Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रतिभाताई...नाबाद ९०- मधुकर भावे

प्रतिभाताई...नाबाद ९०- मधुकर भावे



देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताईंचा ८९ वा वाढदिवस मंगळवार दिनांक १९ डिसेंबर रोजी आहे. त्या दिवशी त्या ९० व्या वर्षात पाऊल ठेवतील. ताईंना आयुष्यभर साथ देणारे त्यांचे पती, अमरावतीचे पहिले महापौर,  १९८५ चे आमदार, प्राचार्य देवीसिंह शेखावतसाहेब यांचे दु:खद निधन याच वर्षात झाल्यामुळे यावर्षी ताई स्वत:चा वाढदिवस साजरा करणार नाहीत.  त्यांच्या शोकाकूल कुटुंबियांच्या दु:खात आपण सगळे सहभागी आहोत. तरीही वाढदिवसाच्या िनमित्ताने ताईंचे मोठेपण सांगायला हवेच... 

मार्च १९६२ ते २४ जुलै २०१२... बरोबर ५० वर्षांचा ताईंचा हा राजकीय प्रवास आहे.  वयाच्या २८ व्या वर्षी एम. ए. एल.एल.बी होऊन ताई लगेच राजकारणात आल्या. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसच्या उमेदवार म्हणून जळगावमधून उभ्या राहिल्या. १९६२, ६७, ७२, ७८, ८० सलग पाच वेळा त्या आमदार राहिल्या. त्याच काळात उपमंत्री, कॅबिनेट मंत्री..., विधानसभेत विरोधी पक्षनेत्या, नंतर राज्यसभेच्या सदस्या, मग राज्यसभेच्या उपाध्यक्षा, मग अमरावतीच्या खासदार, मग २००४ साली राजस्थानच्या राज्यपाल... आणि २५ जुलै २००७ ला देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती.... अबब... सलग ५० वर्षांचा हा राजकीय प्रवास... खान्देशच्या एका छोट्या गावातील एका भगिनीचा. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा. त्या ताई आता ९० व्या वर्षात पाऊल ठेवित आहेत. त्यांना शताब्दी साजरी करण्याचे भाग्य लाभो, अशी प्रार्थना. 

महाराष्ट्र  अनेक बाबतीत आघाडीवर आहे. राजकारणात आहे... समाजकारणात आहे... सुसंस्कृतपणात आहे... समान संधीमध्येही आहे. याच महाराष्ट्रात अनेक कर्तृत्त्ववान भगिनींनी अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. त्यात राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, संगीत, चित्रपट असे एकही क्षेत्र नाही, जिथं महाराष्ट्रातील भगिनी उंचच उंच शिखरावर पोहोचलेली नाही. त्याची यादी द्यायची झाली तर तो स्वतंत्र लेख होईल. सध्या ताईंच्या संदर्भात विचार करायचा तर, राजकारणाच्या क्षेत्रातही ७० वर्षांपूर्वीच्या काळापासून मुंबई राज्य आणि नंतरचे महाराष्ट्र राज्य महिलांच्या कर्तृत्त्वाच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे. १९४६ च्या त्यावेळच्या मुंबई विधानसभेत लिलावती मुन्शी या एका भगिनीनेच आमदार असताना त्यावेळच्या सरकारच्या खनपटीला बसून ‘द्विभार्याप्रतिबंधक कायदा’ मंजूर करून घेतला होता. विधेयक मांडले तेव्हा बाळासाहेब खेर मुख्यमंत्री होते. २४ सप्टेंबर १९४६ला हे विधेयक मुंबई विधानसभेने मंजूर केलेले आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी कायद्यांमध्ये हे पहिले विधेयक आहे. ते एका भगिनीने मांडले. मंजूर करायला भाग पाडले. तीच परंपरा पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक कर्तृत्त्ववान भगिनींनी पुढे चालवली आहे. आणि त्यातीलच एक भगिनी म्हणजे आपल्या प्रतिभाताई.... देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. २०० वर्षे लोकशाही असलेल्या अमेरिकेलाही महिलेला राष्ट्राध्यक्ष करणे अजूनही शक्य झालेले नाही. ते या देशाने घडवले. आणि पहिली भगिनी राष्ट्रपती झाली ती महाराष्ट्राची. 

