Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंकलीत उभा राहून 'खा' की 'खा'!

अंकलीत उभा राहून 'खा' की 'खा'!


सांगली :  डॉक्टरांनी सांगलीत येताच अवैध व्यवसायांना चाप लावला आहे. त्यामुळे चिरिमिरीसाठी धडपडणाऱ्यांनी आता नवी फंडे सुरु केले आहेत. दुसऱ्या जिल्ह्यातून सांगलीत येणाऱ्या वाहनधारकांना निरम्यासह विविध पावडर लावून धुण्याचे काम जोमात सुरू आहे. त्यामुळेच काहींनी अंकलीच्या वळणावर उभा राहून 'खा' की 'खा' सुरू केले आहे. सावज बघून त्याच्याकडून शंभरपासून पाच हजारांपर्यंत चिरीमिरी घेतली जात आहे. 

अंकलीत उभारून खाणाऱ्यांच्या त्रासाला केवळ परजिल्ह्यातीलच नव्हे तर सांगली जिल्ह्यातील वाहनधारक चांगलेच वैतागले आहेत. या परिसरातून वाहन नेताना जणूकाही गंभीर गुन्हा केल्याच्या दिव्यातून वाहनधारकांना जावे लागत आहे. कागदपत्रांची तपासणीच्या नावाखाली 'खा' की 'खा'चा धंदा जोमात सुरू आहे. मात्र हे उभ्या-उभ्या खाणारे नेमके कोणाचे पंटर आहेत हे मात्र कोणीही स्पष्ट करण्यास तयार नाहीत.

पुलावरून अंकलीकडे उतरल्यानंतर खाणाऱ्यांच्या तीक्ष्ण नजरा बरोबर सावज हेरतात. आणि त्याची शिकार करतात. अंकलीसह जिल्ह्यात येणाऱ्या रस्त्यांवर उभा राहून 'खा' की 'खा' करणाऱ्यांना नेमके आदेश कोणाचे आहेत. कोणासाठी ते खातात याचा थांगपत्ताच लागू दिला जात नाही. त्यामुळे अनेक वाहनधारकांनी बसनेच सांगलीत प्रवेश करण्याचा निणर्य घेतला आहे. 'खा' की खाणाऱ्या खाटक्याच्या हातात आपली मान आपसूक देण्याऐवजी अनेकांनी रस्त्यांचे नवे पर्याय शोधून काढले आहेत. 

सांगलीत येतानाच झिजिया कर द्यावा लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. जागेवरच खाण्याचा उद्योग होत असल्याने लाचलुचपतकडे तक्रार देण्याचा वेळही संबंधितांना मिळत नाही. त्यामुळे अंकलीसह जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या रस्त्यावर उभा राहून 'खा' की 'खा' करणाऱ्यांवर वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न वाहनधारकांमधून विचारला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.