तासगाव तहसीलदारांनी स्वतःच्या गाडीतून आंदोलकाला नेले दवाखान्यात
तासगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री मनोज पाटील या उपोषणकर्त्याची तब्बेत अचानक बिघडली.
याबाबत तहसीलदार रवींद्र रांजणे यांना माहिती देण्यात आली. रांजणे अवघ्या 10 मिनिटात उपोषणस्थळी दाखल झाले. मात्र रुग्णवाहिका वेळेत न आल्याने रांजणे यांनी समयसूचकता दाखवत पाटील यांना स्वतःच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रांजणे यांच्या या संवेदनशीलतेचे मराठा समाजाकडून कौतुक होत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे - पाटील यांनी गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने, रास्ता रोको, बैठका, ग्रामसभा यासह राजीनाम्यांचे सत्र सुरू आहे.तासगाव तालुक्यातही अनेक गावात आंदोलने, उपोषणे होत आहेत. नेत्यांना गावबंदीही करण्यात आली आहे. तासगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या पाच दिवसांपासून अक्षय पाटील, विशाल शिंदे, शरद शेळके, प्रवीण पाटील व मनोज पाटील या युवकांनी उपोषण सुरू केले आहे.त्यांना तासगाव शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने तासगाव येथे दोन दिवसांपूर्वी भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो युवक, महिला सहभागी झाले होते. तर काल (बुधवारी) अनेक युवकांनी मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. आज सायंकाळी सत्ताधारी मंडळींचा तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे.दरम्यान, मध्यरात्री मनोज पाटील या उपोषणकर्त्याची तब्बेत अचानक बिघडली. मराठा समाजाने याबाबत तहसीलदार रवींद्र रांजणे यांना माहिती दिली. रांजणे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःची गाडी स्वतः चालवत उपोषणस्थळी भेट दिली.
यावेळी सरकारविरोधात मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका वेळेत न आल्याने आंदोलकांचा संताप वाढला. आंदोलक आक्रमक होत असल्याचे पाहून तहसीलदार रांजणे यांनी समयसूचकता दाखवत मनोज पाटील यांना स्वतःच्या गाडीत घेतले. स्वतः गाडी चालवत त्यांनी पाटील यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे..दरम्यान, आज सकाळी अक्षय पाटील यांचीही प्रकृती खालावल्याने त्यांनाही उपचारासाठी दाखल केले. उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडत चालल्याने मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. आंदोलकांच्या सहनशीलतेचा अंत होतोय. यातून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षण प्रश्नावर तोडगा न निघाल्यास परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.