महाराष्ट्राच्या विधान मंडळालाही कर्तृत्त्ववान महिलांची बरिच मोठी परंपरा आहे. जरी त्या काळातील स्त्रीया... ‘चूल आणि मूल’ याच भोवती गुरफटल्या होत्या. अनेक बंधने होती. पुरुषी अहंकार होते. या सगळ्यावर मात करूनही महाराष्ट्र विधानमंडळात अनेक कतृत्त्ववान स्त्रियांनी मंत्रिपदे भूषविली. चांगल्याप्रकारे  खाती सांभाळली. काही चांगले निर्णय केले. अशा महिला मंत्र्यांमध्ये अक्कलकोटच्या निर्मलाराजे भोसले, नागपूरच्या डॉ. सुशीला बलराज, खान्देशच्या प्रतिभाताई पाटील, प्रभा राव, शरदचंद्रिका पाटील, शालिनीताई पाटील, पुष्पाताई हिरे, विमल मुंदडा, सुर्यकांता पाटील, फौजिया खान, वसुधाताई देशमुख, चंद्रिका केनिया, रजनीताई सातव, शालीनी बोरसे, ताराबाई वर्तक, मनिषा निमकर, सुलेखा कुंभारे, शोभा बच्छाव, प्रमिला टोपले, शोभाताई फडणवीस, अलिबागच्या मिनाक्षी पाटील (खारलँड कायदा आणि रेवस बंदर हे तर मिनाक्षी बंदरे राज्यमंत्री होत्या तेव्हा झाले) शांती नाईक, वर्षा गायकवाड, पंकजा मुंडे, यशोमती ठाकूर, सध्याच्या आदिती तटकरे, अशी मंत्री महिलांची यादी आहे. काही नावे अनावधानाने राहिली असतील... विधानमंडळात सर्वच महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली नाही. तरी आमदार म्हणून सत्ताधारी बाकावरील डॉ. अंजनाताई मगर, कुसुमताई कोरपे, विमलताई रांगणेकर, निर्मला ठोकळ, डॉ. प्रभा सोनावणे, प्रतिभाताई ितडके, मामी भुवड, कोकीळाबाई गावंडे, श्रद्धा टापरे, दमयंती देशभ्रतार आणि विरोधी बाकावरील मृणालताई गोरे, कुसुमताई अभ्यंकर या सर्वच भगिनींनी संसदीय व्यासपीठावर सभागृहातील चर्चेचा दर्जा उंचावला. या यादीतही आणखी एक गंमत अशी की, आमदार किंवा मंत्री असलेल्या या भगिनींपैकी प्रतिभाताई पाटील राजस्थानच्या राज्यपाल झाल्या आणि प्रभाताई राव हिमाचलप्रदेशच्या राज्यपाल झाल्या. पुरुष आमदारांपैकी आर. डी. भंडारे (बिहार), वसंतदादा पाटील (राजस्थान) डी. वाय. पाटी, (त्रिपुरा, बंगाल, बिहार), रा. सू. गवई (बिहार), शिवराज पाटील (पंजाब), सुशीलकुमार शिंदे (आंध्रप्रदेश), सुधाकरराव नाईक (हिमाचल), राम कापसे (अंदमान), राम नाईक (उत्तर प्रदेश) सध्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे ही महाराष्ट्रात आमदार होते, मंत्री होते... आता ते पंजाबचे राज्यपाल आहेत. यात आणखी एक गंमतीचा तपशील आहे... महाराष्ट्रात मंत्रीपदे भूषविलेले यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि शिवराज पाटील हे चौघेजण केंद्रात गृहमंत्री झाले. सुशीलकुमार यांची तर आणखी गंमत अशी की, ते आगोदर आध्रप्रदेशचे राज्यपाल झाले... (२००४) आणि २०१२ ला केंद्रात गृहमंत्री झाले. राज्यपालाचा केंद्रीय गृहमंत्री झालेले सुशीलकुमार हे एकमेव... आणि राज्यपालाच्या थेट राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटील याही पहिल्याच महिला राष्ट्रपती. तसे शंकर दयाळ शर्मा महाराष्ट्रात राज्यपाल होते. पुढे ते उपराष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपतीही झाले.... 

