Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्री झोपताना छोटी चूक, संपूर्ण कुटुंबच संपलं; 2 महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू

रात्री झोपताना छोटी चूक, संपूर्ण कुटुंबच संपलं; 2 महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू


थंडीच्या दिवसांमध्ये घरातलं तापमान वाढवण्यासाठी उत्तर भारतात सर्रास हिटरचा वापर केला जातो, पण याच हिटरमुळे राजस्थानमधल्या संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागला आहे. अलवरमधल्या खैरथल तिजारा जिल्ह्यातल्या शेखपूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुंडाना गावातल्या घरात राहणारं यादव दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा हिटरमुळे भाजून मृत्यू झाला आहे. घरामधला हिटर जळाल्यामुळे दीपक यादव आणि त्यांची मुलगी निशिका यांचं जागच्या जागी निधन झालं, तर दीपक यांच्या पत्नीला अलवरच्या राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिनेही जीव गमावला आहे. या अपघातामध्ये तीन सदस्यांचं पूर्ण कुटुंबच जळून खाक झालं आहे.

मुंडाना गावाचा रहिवासी दीपक आणि जयपूरच्या संजू यादव यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दोघांना दोनच महिन्यापूर्वी मुलगी झाली होती, तिचं नाव दोघांनी निशिका ठेवलं होतं. शुक्रवारी रात्री दीपक आणि संजू मुलीसोबत खोलीमध्ये झोपले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी रात्री हिटर सुरू केला आणि त्यांना झोप लागली. हा हिटर बेडच्या शेजारीच होता.

हिटरमुळे गादीमध्ये असलेल्या कापसाने पेट घेतला आणि तिघंही आगीमध्ये अडकले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आगीने रौद्ररुप धारण केलं. घरातून किंचाळण्याचे आवाज यायला लागल्यावर गावातले लोक तिथे पोहोचले पण आग घराच्या चारही बाजूंना पसरली होती, त्यामुळे कुणालाही मदत करण्यासाठी जाता आलं नाही. नंतर ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं.

रुग्णालयात नेल्यानंतर लगेचच दीपक आणि त्याच्या दोन महिन्यांच्या मुलीला मृत घोषित केलं गेलं. तर संजूला गंभीर जखमी अवस्थेमध्ये आणण्यात आलं होतं. आगीमध्ये संजू 80 टक्के जळली होती. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. एकाच घरातल्या तिघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबात आणि गावावर शोककळा पसरली आहे. दीपक यादव ड्रायव्हरचं काम करत होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.