Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजकारण गेले चुलीत... कशासाठी भांडताय...महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?

राजकारण गेले चुलीत... कशासाठी भांडताय...महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?


पुरोगामी महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचा कार्यक्रम करणारे राजकीय स्वार्थाकरिता भांडत राहिले. कोणीतरी हा खेळ अर्ध्या दाराआडून गंमतीने पहात राहिले. पण, गेल्या २४ तासांत निसर्गाच्या अवकृपेने सर्व जाती-धर्मांच्या कष्टकरी माणसांना आता असे काही झोडपून काढले आहे....  विदर्भ-मराठवाड्यातील सारा शेतकरी उद्धवस्त झाला. अवकाळी पावसाने या शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले.  हाता-तोंडाशी आलेला घास कोणीतरी दृष्ट शक्तीने ओढून नेला. जवळपास संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागातील कष्टकरी शेतकरी यात भरडला गेला. अक्राळ-विक्राळ निसर्ग जात विचारत नाही. आरक्षण मिळाले का? विचारत नाही... इथं आम्ही एकमेकांच्या उरावर बसण्याइतपत बेफाम झालेलो आहोत. त्यात सरकारात बसलेले मंत्रीही त्यांच्या जबाबदारीचे भान सोडून मैदानात उतरल्यासारखे शड्डू ठोकत आहेत. आणि एका रात्रीत विदर्भातील कापूस पावसाने बरबाद झाला. गेल्यावर्षीच्या कापसाला भाव नाही म्हणून घरात तो कोंबून ठेवला होता. यावर्षीचा ओला कापूस काढाया मजूर मिळेनात... मजुरी झाली २०० रुपयांच्या वर... गेले २४ तास पाऊस कोसळतो आहे... चार महिन्यांची मेहनत वाया गेली... कापसाला भाव नाही. इकडे तूर पावसाने लंबी करून टाकली. मराठवाड्यात कडक उन्हामुळे भयानक दुष्काळाची अवस्था होती. रब्बीच्या पेरणीला हरभरा, भुईमूग, मका यासाठी पाऊस नव्हता. पेरे झाले नव्हते... खरिपाच्या हंगामात पाऊस नव्हता म्हणून दुष्काळच.... सोयाबीन वाया गेलेले... सगळ्या बाजूंनी सगळ्या जाती-जतामीतील कष्टकरी शेतकऱ्यांची अशी काही भयानक कोंडी झालेली आहे ... आता या शेतकऱ्यांमध्ये... गरिब मराठा शेतकरी आहे... एक-दोन एकर शेतीवालाही आहे... कोरडवाडूही शेतकरी आहे... माळी-धनगर-कुणबी सगळ्या गरिब कष्टकरी जातीचे शेतकरी भरडले गेले आहेत. आरक्षणाचा विषय ज्यांनी तापवला... ते सरकारतील मंत्री अजूनही त्याच धुंदीत आहेत.. महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण झालेली आहे... यापूर्वीच्या दुष्काळावर कशी मात केली... यापूर्वीच्या अतिवृष्टीतून शेतकऱ्याला कसे बाहेर काढले... याची चर्चा होताना दिसत नाही... मंत्रिमंडळात ऐक्य दिसत नाही... कॅबिनेटमध्ये जे ठरते आहे. त्या विरोधात मंत्री बाहेर बोलत आहेत. महाराष्ट्रातील गरिब कष्टकरी-शेतकऱ्याला ना सरकार वाली आहे ना आता कोणी नेता समोर आहे... जो या आपत्तीमधून महाराष्ट्रातील कष्टकऱ्याला बाहेर काढील, अशी आशा राहिलेली नाही.

अशा आपत्तीच्या काळात पालकमंत्री कुठे बसले आहेत... जिथे अितवृष्टी झाली त्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथे ठाण मांडून बसला आहे का? ज्या १७ जिल्ह्यात गेल्या महिन्यापर्यंत दुष्काळ होता... त्या जिल्ह्यात एकतरी दुष्काळी काम काढले हाेते का? रोजगार हमी मंत्री कोण आहे? रोजगार हमी चालू आहे का? रोजगार हमी म्हणजे काय? या रोजगार हमी योजनेने महाराष्ट्रात ५० वर्षांपूर्वी काय घडवले, याची थोडीतरी मािहती त्या मंत्र्याला आहे का? राजकीय हाणामारीमध्ये महाराष्ट्राचे सगळे प्रश्न लोंबकळत पडलेले असताना अवकाळी पावसाने तर शेतकऱ्याचे कंबरडे मोडून टाकले.  आता ज्यांना भांडायचे आहे त्यांनी एकमेकांच्या उरावर बसून भांडा.  आणि ज्या मंत्र्यांना शड्डू ठोकायचे आहेत... त्यांनी उघडपणे काय हवं ते करा... पण, महाराष्ट्र आता भलतीकडे चालला... या महाराष्ट्राला पुन्हा मार्गावर आणण्याची क्षमता असलेले नेतृत्त्व या सरकारात तर दिसत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था कधीच नव्हती. 

