Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अख्ख्या कुटुंबाला सायनाईड देणारी जॉली जोसेफ अशी का वागली…?

अख्ख्या कुटुंबाला सायनाईड देणारी जॉली जोसेफ अशी का वागली…?

ती रात्रीच्या भयाण काळोखात नव्हे तर दिवसाढवळ्या उजेडात सगळ्यांना ठार करायची… तिच्या निशाण्यावर तिचे दुश्मन नव्हते तर तिच्या अत्यंत जवळची लोकं होती… प्रत्येकाच्या मृत्यूनंतर ती इतकी धाय मोकलून रडायची की समोरच्याचे डोळेही अश्रूंनी भरून यायचे… ती खुनी होती आपल्या नवऱ्याची, ती खुनी होती आपल्या सासू-सासऱ्यांची… तिने खुन केले तिच्या नातेवाईकांचे आणि ती खुनी होती अवघ्या दोन वर्षाच्या एका निरागस बाळाची…

जॉली जोसेफची थरकाप उडवणारी कहाणी

तुम्ही टीव्ही मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये असे अनेक भयंकर गुन्हेगार पाहिले असतील, जे अत्यंत निर्दयीपणे खून करतात आणि पोलिस त्यांचे काहीही नुकसान करू शकत नाहीत. केरळच्या कोझिकोडची जॉली जोसेफ अशा गुन्हेगारांपेक्षा अधिक भयंकर चालाख होती. जॉलीने 1997 मध्ये रॉय जोसेफशी लग्न केले. दोघांनाही दोन मुले होती. जॉली तिचे सासरे, पती आणि दोन मुलांसह अतिशय आरामात राहत होती. ती सगळ्यांसोबत हसायची, खेळायची आणि आनंदी असायची. मात्र तिच्या डोक्यात जो भयानक कट शिजत होता तो तिच्या चेहऱ्यावर किंवा बोलण्यामधून तिने कधीच जाणवू दिला नाही.

सासूला सूप पाजून ठार केलं

लग्नाच्या पाच वर्षानंतर 2002 मध्ये एका संध्याकाळी जॉलीच्या सासू अनम्मा जोसेफ मटण सूप पितात आणि सूप प्यायल्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू होतो. जॉली त्यावेळी घरीच असते. सासू गेल्यामुळे ती रडत रडत घर डोक्यावर घेते. सासूच्या मृत्यूमुळे जॉलीला इतका मोठा धक्का बसलाय की तिला सावरणं देखील कठीण जातयं. जॉलीच्या सासूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलयं. जॉलीच्या सासूबाई निवृत्त शिक्षिका होत्या. त्या संपूर्ण घर सांभाळायची पण आता सासूच्या निधनानंतर ती जबाबदारी जॉलीवर येऊन पडली आहे.


6 वर्षानंतर सासऱ्याची हत्या

सासूच्या मृत्यूनंतर काही वर्षे सर्व काही ठीक चाललयं. 2008 मध्ये जॉलीच्या सासऱ्यांनाही जेवण जेवल्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागतं. जेवण्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागतात आणि नंतर त्यांचा मृत्यूही होतो. घरातील हा दुसरा मृत्यू होता. जॉलीच्या सासऱ्यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते. त्या दिवशीही जॉली घरात एकटीच होती, पण तिच्यावर कोणालाच संशय आला नाही. आता घरात फक्त जॉली, तिचा नवरा आणि दोन मुलं उरली होती.

कडी-भात देऊन नवऱ्याला मारलं…

2011 मध्ये, जॉलीच्या घरात संशयास्पद परिस्थितीत आणखी एक मृत्यू झाला. यावेळी पाळी होती ती जॉलीच्या नवऱ्याची… रॉय जोसेफची! रॉय जोसेफचा मृतदेह त्याच्या बाथरूममध्ये सापडला. बाथरुम आतून बंद आहे आणि रॉयच्या तोंडातून फेस येतोय. रॉयने काही वेळापूर्वी कडी आणि भात खाल्ला होता. जोसेफ कुटुंबात संशयास्पद परिस्थितीत झालेला हा तिसरा मृत्यू आहे. या मृत्यूनंतर रॉय यांच्या घराजवळ राहणारे त्याचे मामा एमएम मॅथ्यू यांनी रॉयच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करतात. रॉय जोसेफचे पोस्टमॉर्टम होते आणि धक्कादायक सत्य समोर येते. शवविच्छेदन अहवालात रॉयला विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे, पण कोणी? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना सापडत नाही.

प्रत्येक हत्येनंतर ती रडायची

2014 मध्ये एका संध्याकाळी, जॉली जोरजोरात किंचाळते आणि आणि सर्वांना ओरडून सांगते की मॅथ्यू बेशुद्ध झालायं. शेजारी राहणारे लोकं मॅथ्यूला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू होतो. जोसेफ कुटुंबातील हा चौथा मृत्यू होता आणि प्रत्येक वेळी जॉली मृत्यूच्या वेळी तेथे उपस्थित होती, तरीही कोणीही तिचे काहीही नुकसान करू शकले नाही. ती सगळ्यांच्या समोर कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्तींच्या नावाने गळा काढायची परंतू एकटी असताना अतिशय आनंदी असायची. आता कुटुंबातील सर्व सदस्य जवळज‌ल मारले गेले होते. मात्र प्रश्न हा होता की जॉली या सगळ्यांना का मारतेय? या प्रश्नाचे उत्तर तेव्हाच कळेल, जेव्हा खुनी कोण हे स्पष्ट होईल.