महाराष्ट्रात कोणत्याही महिलेला मात्र मुख्यमंत्री होता आलेले नाही. १९८० साली बॅ. अंतुले यांना वसंतदादांनी विरोध केला होता आणि मुख्यमंत्री पदासाठी दोन नावे इंिदराजी गांधी यांना दिली होती. त्यातील एक नाव प्रतिभाताईंचे होते. दुसरे नाव निलंगेकरांचे. पुढे दादांनी १९८५ साली निलंगेकरांना मुख्यमंत्री केले. पण, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री अजून झाली नाही. हा मान पहिल्यांदा उत्तर प्रदेशला मिळाला. सुचिता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या. त्यानंर मायावती, (यूपी) जयललिता, जानकी रामन (तामिळनाडू), नंदिनी सत्पथी (ओरिसा), वसंुधरा राजे (राजस्थान), शीला दिक्षीत (दिल्ली़) आनंदीबेन पटेल (गुजराथ), तर सांगत होतो, प्रतिभाताईंबद्दल... ताईंचे माहेर खान्देशातील... त्या सात-आठ वर्षांच्या असताना त्यांच्या गावात ब्रिटीश कलेक्टर येणार होता. त्यांनी त्यांचे वडील नानासाहेब यांना विचारले की, ‘बाबा, कलेक्टर मोठा की राज्यपाल?’ वडीलांनी उत्तर दिले, ‘अगं बेबी, राज्यपाल मोठा...’ मग त्या लहानग्या बेबीने त्यावेळी वडीलांना सांगितले... ‘बाबा, मग मी राज्यपाल होईन...’ आणि २००४ साली राजस्थानच्या राज्यपाल म्हणून ताईंचा शपथविधी झाला तेव्हा ताईंच्या डोळ्यांत अश्रू आले. त्या अश्रूत त्यांना त्यांचे वडील नानासाहेब दिसत होते.  

