प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेमविवाह करणे तरुणीच्या अंगलट आले आहे. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी ही घटना घडली आहे. यामध्ये 6 महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
साक्षी अक्षय गाडे ( वय 20) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी मंचर परिसरातील माळवाडी इथल्या संकल्प रेसिडेन्सी या ठिकाणी घडली होती. याबाबत आता संबधित मुलीची आई अरुणा संजय गांजाळे (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येस पतीच कारणीभूत असल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटलं आहे.
साक्षी आणि अक्षय यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी न्यायालयात जाऊन लग्न केले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे हिंदू रिती रिवाजाप्रमाणे गणराज मंगल कार्यालय मंचर येथे दि.12 जून 2023 रोजी लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली. अक्षयने 'कॅफेमध्ये साहित्य खरेदीसाठी केलेली पैशाची मागणी पूर्ण केली. त्यानंतर "कर्ज झाले आहे असे सांगून दोन लाख रूपयांची मागणी अक्षयने केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर "मी साक्षीला सांभाळणार नाही, तिला मारून टाकीन. मला कोणीही काही करू शकत नाही. मी यापूर्वी 50 हजार रुपये खर्च करून दुसऱ्या मुलीचा मॅटर सॉव्ह केला आहे. त्यामुळे हा मॅटर सुध्दा मी सॉल्व करू शकतो." अशी धमकी त्याने दिली.
तसेच त्याचे दुसरीकडे अनैतीक संबंध होते. हे साक्षीच्या निदर्शनास आले. तेव्हा साक्षीने विरोध करायाला सुरुवात केली. अक्षय हा दारू पिऊन येऊन साक्षीला मारहाण करत होता. तसेच त्याने साक्षीला भररस्त्यावर देखील मारहान केली होती. हा सर्व प्रकार साक्षीने मला सांगितला होता, असे फिर्यादीत आईने नमूद केले आहे. 'माझ्या मुलीच्या मृत्यूस तिचा नवरा अक्षय हाच कारणीभूत असल्याचे' फिर्यादीत म्हटले आहे.अरुणा संजय गांजाळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अक्षय गाडे विरुद्ध दाखल केला आहे. तपास सुरु असून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.