Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गिरीश कुबेर, तुम्हाला वसंतदादा, किसन वीर, तपासे, यांची काय माहिती आहे? मधुकर भावे

गिरीश कुबेर, तुम्हाला वसंतदादा, किसन वीर, तपासे, यांची काय माहिती आहे? मधुकर भावे 


ऋतुरंगच्या दिवाळी अंकातील श्री. गिरीश कुबेर यांच्या लेखाबद्दल जरा वेगळे लिहित आहे... ते लिहिणं गरजेचे आहे. कोणत्याही लेखकाने किंवा संपादकांनी आपल्या लेखात अनावधानानेसुद्धा कोणाला कमी लेखले जाईल किंवा त्याच्या सार्वजनिक जीवनातील कामाला उणेपणा येईल, असे कोणतेही वाक्य वापरू नये. 

श्री. गिरीश कुबेर यांचा ऋतुरंग दिवाळी अंकात ‘वामनराव’ हा एक छान लेख आहे. वामनराव म्हणजे श्री. वामनराव कुबेर.  या वामनराव कुबेर यांनी डॉ. आंबेडकर : अ क्रिटीकल स्टडी हे अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलेले ते आपल्या काकांवर. वामनराव कुबेर १९४२ च्या सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील नेते असलेल्या ‘पत्री सरकारा’त सहभागी होऊन तुरुंगात गेले होते. तिथपर्यंत गिरीश कुबेर यांनी उल्लेख केला आहे. लेखक त्यावेळी वयाने लहाण आहे. त्या लहाण वयात त्यांनी काकांना प्रश्न विचारला आहे की, ‘तुरुंगात तुमच्याबरोबर कोण होते’..
गिरीश कुबेर लिहितात... त्यांनी सांगितल्यातील दोन-तीन नावे आजही आठवतात... एक म्हणजे वसंतदादा पाटील... किसन वीर... आणि गणपतराव तपासे... इथं कुबेर थांबले असते तर ते त्यांच्या भारदस्त संपादक पदाला शोभून दिसले असते... कारण या दिवाळी अंकातील लेख राजकीय नाहीत. काकांच्या आठवणीवरचा आहे.  पण, ही तीन नावे सांगितल्यानंतर गिरीश कुबेर पुढे लिहितात...
‘वसंतदादा, किसन वीर आणि गणपतराव तपासे हे  पुढे राजकारणात आले आणि स्वत:चे आणि कुटुंबाचं नशीब उजळवून गेले... 
वामनरावांनी तसे काही केले नाही... ’
 
हे वाक्य वाचल्यानंतर माझ्या मानत पहिला प्रश्न आला की, आज संपादक असलेल्या गिरीश कुबेर यांना किसन वीर, वसंतदादा, तपासे यांच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे...  त्यांनी कुटुंबाचे नशीब उजळवले की, संसाराव तुळशीपत्र ठेवून ते ते क्रांतीलढ्यात उतरले. गिरीश कुबेर यांनी माहिती घ्यावी. त्यांना ती असेलही. कारण त्यांचे वाचन जागतिक पातळीवरील आहे. त्यांना वेळही भरपूर आहे. संपूर्ण महाराष्ट्र िफरून या महाराष्ट्राची बांधणी गेल्या ५०-६० वर्षांत कशी झाली... कोणी केली... त्यासाठी त्यांचा त्याग... समर्पण... काय होते..? याची माहिती घेण्याची त्यांना आवश्यकता नाही. पण, ज्याला गिरीश कुबेर कुटुंबाचं नशीब उजळून टाकलं म्हणतात... त्यांच्या माहिती करिताच हे लिहीत आहेत.  पहिल्यांदा किसन वीर... हे किसन वीर सातार जिल्ह्यातील मोठे क्रांतीकारक... त्यावेळच्या तुफान सेनेचे प्रमुख. कुंडलचे जी.डी. लाड. तिकडे नागनाथ नायकवडी... आणि इकडे किसन वीर... येरवड्याच्या तुरंगाच्या भिंतीवरून उडी मारून हा क्रांतिवीर सटकला.   

