Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील पोरानं शक्कल लढविली, फटाके उडविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल यंत्रणा बनविली

सांगलीतील पोरानं शक्कल लढविली, फटाके उडविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल यंत्रणा बनविली


सांगली : दिवाळीत फटाके पेटविताना भाजल्याच्या बातम्या ठिकठिकाणांहून येतात. फटाके पेटविताना उरात होणारी धडधड सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेली असते. न जानो फटाका हातातच फुटायचा आणि पळायला वेळही मिळायचा नाही, अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते सांगलीतील प्रेम पसारे या अवघ्या आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यालाही फटाक्यांची अशीच भीती वाटायची. त्यावर उपाय म्हणून त्याने फटाके पेटविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल तयार केला आहे.

अवघ्या पाच-सहाशे रुपयांत तयार झालेली ही भन्नाट आयडियाची सुपीक कल्पना तमाम पालकांना दिलासा देणारी ठरली आहे. फटाक्याने पोराला भाजेल म्हणून पालक मोठ्या आवाजात फुटणारे फटाके देत नाहीत. फुलझडी, सुरसुरकाडी किंवा लसूण अशा छोट्या फटाक्यांवरच दिवाळी साजरी करतात. फटाक्यांमुळे भाजलेली अनेक मुले रुग्णालयात उपचार घेताना दिसतात. छोट्या प्रेमलादेखील फटाक्यांची अशीच भीती वाटायची. चहाटपरी चालविणारे वडीलही मोठे फटाके आणून द्यायचे नाहीत.

यावर प्रेमने शक्कल लढविली. फटाके पेटविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल यंत्रणा बनविली. सुमारे ३०० मीटर अंतरावरून रिमोटद्वारे फटाका पेटविता येतो. त्यामुळे भाजण्याची भीती राहत नाही किंवा फटाका पेटवून पळून जाण्याची धांदलही होत नाही.

दिवाळीत मोठ्या फटाक्यांचा आग्रह करणाऱ्या प्रेमला वडील नवनाथ यांनी त्याचे धोके सांगितले. फटाक्याने भाजल्याच्या काही घटना मोबाइलवर दाखविल्या; पण ऐकेल तो प्रेम कसला? त्याने रिमोट कंट्रोल बनवत वडिलांना निरुत्तर केले. त्यासाठी खेळण्याच्या गाडीतील रिमोट यंत्रणा वापरली आहे. अवघ्या आठवीच्या पोराची ही डोकॅलिटी सांगलीत चर्चेचा विषय ठरली आहे.

असा आहे रिमोट

या यंत्रणेत उच्च ॲम्पियरचे दोन सेल बसविले आहेत. त्यातून वायरद्वारे विद्युत प्रवाह बाहेर काढून तांब्याच्या तारेला जोडला आहे. यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सेन्सर जोडला आहे. रिमोटचे बटण दाबताच सर्किट पूर्ण होते. सेलमधून विद्युत प्रवाह तांब्याच्या तारांमध्ये येतो. उच्च ॲम्पियरच्या विद्युत प्रवाहामुळे तारा गरम होतात. त्यावर वातीसह ठेवलेला फटाका धडाम करून फुटतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.