उपमंत्री आणि मंत्री म्हणून ताईंची कारकीर्द अतिशय स्वच्छ, स्पष्ट, त्यांच्याकडे असलेल्या   प्रत्येक खात्याला न्याय देणारी आणि सामान्य माणसाला दिलासा देणारी होती. आरोग्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, समाजकल्याण मंत्री अशी विविध खाती ताईंनी सांभाळली. ज्या काळात रेशनसाठी रांगा लागत होत्या, त्या काळात अन्न नागरी पुरवठा खाते सांभाळणे हे कठीण होते. पण, ताईंनी ते खाते छान सांभाळले. सभागृहात त्यांची कधीही फजिती झाली नाही. विरोधी पक्ष संख्येने लहान होता. पण, गुणवत्तेत भारी होता.  १९६७ साली काँग्रेसच्या बाकावर २०२ अामदार होते. १९७२ साली २२२ आमदार होते.... कल्पना करा की, सरकार किती मजबूतीत होते... पण, त्यावेळचे विरोधी बाकावरील ५० जण बहुमतात नसले तरी लोकांच्या नाडीवर त्यांचा हात होता. त्यामुळे अनेक विषयांत सरकारला जेरिस आणण्याचे काम विरोधकांनी केले. ती यादी खूप मोठी आहे. पहिल्या बाकावर आचार्य अत्रे, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, नंतर दि. बा. पाटील, गणपतराव देशमुख यांचा सामना करणे सोपे नव्हते.  अनेक समर प्रसंग विधानसभेत घडले. पण, सुदैवाने विधानसभेत सलग १० वर्षे बाळासाहेब भारदे हे अध्यक्ष. आणि विधान परिषदेत वि. स. पागे यांच्यासारखा विद्वान सभापती.  त्यावेळचे सभागृह, मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी सदस्य, त्या सर्वांची बांधिलकी  महाराष्ट्राशी होती. तसे सभागृह आता होणे नाही. ताई उपमंत्री झाल्या तेव्हा उपमंत्र्याला सरकारी वाहन नव्हते.  टॅक्सीने यावे लागायचे. उपमंत्र्याला शासकीय बंगला नव्हता. आमदार निवासात रहावे लागायचे. आजच्या सारख्या कायम खोल्या आमदारांना नव्हत्या. कोटी-कोटींचा आमदार फंड नव्हता. पहिल्या विधानसभेतील मंत्र्यांचा पगार ५०० रुपये होता. आणि मंत्र्याला घरभाड्यासाठी १०० रुपये होते. आमदारचा पगार महिना ७५ रुपये होता. आणि विधानसभा अिधवेशनाच्या बैठकीचा भत्ता दिवसाचा तीन रुपये होता. पुढे हे सगळेच बदलत गेले. तो नंतरचा भाग आहे. पण या सर्व काळात मंत्री म्हणून सभागृहात स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याचे काम प्रतिभाताईंनी अतिशय प्रभावीपणे केले. अनेक भगिनींची नावे दिली  आहेत... या सर्व आमदार भगिनींमधून खासदार, राज्यसभा सदस्य, राज्यसभेच्या उपसभापती, राजस्थानच्या राज्यपाल आणि नंतर राष्ट्रपती, हा एवढा मोठा राजकीय प्रवास प्रतिभाताईंच्या कर्तृत्त्वाचाच भाग होता. २००४ साली त्या राजस्थानच्या राज्यपाल झाल्या. २००७ ला डॉ. अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आला होता. त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान होते. यू.पी.ए. च्या बैठकीत नवीन राष्ट्रपती उमेदवार निवडीसाठी चर्चा सुरू झाली तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. ए. बी. बर्धन यांनी सुचविले की, 

‘राष्ट्रपतीपदासाठी आपण महिलेच्या नावाचा का विचार करू शकत नाही...?’ त्यावेळच्या यु.पी.ए. च्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी लगेच म्हणाल्या की... ‘नाव सुचवा...’ बर्धन लगेच म्हणाले की..... ‘आमच्या अमरावतीच्या प्रतिभाताई.... अभी तो राजस्थानमें राज्यपाल हैं....’ पाच मिनटांत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव ठरले. शरद पवारसाहेबांनी लगेच प्रतिभाताईंना फोन लावला. मग सोनियाजी बोलल्या... त्यांनी प्रस्ताव सांगितला... ताई तेव्हा माऊंट अबूला होत्या. जयपूरला परतत होत्या... फोनवर त्या म्हणाल्या ‘ओ माय गॉड...’ आणि ताई २५ जुलै २००७ ला राष्ट्रपती झाल्या.  २५ जुलै २०१२ ला त्यांचा कार्यकाळ संपला. आणि प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती झाले. 

