Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावकारी जाचाने पिडीत कर्जदारांना संपर्क साधण्याचे आवाहन

सावकारी जाचाने पिडीत कर्जदारांना संपर्क साधण्याचे आवाहन


सांगली, दि. 10  : सावकारी जाचाने पिडीत झालेल्या कर्जदाराने संबंधीत पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली (जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली यांचे कार्यालयातील स्वतंत्र कक्ष संपर्क दुरध्वनी क्र. ०२३३-२६७२१००) यांच्याकडे संपर्क साधावा. जो कोणी व्यक्ती कर्जदाराकडून सावकाराला देय असलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी कर्जदाराला उपद्रव देईल, तिच्यावर बळाचा वापर करील किंवा तिला धाकदपटशा दाखविल, जागोजागी पाठलाग करील, अथवा तिच्या अथवा तिच्या कुटुंबियाच्या जिविताला धोका असल्याची खात्री झाल्यास अशा प्रकरणी संबंधितांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, सांगली, पोलीस अधिक्षक सांगली व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी केले आहे.

तसेच सावकारांकडून होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी व सावकारीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ दि. १६ जानेवारी २०१४ पासून अंमलात आलेला आहे. या अधिनियमातील कलम १८ अन्वये सावकारीच्या ओघात संपादित केलेली स्थावर मालमत्ता परत करण्याबाबतची तरतूद आहे. अशा प्रकरणी प्राप्त तक्रारी अर्जावर चौकशी करण्यात आल्यावर तसेच वैयक्तीक सुनावणी झाल्यानंतर सावकाराने दिलेल्या कर्जाबददल प्रतिभूती म्हणून स्थावर मालमत्ता सावकाराच्या कब्जात असल्याची जिल्हा निबंधकाची खात्री पटली तर तो संलेख किंवा अभिहस्तांतरणपत्र अवैध असल्याचे घोषित करता येईल आणि त्या मालमत्तेचा कब्जा कर्जदाराकडे किंवा यथाशक्ती त्याच्या वारसाकडे किंवा उत्तराधिकाऱ्याकडे परत करण्याचा आदेश देण्याची तरतूद आहे. 

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या एकूण तक्रारीपैकी 5 प्रकरणांमध्ये एकूण 62 हेक्टर 16 आर इतकी स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम 18 अंतर्गत चौकशी करून परत करण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी सर्व सावकारी तक्रारी अर्जासंबंधातील संबंधीत यंत्रणांनी वेळेवर तक्रारी निकाली काढाव्यात. गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी सहकार खात्याकडून सावकारी परवाना घेतलेल्या सावकारांकडूनच कर्जाची रक्कम घ्यावी. तसेच परवाना नसतांना अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीस सावकारी अधिनियमाच्या कलम ३९ अन्वये पाच वर्षांचा कारावास व 50 हजार रूपये इतक्या दंडाची तरतूद कायद्यात केलेली असून सदरचा गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे. तरी सावकारांच्या जाचाने पिडीत झालेल्या कर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली  (संपर्क दुरध्वनी क्र. ०२३३-२६००३०० ईमेल- ddr_sng@rediffmail.com किंवा sangliddr@gmail.com) यांच्याकडे अथवा संबंधीत तालुक्याचे उपनिबंधक /सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.