Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऊसदरासाठी राजू शेट्टींचा मोठा निर्णय; २६ नोव्हेंबरला सर्व महामार्ग रोखून धरणार

ऊसदरासाठी राजू शेट्टींचा मोठा निर्णय; २६ नोव्हेंबरला सर्व महामार्ग रोखून धरणार


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या दीड महिन्यांपासून ऊसदर आणि मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन झाले. संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकंणगले चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी कारखानदार आणि सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडून मध्यरात्री माहिती उपलब्ध झालेली आहे. त्याची पडताळणी सुरू आहे. पण, मागणी मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही. येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत यात मार्ग न निघल्यास २६ नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग रोखणार, त्यावेळी मात्र आंदोलनाचा भडका उडणार, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. सर्व कारखानदार एक झालेले आहेत. त्यांनी बोलायचं ठरवलेलं नाही. सरकार आणि विरोधी पक्ष कारखानदारांना सामील आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकाकी पाडण्याचा कारखानदारांचा डाव आहे. पण, गावागावांतला शेतकरी एक झालेला आहे. गटातटाच्या भिंती ओलांडून लढा देत आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीमागे ठाम उभा आहे, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या उसाला पोषक वातावरण तयार आहे. मागील आठवड्यात पाऊस झाल्याने उसाची वाढ होत आहे. त्यामुळे उसाचं वजन वाढण्यास मदत होणार आहे. हंगाम पंधरा दिवस लांबला असला तरी कारखानदारांचं नुकसान आहे. त्यामुळे कारखानदारांनी तोंडाला लावलेले कुलूप काढावं आणि बोलावं. कारखानदारांनी स्वतःचं नुकसान टाळावं, असा सल्लाही माजी खासदार शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटना एक पाऊल मागे येण्यासाठी तयार आहे. पण, कारखानदारांची एकजूट तोडल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

सांगलीतही चक्काजाम

ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सांगलीमध्ये चक्काजाम सुरू आहे. इस्लामपूर-सांगली मार्गावरील लक्ष्मी फाटा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत ऊसदराचा निर्णय होत नाही; तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.