ताईंच्या कर्तृत्वाची एक मोठी घटना महाराष्ट्र विधानसभेत घडली ती सांगायला हवी. महाराष्ट्र विधानमंडळात विरोधी पक्षाने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल आठ दिवस कामकाज रोखून धरले होते. बाहेर उद्रेक होता... मुख्यमंत्री वसंतदादा होते. सभागृहातील चर्चेला उत्तर द्यायला दादा तयार नव्हते. ताईंनी कॅबिनेट बैठकीत ठामपणे सांगितले की, ‘चर्चेला उत्तर द्यावेच लागेल.... विषय गंभीर आहे... सामाजिक आहे... नाजूक आहे...’ दादा म्हणाले, ‘तुम्ही देता का उत्तर....’ ताई म्हणाल्या, ‘हो... तसा तो विषय माझ्याकडे असलेल्या समाजकल्याण खात्याचाच आहे....’ दादा म्हणाले, ‘द्या...’ उत्तराच्या वेळी दादा हजर राहिले. ताईंचे उत्तराचे भाषण दोन तास झाले. ९ डिसेंबर १९८३ चा तो दिवस. नागरपूरचे अिधवेशन... विरोधी पक्षनेते ग. प्र. प्रधान... अभ्यासू नेते... ताईंनी तब्बल २ तासांत विरोधी पक्षाच्या प्रत्येक मुद्यांचे खंडन केले.  प्रधानसाहेबांकडे बघून त्या म्हणाल्या की, ‘आमचे राजकीय अभिनव्ोष आणि आमच्या पक्षाची मतेसुद्धा बाजूला ठेवूनही सामाजिक न्यायासाठी आम्हाला हा निर्णय अंमलात आणावाच लागेल...’ प्रधानसाहेबांना उद्देशून त्या म्हणाल्या की, ‘धर्म मार्तंडांनी धर्माचा अर्थ चुकीचा सांगितलेला आहे. 

जगन्नाथपुरीच्या मंिदरात लॉड माऊंट बॅटन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र गेले होते... माऊंट बॅटन यांना बूट घालून मंिदरात प्रवेश करू दिला गेला आणि बाबासाहेबांना बाहेर अभे ठेवले गेले, हे तुम्हाला मंजूर आहे का?... सभागृहात कमालीची शांतता  होती. आणि मग ताई म्हणाल्या, ‘ केवळ नोकऱ्यांसाठी नाही तर मनाचा मागसलेपणा घालवण्याकरिता ही मंडल आयोग आहे...’ ताईंचे भाषण संपल्यावर सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके वाजवलेले आजही आठवते. 

ताईंची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी ठरली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर करून टाकले की, ‘शिवसेनेची युती भाजपबरोबर असली तरी महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेचे आमदार प्रतिभाईंनाच मते देतील. भाजपाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार भैरोसिंग शेखावत यांना मते देणार नाहीत... शिवसेना आमदारांची मते आम्ही आमची महाराष्ट्र कन्या प्रतिभाताईंनाच देणार...’  त्यावेळी प्रतिभा देविसिंह शेखावत विरुद्ध भाजपाचे भैरोसिंह शेखावत असा राष्ट्रपतीपदाचा सामना झाला. आणि ताई त्यात िजंकल्या. ताई या सासरच्या शेखावत. बाळासाहेबांचे आभार मानायला त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते. दिल्लीहून ताईंचाही फोन आला. २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताना शिवसेनेला काँग्रेस आमदारांनी पाठींबा दिला होता आणि काँग्रेस पक्ष सरकारात सहभागी झाला होता. त्याची मूळं बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना शिवसेना आमदारांची मते देण्यापर्यंत खूप खोलवर आहेत. 

ताई राष्ट्रपती झाल्या तेव्हाची एक आठवण... महाराष्ट्रात त्या गृहनिर्माण खात्याच्या उपमंत्री होत्या... त्यांचे कॅबिनेटमंत्री यशवंतराव मोहिते होते. मोहितेसाहेबांचा अभ्यास फार भारी होता. िनर्णयक्षमता मोठी होती. ताईंना ते मोठ्या भावासारखे होते. ताई राष्ट्रपती झाल्यावर ताईंना कळले की, ‘मोहितेसाहेब आजारी आहेत...’ ताई दिल्लीहून थेट कराडजवळील रेठरे बुद्रुक येथील त्यांच्या शेतातल्या घरी त्यांना भेटायला गेल्या. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा पहिला दौरा त्यांच्या अमरावती गावचा... आणि दुसरा दौरा रेठरे बुद्रुकचा. ताईंना पाहताच मोहितेसाहेबांच्या डोळ्यांत पाणी आले... ताई म्हणाल्या, ‘मी राष्ट्रपती म्हणून आली नाही... तुमची बहिण म्हणून आली आहे..’ 

