गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींत वाढ; 'त्या' आरोपावरून शरद पवार गट ॲक्शन मोडमध्ये
काही दिवसांपूर्वी बीडसह मराठवाड्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. संतप्त आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला आग लावली होती. यानंतर आंदोलकांनी बीडसह आसपासच्या परिसरातील राजकीय नेत्यांची घरं आणि इतर मालमत्तांना लक्ष्य केलं होतं. या प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप केले होते.
दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मराठा आंदोलनातील हिंसेमागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. हे वक्तव्य आता सदावर्ते यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण सदावर्तेंच्या या आरोपांविरोधात शरद पवार गट ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
शरद पवार गटाचे समर्थक वेदप्रकाश आर्य यांच्याकडून गुणरत्न सदावर्ते यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील सात दिवसांच्या आत सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांसमोर जात जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहेगुणरत्न सदावर्ते यांना उद्देशून वेदप्रकाश आर्य म्हणाले, “ज्याप्रकारे तुम्ही शरद पवारांवर आरोप केला. त्याप्रमाणे तुम्ही सर्व वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांसमोर जाऊन थेट स्पष्टीकरण द्यायला हवं की, मी जे काही आरोप केले आहेत, ते आधारहीन आणि चुकीचे आहेत. अन्यथा आम्हाला न्यायालयात त्यांच्याविरोधात (गुणरत्न सदावर्ते) भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अन्वये खटला दाखल करावा लागेल.”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.