गेल्या चार महिन्यांत अनेक जिल्ह्यांत दुष्काळ आहे. खरिपाच्या पेरण्या न झालेले तालुके किती? जिल्हे किती?.... पेरण्या झाल्यानंतर पाऊस नसल्यामुळे पेरलेली पिके वाया गेलेले जिल्हे किती.... शेतकरी िकती... त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली होती.... कृषीमंत्री कोण? ते नेमके काय करत आहेत? त्यांचे एकतरी निवेदन सरकारतर्फे अधिकृतपणे आतापर्यंत प्रसिद्ध झाले अाहे का? अचानक आलेल्या आवकाळी पावसानंतर महराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी काही भयानक कोंडी झालेली आहे... त्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याची तातडीची बैठक तरी झाली का...?  त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यात पोहोचले का? पुन्हा एकदा रोजगार हमी तातडीने सुरू करण्याची भूमिका घेतली आहे का? जे पीक वाया गेले, त्याचे पंचनामे करण्यासाठी मंत्रालयातून आदेश जाईपर्यंत अधिकारी थांबणार आहेत का? कालच्या पावसानंतर तातडीची मदतव्यवस्था काय झाली? एक नव्हे तर हजार प्रश्नांनी महाराष्ट्र आज भांबावलेला आहे. ज्या घरात धान्याचा कण नाही... तिथं िकमान १० किलो तांदूळ, किंवा पीठ आणि हजार रुपये रोख असे वाटप करण्याची गरज आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २६ जुलै २००५ रोजी मुंबईतील सर्व उपनगरे पाण्याखाली बुडाली होती... हजारो लोक रस्त्यावर आले... रस्त्यावर चुली पेटल्या... त्यावेळी गहू, तांदूळ, रॉकेल आणि रोख रुपये असे वाटप विलासरावांनी केले. आपत्तीकालिन व्यवस्थापन नावाची चीज आता या राज्यात आहे का?

सामान्य माणूस अस्वस्थ आहे. ग्रामीण भागात रोजगार नाही म्हणून शहराकडे ही सगळी गर्दी... शहरातील उंचच उंच इमारती... या मुंबईत जेव्हा पहिल्यांदा हजीअलीजवळ ३० मजल्याची हिरा-पन्ना इमारत उभी राहिली... तेव्हा उपनगरांतील लोक कुतूहलाने ही इमारत बघायला यायचे... आता उपनगरामध्ये ४०-५० मजल्याच्या इमारती झाल्या... त्यात कोण राहत आहेत... त्या इमारतीमध्ये आता मोटारगाड्या पार्किंगसाठी मजले बांधले जात आहेत... पूर्वी मजले माणसांकरिता होते... आता गाड्यांकरिता होत आहेत. सामान्य माणसांना रस्त्यावर चालणे अवघ्ाड झालेले आहे. शहरामध्ये माणसांना चालायला रस्ता शिल्लक नाही. एकाही रस्त्यावरून सुरक्षितपणे चालता येईल, अशी मुंबईतील एक जागा दाखवा.... पुण्याचीही अवस्था तीच झाली आहे... सगळा पैसा पुण्या-मुंबईत.... खेडी सोडली वाऱ्यावर. काल राज्याचे नागपूरचेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर केंद्रीय मंत्री िनतीन गडकरी यांना जाहीरपणे सांगावे लागले की, ‘नागपूर इंम्प्रुमेंट ट्रस्टने नागपूरची वाट लावून टाकली’. मुंबईमध्ये हेच वाक्य एम.एम.आर.डी.ए. ला लावले तर मुंबईची वाट त्यांनीच लावून टाकली. मुंबईमध्ये फक्त पैसेवाल्यांना किंमत आहे. महराष्ट्रात सध्या पैसेवाल्यांशिवाय बाकी कोणालाही किंमत राहिलेली नाही.  शेतकरी आणि कामगार हे तर विचारातच घेतले जात नाहीत. 

