Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मद्यधुंद अवस्थेत पोलीस दादाचा पोलीस ठाण्याला राडा..

मद्यधुंद अवस्थेत पोलीस दादाचा पोलीस ठाण्याला राडा..

पाथर्डी: मद्यप्राशन केलेल्या एका पोलीस दादांनी पोलीस ठाण्याच्या आवारात अधिकारी कर्मचाऱ्यासह उपस्थित नागरिकांना शिव्यांची लाखोळी वाहत भलताच धिंगाणा घातला.शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.


मद्यधुंद अवस्थेतील दादांची दादागिरी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेनंतर संबंधिताची रक्तचाचणी करण्याचे फार्मान सोडले खरे मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत या संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती.या घटने संदर्भात साधी नोंदही पोलीस डायरीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शुक्रवारी दुपारच्या वेळी एक पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्याला आला व त्याने पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या काही पोलीस कर्मचारी व त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना जोरदार शिवीगाळ केली. काही अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी या कर्मचाऱ्याला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र उपयोग झाला नाही. उलट त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिव्यांचा प्रसाद मिळाला. समजलेल्या माहिती नुसार या कर्मचाऱ्याने या अगोदरही असाच प्रकार या पूर्वीही अनेकवेळा केला असून दरवेळी या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्याने आपले कोणीच काही करू शकत, अशी भावना या कर्मचाऱ्यांची झाली आहे.

पोलीस कोठडीत असलेल्या काही कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते,मात्र या नातेवाईकांनाही या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या कर्मचाऱ्याने शिवीगाळ केल्याने नातेवाईकांना या कैद्यांना भेटता आले नाही. मद्यपीच्या धिंगाण्याची माहिती मिळतात वरिष्ठ अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्यांची रक्तचाचणी करण्याचे फर्मान सोडले. नंतर या पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन काही पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात रक्त तपासणीसाठी घेऊन गेले होते. सध्या हा कर्मचारी रजेवर गेल्याची माहिती आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पोलिसाचा हा प्रताप या कॅमेऱ्यात कैद झाला असला तरीही या संदर्भात ठाण्याच्या डायरीला कोणतीही नोंद का करण्यात आली हे समजू शकत नाही.

काही दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या वाळूच्या गाड्या पळवून नेण्यासाठी आलेल्या वाळूतस्करांना मदत केली होती. त्या वेळी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. काल झालेल्या प्रकरणासंदर्भात मद्यधुंद अवस्थेतील कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होते या कडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मद्यधुंद अवस्थेतील कर्मचाऱ्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेणार असल्याने तूर्त कारवाई केली नाही.
-संतोष मुटकुळे,
पोलीस निरीक्षक

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.