Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवैध दारू विक्री विरोधात धामणी येथील महिलांचा रास्ता रोको

अवैध दारू विक्री विरोधात धामणी येथील महिलांचा रास्ता रोको

कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धामणी येथे मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्री होत असल्याने या गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावली असून, अनेक गोरगरीब महिलांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिला आक्रमक झाल्या असून, त्यांनी अवैध दारू विक्री विरोधात एलगार पुकारून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.


त्यानुसार २६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता धामणी येथील महिलांनी कारंजा मनोरा मार्गावरील पसरणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्याचे दिसून आले. शिवाय रस्यात्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याचे देखील पहावयास मिळाले.  यावेळी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलक महिलांशी चर्चा केली आणि पुढील आठ दिवसात धामणी येथील अवैध दारू विक्री पूर्णतः बंद करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संतप्त महिलांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. धामणी येथे १० ते १२ जणांकडून अवैध दारू विक्री केल्या जात असून, संबंधित बीट जमादार व ठाणेदार हे यांना अभय दिल्या जात असल्याने या गावात दारूचा सुळसुळाट झाला असून, विद्यार्थी व युवक व्यसनाधीनतेच्या वाटेवर जात आहे. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था सुद्धा भंग झाली आहे. शिवाय गोरगरीब महिलांचे संसार देखील उघड्यावर आल्याने या गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी येथील महिलांनी केली होती.

या पूर्वी १५ ऑटोबरला कारंजा मानोरा मार्गावरील धामणी पसरणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी दारूबंदी करण्याचे आश्वासन दिल्याने  आक्रमक महिलांनी हा रास्ता रोको स्थगित केला होता. त्यानंतर मात्र कारवाई झाली नसल्याने पोलिसांनी खोटे आश्वासन दिल्याचे म्हणत पुन्हा एकदा याच ठिकाणी २६ डिसेंबरला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिराबाई ठेवरे, शोभा धनवे, मीरा सावळे, संध्या सुर्वे, चंद्रकला तुरे, शशिकला निंबाळकर, अनिता गूजकर, देवकी विरोळकर व प्रमिला सावरकर यांच्यासह इतर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.