Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंतिम सामना भारत जिंको... तरी महानायक मॅक्सवेलच... मधुकर भावे

अंतिम सामना भारत जिंको... तरी महानायक मॅक्सवेलच... मधुकर भावे

‘दिवाळीच्या दिवसांत राजकारणावर लिहू नका’ अशी एका वाचक मित्राची सूचना होती. चांगली वाटली. राजकारणाचा वाचकांना उबग आला आहे. हे त्या प्रतिक्रियेतून दिसत होते. दोन लेख राजकारणाच्या विरहित लिहिले. आज एका तिसऱ्या विषयावर लिहितोय... त्यासाठी ६०-७० वर्षे मागे गेलोय... ­८-१० वर्षांचा असल्यापासून, मुंबईत येईपर्यंत खूप क्रिकेट खेळलो. १९६१ ते १९९० नागपूर येथील विधानसभा अधिवेशनाला सलग ३० वर्षे जाणारा मी एकमेव पत्रकार. ितथं रहायची चांगली सोय... आणि मोकळे मैदान... आम्ही क्रिकेटची ओढ असणारे चार-पाच पत्रकार मित्र, सकाळच्या वेळी तिथे क्रिकेट खेळायचो... हिवाळ्यात नागपूरची हवा छान असते. आज ३३ वर्षे झाली... त्यानंतर फारसे खेळता आले नाही. पण, १९६० पासून मुंबईतील कोणताही क्रिकेट सामना सहसा चुकवला नाही. हा खेळ या देशात तरी कमालीचा लोकप्रिय आहे. सगळं जग फुटबॉल खेळते... कि्रकेटमध्ये ज्याला ‘विश्वकप’ म्हणतात... ते ‘विश्व’ फक्त दहा देशांचे आहे.  पण त्या दहा देशांत फुटबॉलही लोकप्रिय आहे. फक्त आणि फक्त क्रिकेटच अतिप्रिय असलेला भारत हाच एकमेव देश आहे. आता तर सलग सामने झाले.  एशिया कप... मग विश्वकपचे ५० षटकांचे सुरू असलेले सामने. मग लगेच अॅास्ट्रेलियाच्या विरोधातील २०-२० पाच सामने होणार. मग साऊथ आफ्रिका दौरा... वर्षभर क्रिकेट चालूच असते.

५० वर्षांपूर्वीचा काळ आठवतो... जेव्हा बापू नाडकर्णी सांगायचा.. ‘पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात दिवसाला दहा रुपयांप्रमाणे ५० रुपये मिळायचे.’ तेव्हा जाहिरातीत चमकायची संधी नव्हती.  फलंदाज उत्तम होते... पण, क्रिकेटला व्यवसायिक रूप देण्याची क्षमता बाजारात नव्हती. त्यामुळे अगदी लाला अमरनाथ, विजय मर्चंट, विजय हजारे, पॉली उम्रीगर नंतरचा गावसकर, विश्वनाथ, वेंगसकर, अझहर असे दिग्गज फलंदाज... पण, त्यांचे मानधन किती?... आताच्या खेळाडूंना पैसे कुठे ठेवावेत, असा प्रश्न... इतका त्यांचा भाव वाढलेला.. एका अर्थी चांगले आहे. पण, जुन्या खेळाडूंनी क्रिकेट जपले. एक काळ आठवतो... जेव्हा नवीन कोऱ्या चेंडूवर पहिली ओव्हर करसन घावरी याने टाकल्यावर त्याच नव्या चेंडूवर दुसरी ओव्हर टाकायला भारतीय संघात वेगवान किंवा मध्यमगती गोलंदाज नव्हता..... याच वानखेडेवर घावरीनंतर नव्या चेंडूची दुसरी ओव्हर सुनील गावसकर याने टाकली हाेती, हे आज खरे वाटेल का? फाळणी होण्यापूर्वीचा जलदगती गोलंदाज होता फजल महम्मद  इंग्लंडच्या १९५२ च्या पहिल्या दौऱ्यात दत्तू फडकर आणि स्पीनर विनू मंकड... १९६० साली रमाकांत देसाईचा उदय झाला... तो त्या मानाने भारताचा त्यावेळचा सगळ्यात वेगवान गोलंदाज... तसा पांडु साळगावकर त्याहीपेक्षा वेगवान होता... पण, ‘बॉडीलाईन’ बॉलींग करण्यामुळे त्याला बाजूला करावे लागले.  कपील देवचा उदय होईपर्यंत, जगाने धास्ती घ्यावी, असा आपल्याजवळ वेगवान गाेलंदाज नव्हता. जी होती स्पीनर चौकडी- चंद्रा, बेदी, प्रसन्ना, व्यंकट या चौघांमुळे प्रतिभावंत गोलंदाज राजेंद्र गोयल आणि महाराष्ट्रातील पद्माकर शिवलकर यांना दाबले गेले. पद्माकरचे तर वाईट वाटतं... इतका गुणवंत गोलंदाज होता पण, संधी मिळाली नाही. प्रथमश्रेणी आणि रणजी सामन्यात एकूण १२४ सामन्यांत ५८९ विकेट घेणारा हा पद्माकर आज ८० वर्षांचा आहे.  तो मुंबईचा असून, कायमचा उपेक्षित राहिला...  वयाच्या  ५० व्या वर्षांपर्यंत प्रथमश्रेणी सामन्यात त्याने गोलंदाजी केली आहे. नशीब नसले की, गुणवत्ता यश मिळवून देत नाही. ितकडे प्रतिभा असून विनोद कांबळीला नशीबाने किंवा त्याच्या चुकीच्या काहीबाही वागण्याने संधी मिळाली नाही. सचिनबरोबर विनोद कांबळीने ३०० धावांची खेळी केली आहे. हे आता लोक विसरूनही गेले.

