Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा आरक्षण समितीवर सदावर्तेंचा आक्षेप, 'विशिष्ट लोकांसाठी त्यांचेच न्यायाधीश...'

मराठा आरक्षण समितीवर सदावर्तेंचा आक्षेप, 'विशिष्ट लोकांसाठी त्यांचेच न्यायाधीश...'


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. सरकारला मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र होत असतानाच मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला असंवैधानिक म्हणून विरोध केला आहे. इतकेच नाही तर आरक्षणाबाबत सरकारने नेमलेल्या शिंदे समितीवरही आक्षेप नोंदवत प्रश्न उपस्थित केले आहेत.

सरकारने नेमलेल्या मराठा आरक्षणाबाबतची न्या. शिंदे समितीवर विशिष्ट समाजाच्या न्यायमूर्तींचे नेमणूक करणे चुकीची परंपरा आहे, असे सदावर्ते यांनी परखड मत व्यक्त केले आहे. सदावर्ते म्हणाले, "कोणत्याही धोरणावर जेव्हा आपण समिती नेमतो, त्या वेळी आपली भूमिका तटस्थ असली पाहिजे. आपण विशिष्ट समाजाचं काम करण्यासाठी विशिष्ट समाजाचे न्यायाधीश समितीवर नेमू लागलो, तर अशी परंपरा चांगली नाही. मला कोणत्याही निवृत्त न्यायाधीशांच्या समाजावर बोलायचं नाही; पण ही परंपरा चांगली नाही. विद्वान असतील त्यांना घ्यावं, पण विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून अशा प्रकारचं काम देऊ नये, अशी भूमिका सदावर्तेंनी मांडली.

सदावर्तेंची मराठा आंदोलकांच्या विरोधात याचिका

गुणरत्न सदावर्तेयांनी मराठा आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटलांच्या सभेवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यानंतर आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्याची घटना घडली. आता सदावर्ते यांनी हायकोर्टात मराठा आंदोलकांच्या हिंसक कारवायांविरोधात याचिका दाखल केल्यामुळे सदावर्ते आणि आंदोलक यांच्यातील वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 8 नोव्हेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे यावर आता हायकोर्ट काय टिप्पणी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.