बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर फेकले अॅसिड; नंतर स्वतः प्यायले, 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
राष्ट्रीय राजधानीच्या आनंद पर्वत परिसरात गुरुवारी एका व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड फेकले आणि नंतर स्वतः अॅसिड प्यायले. यात आरोपीचा मृत्यू झाला. बलात्काराच्या खटल्याचा सामना करत असलेल्या 54 वर्षीय व्यक्तीने 17 वर्षीय मुलीवर तिच्या घराबाहेर अॅसिड फेकले. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी आम्हाला आनंद पर्वत पोलिस ठाण्यात अॅसिड हल्ल्याची माहिती मिळाली. पोलीस पोहोचेपर्यंत अल्पवयीन मुलगी आणि आरोपी प्रेमसिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अॅसिड हल्ल्यात भाजलेल्या अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की तिच्या आईने प्रेम सिंगवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या घरी लग्नसमारंभ असल्याने त्यात हजर राहण्यासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी प्रेमसिंग याने मुलीला तिच्या आईने बलात्काराचा खटला मागे घ्या, अशी धमकी दिली. मात्र, मुलीने तसे करण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर अॅसिड फेकले आणि स्वतः अॅसिड प्यायले.
दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की अॅसिड हल्ल्यात मुलगी किरकोळ भाजली असून आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसिंगविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा खटला सुरू आहे. या प्रकरणी तो तुरुंगात होता. 29 नोव्हेंबर रोजी त्याच्या घरी लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामिनावर बाहेर आला होता.
अॅसिडच्या ऑनलाइन विक्रीबाबत कडक सूचना -
काही दिवसांपूर्वीच, ग्राहक संरक्षण नियामक CCPA ने ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऍसिडची विक्री थांबवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ग्राहकांना अनिवार्य आवश्यकतांचे पालन केल्याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अॅसिड खरेदी करू नये, असा इशारा दिला. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अॅसिड खरेदीला परवानगी देणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि गृह मंत्रालयाच्या सल्ल्याचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे सीसीपीएने म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.