Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू

सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू


सागंली : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीनंतर शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात अनुकंपा तत्वावरील चार जागा बुधवारी भरण्यात आली. उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. उर्वरित पदांसाठी आरक्षणाची बिंदुनामावली निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

शासकीय रुग्णालयात तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक जागांवर मनुष्यबळच नसल्याचे आढळून आले आहे. त्या तुलनेत गेल्या काही वर्षांत रुग्णांचा ताण मात्र दुप्पटीने वाढला आहे. डॉक्टर्सपासून चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या सर्वच जागांवर पुरेसे मनुष्यबळ नाही. एका विभागातील कर्मचारी दुसऱ्या विभागात नेमून रुग्णसेवा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ग एक ते चारच्या ७३९ पैकी तब्बल ३१३ जागांवर कर्मचारी नाहीत. म्हणजे सुमारे ४५ टक्के जागा रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीमध्ये २३७ पैकी तब्बल १३५ पदे रिक्त आहेत. एकेका कर्मचाऱ्याला चार-चार वॉर्ड सांभाळावे लागत आहेत. १९९७ पासूनचे न्यायालयीन बदली कर्मचारी कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या महिन्यात सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. रिक्त जागांचा आढावा घेतला होता. त्या भरण्याची सूचना जिल्हाधिकारी व अधिष्ठात्यांना केली होती. चतुर्थश्रेणी पदे भरण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आहेत. त्यानुसार या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण होताच जिल्हाधिकाऱ्यांकडून भरती प्रक्रियेस प्रारंभ होईल. कायम नियुक्त्यांसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या जागांव्यतिरिक्त उर्वरित जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून भरल्या जाणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात अनुकंपा तत्वावरील चार जागांवर उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. ही सर्व पदे चतुर्थश्रेणी दर्जाची आहेत.

परिचारिकांच्या तब्बल २७६ जागा रिक्त

शासकीय रुग्णालयासाठी क वर्ग परिचारिकांची ३९९, तर ड वर्ग परिचारिकांची २३७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अनुक्रमे २५८ व ९० पदांवरच परिचारिका काम करत आहेत. उर्वरित तब्बल २७६ जागा रिक्त आहेत. रजा, सुट्ट्या आदी सांभाळून परिचारिकांना रुग्णसेवा करावी लागत आहे. यातील क दर्जाची पदे, तसेच प्रथम व द्वितीय श्रेणीच्या रिक्त पदांवर भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.