२४ तासांपूर्वीच एका क्रिकेटपटूचा लिलाव झाला. १७ कोटी रुपयांना गुजरातचा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सने विकत घेतला.  आता आय.पी.एल.चा लिलाव होईल. हे राज्य आणि ही शहरं.... श्रीमंतांची मिरासदारी झाली... मॉलचे लोण शहरांत आले.... गावागावांत गेले.... छोटे छोटे व्यापारी यांची दमछाक झाली... याला जी काही आर्थिक क्रांती म्हणायची असेल त्यांनी म्हणावं.... पण, या खेड्या-पाड्यांत आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्याला दोन घास खाणे आज मुश्कील झाले आहे... शेतावर मजूर लावणे अवघड झाले आहे...  त्याने कष्टाने पिकवलेल्या धानाला, तुरीला, ज्वारीला भावच नाही... आणि एका माणसाने महिनाभर क्रिकेट खेळण्यासाठी १७ कोटी रुपयांची बोली लागते...  

महाराष्ट्रातील ही विषमता किती भयानक आहे... कुठे चाललो आहोत आपण... महाराष्ट्र कुठून कुठे चालला आहे... कष्टकरी, शतेकरी, कामकरी यांना या राज्यात आता कसलीही िकंमत राहिलेली नाही. पैसा फेको... तमाशा देखो... या स्थितीत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. पेपरमधील जाहिरातबाजी.... दोन-दोन.... तीन-तीन पानांच्या जाहिराती... रस्त्यांवरील होर्डींग्ज... विकासकामांच्या उद्घाटनांची खैरात...  भूमीपूजन करून दगड बसवत जायचे... जाहिराती करत रहायच्या... हे सरकार जाहिरातीवर पोसले गेल्यासारखे आहे... प्रत्यक्षात हाहा:कार आहे... माणसांमाणसांमध्ये भांडणं लावली जात आहेत.. जाती-जातीमध्ये भांडण लावली जात आहेत. आता याच सगळ्या जातींतीतल शहाण्या माणसांनी एकत्र बसून नेत्यांना खड्यासारखे दूर ठेवावे... आणि सगळ्या जातींच्या प्रश्नांचे निर्णय त्या-त्या जातीतील शहाण्या माणसांनी करावेत..   आज राज्यातील सत्ताधारी नेत्यांमधील शहाणपण संपलेले दिसत आहे. धटींगणपणा वाढलेला आहे. दोन जाती आपसात लढून घायाळ व्हाव्यात आणि दुरून कोणीतरी गंमत बघावी... हा खेळ महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्राचा एक मंत्री घेतलेल्या सरकारी िनर्णयाविरुद्ध उघडपणे बोलतो... आणि मुख्यमंत्री शांत राहतात... असे चित्र महाराष्ट्रात कधी नव्हते. सगळेच काही विपरित चालले आहे.  कोणी कोणालातरी अापल्या राजकारणासाठी वापरण्याचा कार्यक्रम सुरू आहे.  आय.पी.एलमध्ये गुजरातचा पांड्या मुंबई इंडियन्सला जातो... त्याला बोली लावली जाते... 

राजकारणात इकडले ‘पंडे’ तिकडे झटकन जातात... बोली लागते की नाही ते माहिती नाही.  पण हे सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण नाही, एवढे मात्र नक्की. लोकांना त्याची किळस आहे. त्याचमुळे सरकार निर्णयक्षम राहिलेले नाही. सरकार आज गवताच्या गंजीवर बसलेले आहे. त्यांचे काय होईल, हे कोणालाही सांगता येणार नाही. अशावेळी शांतपणाची आणि शहाण्या माणसांची गरज आहे.  महाराष्ट्रात हे राजकीय शहाणपण संपल्याच्या खुणा आता ठळकपणे दिसू लागल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर संकट आलेले आहे अशा माणसांना कोणी वाली शिल्लक नाही, घोषणांपुरते ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम झाले... पण, ज्यांच्या दारी तुम्ही गेलात... त्या शेतकऱ्याची अवस्था आज काय झाली आहे... कोणाला काहीही पडलेले नाही. हा महाराष्ट्र  असा कधीही नव्हता हो... इतका बेपर्वा... इतका केवळ राजकारणात बुडून गेलेला... अनेक संकटे महाराष्ट्रावर आली... त्या सर्व संकटातून त्या त्या वेळच्या नेत्यांनी महाराष्ट्राला सही सलामत बाहेर काढले. १९७२ चा दुष्काळ जरी आठवला तरी अंगावर काटा येतो... वसंतराव नाईकसाहेबांनी ते आव्हान मानले. विरोधी पक्ष स्वत:हून पुढे आला... आज बसच्या तिकीटावर जो पंधरा पैशांचा अतिरिक्त भार आहे... तो रोजगार हमीसाठी लावलेला त्यावेळचा कर आहे. 