आय. पी. एल. नंतर सगळेच क्रिकेट बदलले...  जागतिक दर्जाचे खेळाडू अनेक देशांत खेळू लागले. अनेक देशांच्या खेळपट्यांमध्ये फरक असले तरी आय. पी. एल. आणि अन्य देशांतील अशा प्रीमिअर सामन्यांमुळे, सगळ्याच देशातील खेळाडूंना अशा विविध खेळ्पट्ट्यांचा सराव झाला.  भारतातल्या कडक उन्हाचाही सराव झाला. शिवाय क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा झाली. ५० वर्षांपूर्वीच्या आपल्या खेळाडूंचे क्षेत्ररक्षण जागतिक पातळीवर कुठेच चर्चिले जात नव्हते. मन्सूर अली पतौडी याने प्रथम ‘अॅाल इन वन अॅक्शन’ म्हणजे जमिनीलगतचा चंेडू हवेत हात उंचावून मग फेकायचा... हे नेहमीचे तंत्र बदलून चेंडू उचलला की, जमिनीलगत वेगाने थ्रो करायचा... यात पतौडी हा पहिला... फार न खेळलेला पण अशोक मंकड हा दुसरा... आणि इंग्लंडचा डेरेक अंडरवूड आणि दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रॉड... क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचे असते. हे त्यानंतर भारतीय संघाला कळले. आय. पी. एल. चे अनेक फायदे झाले... मिरासदारी मोडली गेली. नाहीतर रिक्षा चालवणाऱ्या एका कष्टकऱ्या चा मुलगा सिराज जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज झाला नसता. याच विश्वकप सामन्यात एकही धाव न देता लागोपाठ ३ बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज ठरला. २०१५ च्या विश्वकप सामन्यापर्यंत फलंदाजीत आक्रमकता नव्हती. ५० षटकांच्या सामन्यात पहिली १० षटके ही झोडपायची षटके आहेत... कारण रिंगच्या बाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक असतात. यावर्षीच्या सामन्यात ही आक्रमकता दिसली. विशेषत: रोिहत आणि गील आणि विराटकडून. सर्व साखळी सामने आपण जिंकलो आहोत... यापूर्वीही आपण असा पराक्रम केला आहे.  परंतु पहिला उपांत्य सामना किंवा दुसरा सामना असो..  आपण दडपणाखाली गेलाे आणि हरलो. जागतिक कसोटी सामन्यातही अंतिम सामन्यात पोहोचलो आणि न्यूझिलंडकडून हरलो... आता न्यूझिलंड आणि नंतर अंतिम सामन्यासाठी जो संघ येईल तो... त्या विरोधात आपण िजंकू, अशी अपेक्षा करू या...