रात्री-अपरात्री कवठे येथे त्यांचे घर होते. पाठलागावर पोलीस होते. किसन वीर यांनी घराच्या भिंतीवरून पुन्हा उडी मारली.  दिवस उन्हाळ्याचे होते. बाहेरच्या अंगणात माणसं झोपली होती. िकसन वीर यांची उडी त्यांच्या मुलीच्या अंगावर पडली. ती ओरडणार म्हणून त्यांच्या सहकाऱ्याने मुलीचे तोंड दाबून ठेवले. किसनवीर सुसाट बंदूक घेवून पळत होते. इकडे मुलीचे प्राण गेले. कोणत्या बापाला याच्या वेदना होणार नाहीत... कुटुंबांचे कोणते नशीब त्यांनी उजळवले? पुढे किसन वीर यांना पुन्हा सक्त मजुरीची शिक्षा झाली. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर १९६२ साली सातारा जिल्ह्यातून लोकसभेवर शिंपी समाजातील हा माणूस क्रांतिसिंह नाना पाटील यांना पराभूत करून विजयी झाला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते.  १९६७ नंतर किसन वीरांनी सगळी निवडणुक यंत्रणा ताब्यात घेवून स्वत: निवडणुकीला उभे न राहता १९६७ पासून १९८० पर्यंत यशवंतरावांसाठी त्या मतदारसंघात ते राबले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १८ वर्षे अध्यक्ष झाले. आता जो अजितदादांच्या जरांडेश्वर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचा विषय सुरू आहे. त्या जरांडेश्वर कारखान्याला किसन वीर अध्यक्ष असलेल्या बँकेने ६०० कोटी रुपये कर्ज देण्याचे नाकारले होते.  याच किसन वीर यांनी सातारा सहकारी साखर कारखाना भुईंज येथे उभा केला. हजारो लोकांना रोजगार दिला... आयुष्यभर खादीचे कपडे वापरले. स्वत:चे कपडे स्वत: धूत असत... हे कितीजणांना माहीती आहे.   त्यांच्या घरी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, पु. ल. देशपांडे, एस. एम. जोशी, बाळासाहेब भारदे हे नेहमी यायचे.  किसन वीर यांनी उभ्या केलेल्या  सामाजिक आणि सहकारी संस्थेत त्यांच्या घरचा एकही माणूस त्यांनी लावलेला नाही. आजचा भुईंजचा किसन वीर साखर कारखाना हे नाव किसन वीर गेल्यानंतर नंतर संचालक मंडळाने दिलेले आहे. किसन वीरांवर कधीही, कोणीही कसलाही आक्षेप घेतलेला नाही. त्यांनी स्वत:चे काही उजळून घेतले नाही. अशी माणसं तुम्हाला पहायला मिळाली नाहीत, हे तुम्ही कुबेर असूनही तुमचं दारिद्र्यच म्हणावे लागेल. किसन वीर यांनी कसलीही चैन केली नाही... त्यांचे चारित्र्य आणि त्यांचा दरारा अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे. किसन वीर यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही गैर गोष्ट केली नाही. 

तुम्ही दुसरे घेतलेले नाव आहे ते वसंतदादांचे. दादा स्वातंत्र्य संग्रामात छातीवर गोळी झेललेले नेते आहेत. १९५२ साली आमदार झाले. १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत पुन्हा काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. शेतकरी सहकारी साखर कारखाना चालू केला. सूत गिरणी उभी केली. या न शिकलेल्या शहाण्या माणसाने महाराष्ट्रातील काँग्रेसला अध्यक्ष या नात्याने १९६७ साली २०२ आणि १९७२ साली २२२ काँग्रेस आमदार निवडून आणून दाखवले.  मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर एका क्षणाला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा फिरकावून देणारा हा मुख्यमंत्री. त्यांचे माहीमचे घर कुबेर यांनी पहावे. आयुष्य उजळवून टाकणारा तो महाल नाही.  सांगलीचे घर पहावे... दादा कोणाच्याही घरात कसे वावरत होते हे माहिती करून घ्यावं... किती लोकसंपर्क होता... पाच-पाच हजार कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवणारा हा नेता होता... अशा नेत्याबद्दल एक चुकीचे वाक्य असं वातावरण तयार करून जाते की,  राजकारणात दादांनी प्रचंड संपत्ती उभी केली. दादा िखशात हात घालून खिशात जे असेल ते दिवसभर देत राहिले. महाराष्ट्राने हे चित्र डाळ्यांनी पाहिलेले आहे. दुपारच्या वेळेला आलेला कोणीही माणूस दोन घास खाल्याशिवाय त्यांच्या घरून गेला नाही. दादा कोणत्याही महालात रहात नव्हते. हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी घडवले. शेकडो संस्था उभ्या केल्या. न शिकलेल्या नेत्याचे ते एक प्रकारे विद्यापीठच होते. अशा या दादांबद्दल तुमच्या त्या एका वाक्याने खूप मोठा गैरसमज होऊ शकतो. तुम्ही मुद्दाम लिहिले की अनावधानाने लिहिले हे माहिती नाही. पण जे लिहिले ते चुकीचे लिहिले. तुमचे काका वामनराव कुबेर मोठे होते, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. त्यांचा त्यागही मोठा आहे. पण तुम्ही तुलना करताना आमच्या काकांनी नशीब उजळवून घेतले नाही... असे ध्वनीत केले आहे. आणि त्यातून वसंतदादा, किसनवीर,  यांची काहीशी बदनामी होत आहे.  तुम्ही विद्वान आहात, हे खरे आहे...पण ग्रामीण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जडण-घडण यांच्याशी तुमचा संबंध आलेला नाही. पुस्तकातून वाचलेली माहिती तुम्हाला आहे तेवढीच... तुम्ही आंदोलने पाहिली नाहीत... नेते जवळून पाहिले नाहीत... तुम्हाला  यशवंतराव, दादा... एन. डी., गणपतराव, उद्धवराव या माणसांचा त्याग आणि समर्पण याची कल्पना येणे शक्य नाही. वातानुकुलीत खोलीत बसून हे समजू शकणार नाही. आपण मोठे संपादक आहात... छान लिहिता... खूप वाचता... पण, नकळत तुम्ही अन्याय करून गेलात... गणपतराव तपासे यांचा उल्लेख तुम्ही केलात... काय माहिती आहे तुम्हाला त्यांची? काय आयुष्य उजळवले त्यांनी... सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हा दलित समाजाचा नेता... यशवंतरावांनी त्यांना काही काळ मंत्री केले. त्यांच्याकडे कल्पना येणार नाही, असे खाते होते.. त्यांना ‘बाजार मंत्री’ म्हणायचे.  बाजार मंत्री म्हणजे काय? त्या काळात ग्रामीण महाराष्ट्रात आठवडी बाजार भरत असत.... ते मोकळ्या माळावर भरत... गणपतराव तपासे मंत्री झाल्यावर त्यांनी अनेक बाजार स्वत: फिरून अनेक खेड्यांत बाजारासाठी ओटे बांधून देण्याची योजना हाती घेतली. उन्हाचा त्रास वाचवण्यासाठी छप्पर बांधून घेतली... पाण्याच्या व्यवस्था केल्या. अनेक बाजारांना त्यांनी तासनतास भेटी देवून माहिती घेतली. आजच्या सारखी त्यावेळी झगमग नव्हती. कंदील लावून बाजार रात्रीपर्यंत चालायचे.  त्यांनी अायुष्यात काही मिळवले नाही. त्यांच्या मुलालाही काही मिळाले नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते होते. हे तुम्ही सांगितलेत... पण त्यांनी चार वर्षे सक्तमजुरी भोगली, हे महाराष्ट्राला माहित नाही. त्यांचा नातू आज पवारसाहेबांच्या  राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता आहे.  

