शेंबड्या' म्हणत चिडवलं, 8 वर्षाच्या मुलीचा 'त्याने' जीवच घेतला
नालासोपाऱ्यात एका 8 वर्षीय चांदनी साहची हत्या करून तिचा मृतदेह एका बंद खोलीतील गोणीत कोंबून ठेवल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. या 8 वर्षीय निष्पाप चांदनीची हत्या कुणी केली असावी असावा असा मोठा प्रश्न होता. अखेर या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील आरोपीचे वय आणि हत्येमागचे कारण ऐकून पोलिसांना हादरा बसला आहे. नेमका हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊयात.
वसई फाटा येथील वाण्याचा पाडा या भागात विजय साह यांचे कुटुंबीय राहते. विजय यांना चांदनी साह नावाची 8 वर्षाची मुलगी आहे. चांदनी साह ही जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. 1 डिसेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घराजवळील दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेली असता ती अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर विजय साह यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. चाळीतील एका बंद खोलीत दुर्गंधी येत होती. या दुर्गंधीनंतर स्थानिकांनी खोली उघडताच चांदनीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती स्थानिकांनी पेल्हार पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी चांदनीच्या हत्येचा तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचे पोलिसांना कळाले. यावेळी अल्पवयीन मुलाच्या वडिलांची चौकशी केली असता हत्येचा उलगडा झाला.
‘या’ कारणामुळे रचला हत्येचा कट
मृत मुलगी चांदनी साह आरोपी मुलाला शेंबड्या शेंबड्या नावाने चिडवायचे. चांदनीच्या या चिडवण्याचा आरोपी 15 वर्षीय मुलाला नेहमी राग यायचा. याच रागातून अल्पवयीन मुलाने चांदनी साहचा गळा दाबून तिची हत्या केली. या हत्येनंतर त्याने हा संपूर्ण घटनाक्रम वडिलांना सांगितला होता. त्यानंतर वडिलांना चांदनीचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याला मदत केली. त्यानुसार वडिलांनी चांदणीचा मृतदेह बंद खोलीत एका गोणीत कोंबला होता. तसेच नायलॉनच्या दोरीने तिचे हात-पाय बांधण्यात आले होते. चांदनीचा मृतदेह खोलीत ठेवून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार होती.मात्र त्याआधीच ही घटना उघडकीस आली. या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपी फरार आहे. तर त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. आणि दोन्ही बाप-लेकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.