Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुगलवर शोधून घरफोडी करायचा, 300 सीसीटीव्ही तपासून अट्टल चोरट्याला बेड्या

गुगलवर शोधून घरफोडी करायचा, 300 सीसीटीव्ही तपासून अट्टल चोरट्याला बेड्या

पुणे  : पुण्यात सध्या गुन्हेगारांचे फावले आहे. सतत काही ना काही गुन्ह्यांच्या घटना कानावर येतच असतात. त्यातच प्रगत तंत्रज्ञानाचा वापरही गुन्हेगार करताना दिसत आहेत. अशीच हायटेक चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 300 सीसीटीव्हींचे फुटेज तपासूनन पोलिसांनी मोठी कारवाई करत तेलंगणमधून त्या चोराला बेड्या ठोकल्या.

या चोराने गुगलवरून माहिती शोधून येरवडा आणि चतु:श्रृंगी परिससरातील उच्चभ्रू सोसायटींमध्ये घरफोड्या करत लाखोंचा ऐवज पळवला होता. अखेर येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने तपास करून त्या चोरट्याला तेलंगणमध्ये जाऊन अटक केली. नरेंद्र बाबू नूनसावत (वय 27) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तेलंगणा, हैदराबाद , तिरुपति, चेन्नई या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नरेंद्र याने इतर दोन साथीदारांसह येरवडा व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले घर फोडीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले . पोलिसांनी आरोपीकडून अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.


ऑक्टोबर महिन्यात कल्याणी नगर येथील बंद बंगला फोडोन लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम पळवण्यात आली होती. या गुन्ह्यासंबंध पोलिस तपास करत असतानाच महिन्याभराने चतु:श्रृंगी येथे दोन ठिकाणी घरफोडी होऊन तेथेही 50 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारण्यात आला. अखेर याप्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्यासाठी त्यांनी तब्बल 300 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना आरोपी हे तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेलंगणा येथे जाऊन नरेंद्र नुनसावत याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्याने त्याने हे गुन्हे त्याचे साथीदार सतिश बाबू करी (रा. तेलंगणा) व गुरुनायक केतावत (रा. हैदराबाद, तेलंगणा) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.


चोरीपूर्वी गुगलवर करायचे सर्च

आरोपी मोठ्या शहरामध्ये जाऊन इंटरनेटवरुन उच्चभ्रू भागातील माहिती शोधायचे एरिया सर्च करत होते. त्यावरुन प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे परिसरात रेकी करुन रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे आरोपीने सांगितले. आरोपींनी अशाच प्रकारे भोसले नगर येथे घरफोडी केल्याचीही कबुली दिली. सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, किरण घुटे, सूरज ओंबासे, अमजद शेख, आणि सागर जगदाळे यांनी कामगिरी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.