या जुन्या काळातील माणसांची माहिती करून घ्या. महाराष्ट्राची बांधणी कशी झाली ते समजावून घ्या... १९७२ च्या दुष्काळाचा सामना नाईक साहेबांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने कसा केला, ते माहिती करून घ्या. रोजगार हमी योजनेत पाच-पाच लाख माणसं एकावेळी काम करत होती.  त्याचीही माहिती घ्या. त्यात दोन लाख स्त्रिया होत्या. पुरुष आणि स्त्रीच्या रोजगार हमी योजनेतील समान मजुरीसाठी काय लढा झाला हे समजावून  घ्या. त्यावेळी संध्याकाळी पॉवर कट होती. वीज कमी होती. रोजगार हमीवरून बाई घरी आली की, चक्की बंद असायची... आठ तास काम करुन आल्यावर जातं टाकून ज्वारी दळायला लागायची... पोरांना खाऊ घालून सकाळी उठून परत कामावर जावं लागायचं... त्यावेळच्या संवेदनाशील सरकारने काय निर्णय घेतला असेल? अर्धी मजुरी आणि अर्ध्या मजुरीचे ज्वारीचे दळलेले पीठ... कुबेरसाहेब, कल्पना करू शकणार नाही तुम्ही... एक-एक लाख पिशव्या महिलांनी उचलल्या. त्यांचे केवढे श्रम टळले. या पाच लाख रोजगार हमी कामावर ना कुणी पुरवणी काढली ना कुणी कौतुक केले... त्यात भ्रष्टाचार झाला... त्याला प्रसिद्धी भरपूर मिळाली... पण जे सकारात्मक झाले ते सांगायला आपण कोणीतरी पुढे आलो का? तुम्ही खूप मोठे संपादक आहात.... अर्थतज्ञा आहात. मी फार छोटा आहे. पण, आजचा महाराष्ट्र तुम्हाला जो दिसतो आहे तो त्यावेळच्या नेत्यांनी आपली घरं उजळून घेतली म्हणून घडलेला नाही. या महाराष्ट्राची विचारपूर्वक बांधणी केली. आणि ते राज्य निर्माण होण्यापूर्वीच्या स्वातंत्र्य संग्रामात तुरुंगवास भोगलेले हे लोक आहेत. तुमचे काका आज असते तर त्यांनीही तुम्हाला हेच सांगितले असते...  

मोठ्या वृत्तपत्राच्या संपादकांनी काही लिहिले तरी खपून जाईल, असे कृपया समजू नका. तुम्ही लिहिलेला अग्रलेख तुम्हालाच एकदा मागे घ्यावा लागला होता, एवढे लक्षात ठेवा. 
सध्या एवढेच
📞 9892033458

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.