१६८ कोटी रुपये त्यावेळी एका वर्षात जमा झाले. पाच लाख कामे उभी राहिली. रोज चार लाख लोकांना रोजगार दिला गेला... आणि हा कराचा प्रस्ताव विरोधी पक्षाचे उद्धवराव पाटील, गणपतराव देशमुख यांनी मांडला होता. सरकारने तो परत घ्यायला लावून सरकारतर्फे प्रस्ताव आला.  १९६६ साल आठवा.... शेतकऱ्याच्या ज्वारीचा भाव ३५ पैसे किलो असा झाला होता.... यशवंतराव मोहिते यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये राजीनामा देण्याची तयारी दाखवली... 

‘शेतकऱ्याला मारायचे आहे का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला... त्याच कॅबिनेटमध्ये ७५ रुपये क्विंटल (७५ पैसे प्रति किलो) असा ज्वारीचा भाव ठरला.  एकाधिकार ज्वारी खरेदी योजना ताबडतोब अंमलात आली. नागपूर येथे विधानसभा अधिवेशन हिवाळ्यात होत असते... आताही होतेच... फरक काय?.... ५० वर्षांपूर्वी कापसाचा हंगाम आला की, नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये इिजप्तचा कापूस येऊन पडलाच म्हणून समजा... आणि रात्रभर बैलबंडीचा प्रवास करून ज्या शेतकऱ्याने कापूस विकायला आणलाय, त्याचा कापूस भाव पाडून विकत घेतला जायचा...  हे अनेक वर्षे चालू होते.  विधानसभेमध्ये विदर्भाचे जावई असलेल्या यशवंतराव मोहिते यांनीच एकाधिकार कापूस खरेदी योजनेचे विधेयक आणले. शेतकऱ्याला भावाची हमी दिली.  त्यापेक्षा कमी किमतीत कापूस कोणालाही घेता येणार नाही... अशी तरतूद.... किती विचारपूर्वक आणि किती जाणीवपूर्वक.... सामान्य शेतकऱ्याच्या हिताचे पुरोगामी कायदे या महाराष्ट्रातच झालेले आहेत. 

‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा याच मुंबई-महाराष्ट्रात झाला... कामगारांच्या हिताचा कायदा याच  मुंबई विधान मंडळात झाला. कॉम्रेड डांगे सहा तास बोलले. ‘कसेल त्याची जमीन’ या कायद्यावर दत्ता देशमुख पाच तास बोलले. कुठे त्यावेळची चिंतनशील सरकारं.... ते मंत्री... ते मुख्यमंत्री... त्यांचा अभ्यास... ती मंत्रिमंडळे... ते यशवंतराव चव्हाण, ते वसंतराव नाईक... त्या-त्यावेळची मंत्रिमंडळाची कार्यकक्षम टीम... त्या सगळ्या नेत्यांनी जाहिरातबाजी समोर ठेवली नव्हती.  कोणाच्याही वाढदिवसाच्या पान-पान जाहिराती येत नव्हत्या. राजकीय तोड-फोड होत नव्हती.  दमबाजी... धाक-धपटशहा.... ईडी.... बिडी.... सिडी... हे काही नव्हते. साधने मर्यादित होती... पण महराष्ट्र समाधानी होता.... ज्या १०६ शेतकरी आणि कामगारांनी बलिदान देवून हे राज्य स्थापन झाले त्याच राज्यात आज शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ आली... त्याची लाज कोणलाच वाटत नाही. दरवर्षी आत्महत्येचा आकडा वाढतो आहे... इकडे घोषणांचे आकडे फुगत चाले आहेत. योजनांचे आकडे वाढत चाललेत.... जाहिरातींची पाने वाढत चालली आहेत आणि तिकडे शेतकरी-कामगार उद्धवस्त झालेला आहे. ...

फार वाईट अवस्थेत आज महराष्ट्र आहे... आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी आहे... तो छत्रपतींचा... शिव-शाहूंचा, महात्मा फुलेंचा... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र हाच आहे का? कुठे भलतीकडे चााले आहे राज्य.... या आपसातल्या मारामाऱ्या आता बंद करा... ज्या मंत्र्यांना रस्त्यावर वाद घालायचे आहे... त्यांनी मंत्रिमंडळातून बाहरे पडा.... काय हवं ते बोला... सत्तेत राहून धटींगणपणा करू नका... महाराष्ट्राला भलतीकडे नेवू नका... ही भांडणे ताबडतोब थांबवून आज निसर्गाने झोडपलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावात सगळ्या सामाजिक नेत्यांच्यासोबत त्या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्याचे वातावरण तयार करा... नाहीतर हा महाराष्ट्र आता तुम्हाला माफ करणार नाही. पोस्टरबाजी आणि जाहिरातबाजीने महाराष्ट्र चालणार नाही... राजकारण गेले चुलीत... असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. सध्या एवढेच...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.