कणकवलीजवळ ७१ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्तओसरगाव येथे उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाची कारवाई
कणकवली : कणकवलीजवळ ओसरगाव येथे राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्तांच्या भरारी पथकाने दारूची तस्करी करणारा ट्रक पकडून ७१ लाख रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. दारू, ट्रक तसेच अन्य असा सुमारे १ कोटी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार यांनी दिली.
लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय ३४, रा. पाडळी (केसी) सुपाने, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. पाटण, इस्लामपूर येथे गोवा बनावटीची दारू पकडल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी भरारी पथकांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय भरारी पथक कणकवली परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी निरीक्षक कुंभार यांना एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी कणकवली परिसरात गस्त वाढवली होती.
बुधवारी सकाळी श्री. कुंभार यांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रक (एनएल ०१ एजी ३८२०) ओसरगाव येथे आल्यानंतर तो अडवला. ट्रक चालकाकडे गाडीतील मालाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या ७५० मिलीच्या ९ हजार ६६०, १८० मिलीच्या ११ हजार ४० तर पाचशे मिलीच्या बिअरच्या २ हजार ८०८ बाटल्या भरलेले ११५२ बॉक्स आढळले. त्यानंतर ती दारू जप्त करून ट्रक चालकाला अटक करण्यात आली.
कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, यागेश शेलार, राहुल सपकाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.