२०११ ला धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने विश्वकप जिंकला. २०१५ आणि २०१९ अंतिम सामन्यापर्यंत जाऊन आपण हरलो... ती वेळ यावेळी येऊ नये. अर्थात हे क्रिकेट आहे... ५० धावांत लंकेचा संघ सर्वबाद झाला... आपणही अॉस्ट्रेिलयाविरुद्ध एका सामन्यात ३२ धावांत सर्वबाद झालो होतो....  अनेक संघ अशा अडचणींतून जातात. एक संदर्भ म्हणून सांगतो... १९५२ साली इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघ पहिल्या डावात स्टॅथम आणि ट्रुमन यांच्या वेगवान गाेलंदाजीपुढे भारताचे पाच फलंदाज चार धावांत गारद झाले होते. त्यानंतर विनू मंकड मैदानावर आला. एक बाजू विजय हजारे याने लावून धरली होती.  दुसऱ्या  बाजूने मंकडने १८४ धावा फटकावल्या...  इंग्लंडची राणी हे सामने बघत होती... लॉर्डस मैदानावर ती आली आणि तिने मंकडचे अभिनंदन केले. क्रिकेट हे असे अनिश्चित आहे. सध्याच्या सामन्यातील न्यूझिलंडच्या डेव्हिड कॉन्वेची १५४ धावांची खेळी आठवा. भन्नाट खेळी होती. पण नंतर त्याची लय गेली. क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ त्यामुळेच मानला जातो... ते कसेही असो... १५ आणि १६ नोव्हेंबरला उपविजेत्या संघांचे सामने झाल्यावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना आहे.  त्यात आपण जिंकू, अशी अशा करू या...


पण... या विश्वकप सामन्यात अंतिम सामना कोण जिंकतो यापेक्षासुद्धा या मालिकेचा खरा नायक झाला आहे तो ग्लेन मॅक्सवेल... आजपर्यंत असा खेळ कोणीही केलेला नाही.  आणि पुढे कोणी करेल अशी शक्यता नाही. फलंदाज खूप झालेत... अगदी डॉन ब्रॉडमन, लेन हटन, फ्रॅक वॉरेल, व्हिवन रिचर्ड खूप नावं आहेत.. पण पाऊल उचलणे शक्य नसताना... पायाची हलचाल शक्य नसताना... पाऊल पुढे टाकता येत नसताना... मागे जाता येत नसताना..  क्रिकेटच्या परिभाषेत ‘फ्रंटफूट,’ ‘बॅकफूट’ कसलीही हालचाल करता येत नसताना.... संघ हरण्याच्या स्थितीत असताना... ७ बाद ९१ अशी संघाची स्थिती असताना समोरचा नवखा संघ अफगाणिस्थान यांनी दिलेले टार्गेट २९२ एवढे मोठे असताना... म्हणजे तब्बल जवळजवळ २०१ धावा करायच्या असताना... ग्लेन मॅक्सवेल या अॅास्ट्रेलियन फलंदाजाने जी खेळी त्या दिवशी केली त्याला जगात तोड नाही... २१ चौकार आणि १० षटकार याची बेरीज होते १४४.... एकूण धावा २०१... विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा २०१... समोर साथ देणारा कप्तान पॅट कम्युन्सने ११ षटके खेळून काढली. म्हणजे ६६ चेंडू. आणि धावा १२.. पण एक बाजू लावून धरली. पण ज्याला चालता येत नाही... पाय हलवता येत नाही... हातातील छडीने एखाद्या शिक्षकाने जुन्या काळात विद्यार्थ्याला सपासप  छड्या मारव्यात, अगदी त्याच स्टाईलने जागेवर उभे राहून मॅक्सवेलने स्टँडमधये भिरकावून दिलेले ते दहा षटकार आता पुन्हा कधीही कोणालाही मारता येणार नाहीत. एक षटकार तर असा होता की, तो मारल्यावर त्याला थोडी चक्कर आली.. त्याने स्वत:भोवती एक गोल फेरी मारली. उजवा पाय वर उचलला. बॅट जमिनीवर टेकून आधार घेतला... फिजिओ आला... त्याने थोडीशी ट्रिटमेंट केली... पेनकिलर गोळी खाली आणि हे सगळं झाल्यावर ७० धावा करायच्या होत्या. मॅक्सवेल कसलाही तणाव न घेता खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने सामना िजंकून दिला. या विश्वकप सामन्यात ही जी खेळी झाली, त्याला तोड नाही. सामना हरले असते तर अॅास्ट्रेलियन संघ स्पर्धेतून बाहेर गेला असता. सामना जिंकून दिल्यावर मॅक्सवेलला हत्तीचे बळ आले. पुढच्या सामन्यात त्याला विश्रांती दिली. आता दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध १६ तारखेला  तो पुन्हा मैदानात उतरेल.. त्याच्या नावावर एक विक्रम असा झाला की, पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी (चेस) त्याने केलेल्या २०१ धावा हा नवा विक्रम घडला.  विश्वकप सामन्यात यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझिलंडच्या मार्टीन गुप्टीलने २१५ धावा वेस्टइंडीजविरुद्ध केल्या आहेत आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिसगेलने २०१५ सालीच याच विश्वकप सामन्यात २३७ धावा झिम्बॉब्वेविरुद्ध केलेल्या आहेत.  पण, त्या ‘पाठलागा’(चेस) च्या धावा  नव्हत्या. आणि दोघेही जखमी नव्हते.  मॅक्सवेल हलू शकत नसताना दहा षटकार आणि २१ चौकार ठोकायचे.... त्याकरिता क्रिकेट परिभाषेतील टायमिंग, चेंडूवरील नजर आणि मनगटातील ताकद सर्वांचा मेळ जमला तरच हे शक्य आहे. क्रिकेटमध्ये सामान्यपणे षटकार मारताना ‘फ्रंटफूट’वर यावे लागते... ‘बॅकफूट’वर जाऊन षटकार मारणारा एखादा लाईड... पण, मॅक्सवेलने क्रिकेटच्या सगळ्या परिभाषेवर मात करून एक अभूतपूर्व खेळी केली. त्यामुळे हा विश्वकप कोणीही िजंको... या विश्वकपातील जखमी असताना खेळलेला महानायक मॅक्सवेल हाच आहे.

