Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाणे : पोलिसांवर जीवघेणा हल्ला; आठ इराणी महिलांवर मोक्का अंतर्गत कारवाई

ठाणे : पोलिसांवर जीवघेणा हल्ला; आठ इराणी महिलांवर मोक्का अंतर्गत कारवाई


ठाणे : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी काबिल्यात गुन्हेगारांना पकडण्यासाठी अंधेरी पोलिसांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

पोलिसांवर हल्ला करण्यात अग्रभागी असलेल्या आठ इराणी हल्लेखोर महिलांवर गुरूवारी (दि.९) मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. याशिवाय हल्ला करणाऱ्या इतर ३५ हल्लेखोरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. याची माहिती आज (दि.१०) खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली.

दिवाळीत लुटण्याची पूर्वतयारी

दिवाळीत सोन्या – चांदीचे दागिने, हिरे व इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. अशा लोकांच्या ठिकाणांची माहिती काढायची. त्यानंतर दरोडा कुठे आणि कसा टाकायचा याच्या पुर्वतयारीसाठी हे इराणी लुटाऊ काबिल्यात जमले होते. तसेच लुटलेल्या मालाची वाटणी कश्याप्रकारे करायची, याचेही नियोजन यावेळी सुरू होते.

मुंबई पोलिसांसह कल्याणच्या पोलिसांची कारवाई

मुंबईतील अंधेरी भागात चोरी केलेल्या एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी अंधेरी पोलिसांचे एक पथक स्थानिक पोलिसांसह बुधवारी (दि.८) रात्री आंबिवलीतील इराणी काबिल्यात घुसले. स्थानिक खडकपाडा पोलिस ठाण्याचे सपोनि अनिल गायकवाड, सपोनि मधुकर दाभाडे, हवा. नवनाथ डोंगरे, हवा. संजय चव्हाण, कॉ. कुंदन भामरे, कॉ. अविनाश पाटील, कॉ. नवनाथ काळे, कॉ. अनंता देसले यांच्यासह अंधेरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर परकाळे, उपनिरीक्षक यादव, हवा. मारूती सुरकर, हवा. संदिप शिंदे, कॉ. प्रविण जाधव, कॉ. विजय मोरे, कॉ. वसंत नरकर, कॉ. अविनाश कापसे, कॉ. प्रविण कांबळे या पोलिसांनी एका घराला वेढा घातला. त्यानंतर चोरट्यांच्या कुटुंबीयांनी ओरडाओरडा केल्याने काबिला जागा केला.

दगडांच्या तुफान माऱ्याने पोलिस हबकले

काबिल्यातील इराण्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करून हसन अजिज इराणी, अब्बास युनूस इराणी जाफरी उर्फ बड्डा़, तालीफ राजू अली इराणी, मोहम्मद अजीज इराणी व मोहम्मद नासर इराणी यांना पळून लावले. या झटापटीत पोलिसांनी तिघांना पकडले. परंतु हिंसक इराण्यांनी दगडांचा तुफान मारा केल्याने बचावाची भूमिका घेताना पोलिसांच्या तावडीतून चोरटे पळून गेले. मात्र एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसावर जीवघेणा हल्ला

पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात १० हून अधिक पोलिस जखमी झाले. एका पोलिसावर जीवघेणा हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच मोहमम्मद अजीज इराणी व हसन अजिज इराणी या दोघांनी कॉ. अनंता देसले यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. या धुमश्चक्रीची पोलिसांनी केलेल्या शुटींगद्वारे हल्लेखोरांची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये अब्बास युनूस इराणी जाफरी उर्फ बडा, हसन अजिज इराणी, रजा इराणी, सावर रजा इराणी, मुसा रजा इराणी, मोहम्मद अजिज इराणी, मोहम्मद लाला इराणी, मोहम्मद नासर इराणी, ईब्राहीम फिरोज इराणी, सिरन रजा इराणी, आसिया अजिज इराणी, शबा सावर इराणी, बिटट्टी मुसा इराणी, फिरदोस संजय इराणी, बेनजीर युसूफ इराणी, कुब्रा खादम इराणी, रबाब लाला इराणी, तालीफ राजू अली इराणी व इतर १० ते १५ अनोळखी महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. याप्रकरणी हवालदार राहुल शिंदे यांच्या फिर्यादीवरून ३५ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला करण्यात ८ महिला आघाडीवर

काबिल्यातील ८ महिला नेहमीच हल्ला करण्यात आघाडीवर असतात. अशा ८ सराईत हल्लेखोर महिलांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयारी केली आहेत, असे पाटील यांनी सांगितले. या गुन्ह्याचा अधिक तपास करण्याची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. के. यशवंतराव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.