१९८१ साली बॅ. अंतुलेसाहेब मुख्यमंत्री असताना ७ अॅाक्टोबर रोजी लातुर येथे त्यावेळचे आमदार विलासराव देशमुख यांनी अंतुले साहेबांचा भव्य सत्कार केला होता. त्या सत्कारात अंतुलेसाहेबांनी विलासरावांच्या मागणीनुसार ‘लातुर हा स्वतंत्र्य जिल्हा झाल्याची’ घोषणा केली होती. अंतुले साहेबांच्या मंत्रिमंडळात विलासराव नव्हते. पुढे २००७ साली लातुर जिल्हा निर्मितीला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी विलासराव मुख्यमंत्री होते. लातुर जिल्हा निर्मितीचा रौप्य महोत्सव दणक्यात करायचे ठरले. उद्घाटन अंतुले साहेबांच्या हस्ते ठरले. आणि समारोप राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या हस्ते ठरला. अंतुलेसाहेब उद्घाटनाला आले. भाषणाला उभे राहिले... म्हणाले, ‘विलासराव, २५ वर्षांपूर्वी मी मुख्यमंत्री असताना तुम्हाला माझ्या मंत्रिमंडळात घेतले नव्हते. पण, ते लक्षात न ठेवता... लातूर जिल्हा दिला म्हणून तुम्ही २५ वर्षांनी माझी आठवन ठेवून जिल्हानिर्मिती महोत्सवाला मला आमंत्रित केलेत... राजकारणात २५ दिवस कोणी ओळख ठेवत नाही... मी आता सत्तेत नाही... अनेक अडचणींना तोंड देवून जिवंत आहे... तुम्ही माझी आठवण ठेवलीत... एक जिल्हा देणे मुख्यमंत्र्याला अवघड नाही... आता तुम्ही मुख्यमंत्रीच आहात... पण, २५ वर्षांनंतर आठवण ठेवणे मुख्यमंत्री पदापेक्षा एक माणूस म्हणून अिधक महत्त्वाचे आहे...’ अंतुलेसाहेबांच्या डोळ्यांत तेव्हा पाणी आले... आणि विलासरावांचे डोळेही पाणावले. 

समारोपाला राष्ट्रपती प्रतिभाताई आल्या. राष्ट्रपती झाल्यावर त्यांचा तो तिसरा कार्यक्रम... ताेही महाराष्ट्रात.. विलासरावांनी ताईंचे स्वागत केले.. ‘महाराष्ट्राची भगिनी राष्ट्रपती झाली याचा आनंद व्यक्त केला. जिल्हा महोत्सवासारख्या तसं म्हटलं तर छोट्या कार्यक्रमाला राष्ट्रपती असताना ताई, तुम्ही आलात आमच्या लातुरकरांचे भाग्य...’ 

ताई भाषणाला उठल्या.... ताई म्हणाल्या... ‘मी राष्ट्रपती होण्यासाठी जेव्हा महाराष्ट्रातल्या आमदारांना विनंती करायला आले तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात... आणि सांगितलेत की, ‘एक मत इकडचे तिकडे होणार नाही...’ एवढेच नव्हे तर शिवसेनेची मते मिळवण्याकरिता तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांनाही भेटलात... हे मला समजले. बाळासाहेबांनीच सांगितले. मी हे कसे विसरू शकेन...’ आणि तेव्हाही विलासरावांच्या डोळ्यांत पाणी आले.... 
अशा या ताई... मंगळवारी ९० व्या वर्षात पाऊल ठेवित आहेत.  त्यांना आयुष्यभर साथ देणारे त्यांचे प्रिय पती शेखावत साहेब याच वर्षी हे जग सोडून गेले... ते दु:ख पचवून आज ताई सामाजिक विचाराने आपल्या सर्वांसमवेत आहेत.  त्यांना शताब्दी साजरी करण्याचे भाग्य लाभो... एवढीच प्रार्थना.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.