दोन-तीन आठवणी जाग्या झाल्या...  त्यात ११ फेब्रुवारी १९५९ ला मुंबईच्या ब्रेब्रॉन स्टेडियमवर  खेळताना चंदू बोर्डे याला फलंदाजी करताना रॉय गिलख्रिस्ट या वेंस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू तोंडावर बसला ती आठवण. त्यावेळी हेल्मेट नव्हते. चंदू बोर्डे यांचे दोन दात खाली पडले.  आधी दात पडले... मग चेंडू पडला... रक्ताची धार लागली.  बचकभर कापूस तोंडात घालून चंदू बोर्डे काहीवेळ निवृत्त होऊन आठव्या क्रमांकावर पुन्हा खेळायला आले. ९६ धावा केल्या. जखमी अवस्थेत पुन्हा खेळायला आल्यावर चौकार मारला... शतक होणार म्हणून गिरकी मारली.... चेंडू सीमारेषेला पोचायच्या आत,  गिरकी मारताना बॅट स्टम्पला लागली. बेल खाली पडल्या... चंदू बोर्डे बाद झाले.. शतक झाले नाही... पण शतक झाल्यानंतरही जो विजयाचा जल्लोष झाला असता तेवढाच जल्लोष ब्रेब्रॉन स्टेडियमवर झाला.

मॅक्सवेलचा या सामन्यातील खेळ पाहताना चंदू बोर्डे यांच्या पराक्रमाची आठवण झाली. त्याच चंदू बोर्ड यांच्या सामन्यात विजय मांजरेकर यांचा अंगठा फॅक्चर झाला होता. आणि पॉली उम्रीगर यांच्या दंडाला ग्रीफीतच्या वेगवान चेंडूने फॅक्चर झाले होते. या घटनेला आता ६३ वर्षे झाली.  १९६२ साली भारतीय विकेटकिपर नरी कॉन्ट्रॅक्टर, हेल्मेट नसताना किपींग करत होते... त्यांच्या डोक्याला बाब्रोडोस सामन्यात ग्रीफिथचा चेंडू लागला... ते बेशुद्ध झाले आणि सहा महिने कोमात होते... नंतर पुढे ते क्रिकेट खेळू शकले नाहीत.

