Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोन्याचे विमान-कार! 50 अब्जांचा महाल..

सोन्याचे विमान-कार! 50 अब्जांचा महाल..

लंडन : आधुनिक काळात अनेक देशांनी लोकशाही स्वीकारलेली आहे. त्यामुळे राजे-महाराजांचे दिवस आता इतिहासजमा झाले, असे आपण म्हणत असलो तरी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अजूनही राजेशाही सुरू आहे. अशा राजांची संपत्ती, त्यांचा शाही थाट लोकांच्या कुतुहलाचा विषय असतो. ब्रुनेईचे सुल्तान हसनल बाल्कियाह यांच्या श्रीमंतीची चर्चाही सतत सुरू असते. 50 अब्ज रुपये किमतीच्या महालात राहणाऱ्या या सुल्तानाकडे सोन्याने मढवलेल्या अनेक महागड्या मोटारी आणि विमानही आहे.


या सुल्तानांचे पूर्ण नाव हसनल बोल्कियाह इब्नी उमर अली सैफुद्दीन तृतीय असे आहे. भरपूर तेल भांडारासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रुनेई या देशाचा हा सुल्तान 77 वर्षांचा आहे. या देशाची लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे. या सुल्तानाची एकूण संपत्ती 2 लाख 88 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांच्याकडे एक खासगी विमान असून ते सोन्याने मढवलेले आहे. 3,359 कोटी रुपयांच्या प्रायव्हेट जेटमध्ये 959 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू आहेत. यामध्ये सोन्याचे वॉश बेसिनही आहे. या सुल्तानाच्या मोटारींचे कलेक्शन नेहमीच जगभर चर्चेत असते. या कलेक्शनमध्ये फेरारी, लॅम्बोर्गिनी, पोर्श, बेंटले, रोल्स रॉयस, मर्सिडिझ, बीएमडब्ल्यू, लँड रोव्हर, ऑडी अशा अनेक लक्झरी गाड्या आहेत.


त्यांच्याकडे 183 लँड रोव्हर, 275 लॅम्बोर्गिनी, 350 पेक्षा अधिक बेंटले कार असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या 'इस्ताना नुरुल इमान पॅलेस' या महालाची नोंद गिनिज बुकमध्येही आहे. 20 लाख चौरस फूट जागेत पसरलेल्या या आलिशान महालात एकूण 1700 खोल्या, 257 पेक्षा अधिक बाथरूम, अनेक स्विमिंग पूल, अनेक गॅरेज आहेत. हा संपूर्ण महाल सोन्याने मढवलेला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.