Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मृत्यूनंतरही धडधडणार त्यांचे हृदय

मृत्यूनंतरही धडधडणार त्यांचे हृदय


सागंली : 'मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे' या म्हणीप्रमाणे सांगलीतील एका व्यावसायिकाने स्वत:च्या मृत्यूनंतर सहाजणांच्या जीवनाचा आधार बनत समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. रामानंद सत्यनारायण मोदानी असे या व्यावसायिकाचे नाव आहे. जीवाभावाचा माणूस गेला; परंतु जगाचा निरोप घेत असताना त्याने काहीजणांना जीवनदान द्यावे, या भावनेने रामानंद मोदानी यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अवयव दान केले.

रामानंद मोदानी (वय 45, रा. सांगली) या उद्योजकाचा ब्रेन डेड झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर उषःकाल या रुग्णालयाने त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत अवयवदानाचा प्रस्ताव मांडला. कुटुंबीयांनी तो मान्य केला. रुग्णालय प्रशासनानेदेखील तयारी पूर्ण केली. मुंबई आणि पुण्यात अवयव पोहोचविण्यासाठी सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते पुणे असे वेगवेगळे दोन ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते. वाहतूक पोलिसांनी त्यात मोलाचे योगदान दिले. अवयवांचा प्रवास सुरू झाला. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी अनेकजण रस्त्याच्या कडेला उभे होते. मानवी विकासातील हा टप्पा अनेकांनी याची देही डोळ्यात साठवला.

उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी यांच्या अवयवदानामुळे कुटुंबीय या निर्णयाने धन्य झाले. दुःखाची किनार तर होतीच; मात्र आपला माणूस खूपजणांच्या आयुष्याचा एक आधारवड बनणार असल्याच्या भावनेने त्यांना अश्रू अनावर झाले. मोदानी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांचा ब्रेन डेड झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर अवयवदानाचा विषय कुटुंबापुढे आला. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण वर्षभरापासून कृत्रिम श्वासावर असून त्याला हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे, ही माहिती आधीच होती. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली.

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन कॉरिडॉर राबविण्यात आले. हृदय ठरावीक वेळेत मुंबईत नेणे गरजेचे होते. कोल्हापूर विमानतळावरून खासगी विमानाने ते नेण्याचे ठरले. सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कॉरिडॉर पथक तयार करण्यात आले. रुग्णालयातून हृदय आणि फुफ्फुस घेऊन पथक सुसाट वेगाने कोल्हापूरकडे रवाना झाले. अंकलीमार्गे कोल्हापूरला जाणार्‍या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर केले. सत्तर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला. अग्रभागी पोलिस गाडी, मध्यभागी रुग्णवाहिका आणि शेवटी हृदय ठेवलेली रुग्णवाहिका, त्यानंतर एक पोलिस गाडी असा सुसाट वेगाने निघालेला ताफा अवघ्या 34 मिनिटांत कोल्हापूर विमानतळावर पोहोचला. त्यानंतर विमानतळावर सज्ज असणार्‍या विमानाने उड्डाण केले व एका तासात मुंबई गाठली. सायंकाळी पाचच्या सुमारास हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रियाही सुरू झाली होती.

दरम्यान, अन्य अवयव पुण्यासाठी रवाना झाले. मिरजेचे वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांनी त्यासाठी कॉरिडॉर केला. तीनच्या सुमारास ते अवयव निघाले. इस्लामपूरमार्गे ताफा रवाना झाला होता. अवघ्या अडीच तासात ताफा पुण्यात दाखल झाला. दोन रुग्णांना प्रत्यारोपण केले जाणार आहे. सांगलीतील दोन रुग्णांना नेत्रदान होईल. 2018 मध्ये सांगलीच्या भारती हॉस्पिटलमधून असेच ग्रीन कॉरिडॉर करीत हृदय नेण्यात आले होते.

मोदानी बनले सहा जणांचे आधारवड

मोदानी यांचे हृदय, फुफ्फुस, किडनी आणि डोळे हे अवयव सहाजणांवर प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत. एक मोदानी हे सहाजणांचे आधारवड बनले आहेत. ज्या व्यक्तीला गरज आहे, त्या व्यक्तीला अवयवदान करून ज्यांचा जीव वाचविण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहनही यावेळी मोदानी यांच्या कुटुंबीयांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.