोधून काढते. त्याच प्रमाणे आधी निवडणुका जिंका... नेता नंतर ठरवा.... 

१९७७ साली जनता पक्ष स्थापन झाला तेव्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनता पक्षाचा पंतप्रधान कोण? याची चर्चा निवडणुकीच्या आगोदर आणि प्रचारात झाली नव्हती. आधी निवडणूक जिंका आणि मग नेता ठरवा, हेच तेव्हा सांगितले गेले. निवडणूक जिंकल्यावर जयप्रकाश नारायण यांना नेता निवडीचे अधिकार देण्यात आले. अगदी त्याचप्रमाणे इंडिया आघाडीचा उद्याचा पंतप्रधान आज जाहीर करण्याची गरज नाही. खरगे यांच्या नावावर एकमत झाले तर भाग वेगळा आहे... पण, तरीसुद्धा नावाचा निर्णय हा निवडणुकीनंतरच व्हायला पाहिजे. नाहीतर हे लिहून ठेवा की, या नावाला फाटे फोडून वाद भलतीकडे नेला जाईल. हे काल्पनिक भय नाही. उद्या काय घडणार आहे, हे लंाबून दिसते आहे. म्हणून नावाची चर्चा आज करूच नका. निवडणूक होऊ द्या... 

देशातील महागाई, बेकारी, बेरोजगारी.... अंबानी-अदानीला देशातील संस्था विकणे... असे एक विषय नाही... १०० विषय आहेत. जे भाजपाविरोधात आहेत. घटनेची चौकट उचकटली जात आहे. ज्या डॉ. बाबासाहेबांनी ही घटना निर्माण केली ती घटना खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतो आहे. २०२४ ची निवणूक मोदींनी जिंकली तर २०२९ ची निवडणूक ही या देशात अमेरिकेसारखी थेट अध्यक्ष निवडण्याचीच निवडणूक होईल. आणि लोकशाहीचे दार बंद केले जाईल, ही भिती आहे.  हे मुद्दे प्रभावीपणे मांडा... त्यासाठी सूत्र एवढेच ठेवा... 
आधी निवडणुका जिंका... 
नेता नंतर ठरवा.. 

सध्या एवढेच...📞9869239977

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.