Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रक चालकाची लुटमार करणाऱ्या तिघांना अटकपावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

ट्रक चालकाची लुटमार करणाऱ्या तिघांना अटकपावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई


सांगली :  सांगली-तासगाव रस्त्यावर ट्रक चालकाला अडवून मारहाण त्याला लुटणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक मोबाईल असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

स्वप्नील संजय साबळे (वय २३, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली), प्रशांत शिवाजी शिंदे (वय २९, रा. रतनशीनगर, सांगली), परेशराम गिरमल कांबळे (वय ३४, रा. रविवार पेठ, माधवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सांगली-तासगाव रस्त्यावर एका ट्रकचालकाला अडवून त्याला मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता. याप्रकरणी आकाश कदम (रा. कर्जत, अहमदनगर) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर यातील चोरट्यांना शोधण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. 

या गुन्ह्याबाबत माहिती घेत असताना पथकातील विक्रम खोत यांना ही चोरी स्वप्नील साबळेसह त्याच्या अन्य साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. शिवाय ते माधवनगर-कर्नाळ रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ थांबल्याचीही माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता तिघेजण तेथे संशयास्पदरित्या थांबल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ट्रक चालकाला लुटल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. त्यांना तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, अमर नरळे, विक्रम खोत, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.