2 वर्षाच्या निरागस बाळाचीही हत्या

2014 मध्ये कुटुंबातील पाचवा मृत्यू एका निष्पाप 2 वर्षाच्या मुलीच्या रूपाने होतो. जॉलीच्या दोन दिरांपैकी एक दिर शाजू याचे कुटुंब तिच्या घरापासून जवळच राहत होते. त्यांच्या कुटुंबात शाजूशिवाय पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी अल्फिन होती. त्या दिवशी त्या दोन वर्षाच्या निरागस मुलीने नाश्ता केला जो तिचा शेवटचा नाश्ता ठरला. मुलीला उलट्या होतात आणि नंतर तिचा मृत्यू होतो. जॉलीने लहान मुलीलाही सोडत नाही. पण का..?

दिराच्या बायकोला संपवले हत्या झाली

या कुटुंबात 2016 मध्ये सहावा आणि शेवटचा मृत्यू होतो. निधन झालेल्या व्यक्तीचे नाव सिली होते, जी जॉलीच्या दिराची म्हणजे शाजूची पत्नी आणि अल्फिनची आई होती. सिली तिच्या घरात आहे, जॉलीही तिथे हजर आहे. अचानक सिली बेशुद्ध पडते आणि जॉलीसमोर तिचा मृत्यू होतो. आधी शाजूची मुलगी वारली आणि आता त्याची बायकोही. या गावात जोसेफ कुटुंबातील लोक एकामागून एक मरत आहेत. आता फक्त जॉली, तिची दोन मुले आणि मेहुणा शाजू उरले आहेत. 2017 मध्ये जॉली तिच्या दिराशी म्हणजे शाजूशी लग्न करते.

कबरीतून मृतदेह बाहेर काढले

जॉलीचा दुसरा दिर रोजो आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहतो. घरातील सहाव्या मृत्यूनंतर त्याला संशय येतो. तो पोलिसात गुन्हा दाखल करतो आणि 2011 साली झालेल्या रॉय जोसेफ प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडली जाते. पोलीस तपास करतात. त्या 14 वर्षात झालेल्या सहाही हत्यांमागील हेतू आणि मृत्यूचे कारणही शोधून काढतात. सहाही लोकांच्या कबरी खोदून ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले जातात. रॉय जोसेफसह कुटुंबातील सहाही जणांना सायनाइड देऊन ठार केल्याचे यावेळी स्पष्ट होते. प्रत्येक मृत्यूच्या वेळी जॉली हजर असल्याने पोलिसांचा संशय तिच्यावर येतो.

जॉलीने बनावट मृत्युपत्र बनवले

जॉलीला 2019 मध्ये अटक करण्यात येते. मात्र संपूर्ण कुटुंब संपवणाऱ्या जॉलीच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नाही. पोलिसांच्या दबावासमोर ती या सगळ्या हत्यांची कबुली देते. प्रॉपर्टीच्या लालसेपोटी एकामागोमाग एक असे खुन केल्याचे ती सांगते. जॉलीला घराचा पूर्ण ताबा हवा असतो म्हणून ती सायनाईड देऊन सगळ्यांना संपवते. याच दरम्यान तिने बनावट मृत्युपत्र करून संपूर्ण मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली आणि नंतर पतीची हत्या केली.

प्रचंड थापा मारायची…

केरळमधील या सिरियल हत्याकांडात जॉली जोसेफ व्यतिरिक्त तिच्या इतर तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली होती, ज्यापैकी एक सोनार होता. सोनारानेच तिला हत्येसाठी सायनाइड पुरवले होते. तेच सायनाईड ती तिच्या घरच्यांच्या जेवणात मिसळून त्यांना मारायची. ती दिसायला इतकी निष्पाप दिसत होती की ती खून करू शकते याचा विचारही कोणी करू शकत नव्हता. जॉलीच्या अटकेनंतर तिच्या खोटेपणाची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. आपण पोस्ट ग्रॅज्युएट आहे असे ती सांगायची आणि NIT मध्ये प्रोफेसर असल्याचा ती दावा करायची. परंतु प्रत्यक्षात तिने पदवीच्या दुसऱ्या वर्षांपुढे शिक्षण घेतले नव्हते.

नेटफ्लिक्सवर ‘करी अँड सायनाइड’

जॉली जोसेफने केलेल्या या हत्याकांडावर नेटफ्लिक्सने ‘करी अँड सायनाइड’ ही डॉक्युमेंट्री तयार केली असून अलीकडेच या सिरीजचा ट्रेलर नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे. ही डॉक्युमेंट्री 22 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.