२५/११/२०१४ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर अॅास्ट्रेलियाचा व्ह्यूज फिलिप्स शिल्ड मॅच खेळताना जबर जखमी झाला. कोमात गेला... आणि दोन दिवसांनी म्हणजे २७ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला. सगळं क्रिकेट जग हळहळले... आणि सर्वात महाभयंकर घटना म्हणजे आपल्या देशाचा रमण लांबा बांगलादेशातील ढाका येथे २१ फेब्रुवारी १९९८ ला लीग मॅच खेळत असताना मेहराब हुसैन बॅटिंग करत होता... सैफुद्दीन खान हा बॉलर होता... मेहराबने शॉट फॉरवर्ड लेगला मारलेला सणसणीत फटका रमण लांबाच्या कपाळावर आपटला... रक्ताची धार लागली. चक्कर येऊन लांबा खाली पडला.. दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

क्रिकेटमधील या दु:खद घटना आहेत. वेगवान वेगवान गोलंदाजासमोर खेळताना ज्यावेळी हेल्मेट नव्हती.... आर्मगार्ड नव्हते... फक्त सेंटरपॅड होते... त्या काळात भन्नाट वेगासमोर फलंदाजी करणारे किती महान फलंदाज असतील... आता अनेक सुरक्षा आल्या. मैदानावरच फिजीओ थेरपिस्ट तयार आहे. उत्तम हॉस्पिटल आहेत.. लगेच उपचार आहेत... हवा तेवढा खर्च करता येतो... अाणि ट्रूमन स्टॅथम किंवा हॉल ग्रीलख्रिस्थ किंवा अॅण्ड्री रॉबर्ट किंवा लिण्डवॉल, शोएब अख्तर यांच्या वेगाचे गोलंदाज आज नाहीत.

पण सुदैवाने भारताजवळ सध्या जी वेगवान चौकडी आहे... त्यामुळे भारतीय क्रिकेट एका उंचीवर पोहोचलेले आहे. पूर्वी नव्या चेंडूचे पहिले षटक झाले की, बेदीकडे गोलंदाजीसाठी चेंडू दिला जायचा... आज आपल्याकडे जुन्या काळातील स्पीन गोलंदाजांच्या चौकडीप्रमाणे किमान मध्यमगती बुमराह, शामी, सिराज, प्रसिद्धकृष्णा, कामचलाऊ शार्दुल असे गोलंदाज आहेत. पण, अफगाणिस्थानकडे वेगवान गोलंदाजांचा मोठा ताफा नसताना त्यांनी त्यांच्या फिरकीवर चार सामने जिंकले. मॅक्सवेलला दोनदा जीवदान मिळाले. हे त्याचे नशीब. पण, जाता-जाता एक सांगतो... यावर्षी कोणीही िजंको... २०२७ ला जेव्हा विश्वकप होईल तेव्हा त्या ट्रॅाफिचा पहिला  हकदार अफगाणिस्थान संघ असू शकेल... कुठून कुठे पोहोचले आहेत ते... त्यांच्या देशात भयानक परिस्थिती आहे... अराजक आहे... अन्नधान्याची अडचण आहे... आर्थिक तंगी आहे... भूकंपामुळे शहरं बरबाद आहेत... त्याही िस्थ्ातीत त्यांची टीम आणि राशिद, नबी, मुजीब ज्या दर्जाची गाेलंदाजी करत आहेत ते चार सामने जिंकून मायदेशी परतले... त्यांच्या देशाने त्यांचे विजयी स्वागत केले. ट्रॉफि जिंकली नसतानाही विजयी स्वागत होते ही पुढच्या विजयाची नांदी आहे.

ते कसेही असो... या विश्वकपातील जागतिक किर्ती मिळवणारा मॅक्सवेल हाच महानायक.  अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाचे कौतुक होईलच... भारताला ते भाग्य मिळो... विराटचे ५० वे शतक होवो, ही सगळ्यांचीच भावना. पण भारताने अंतिम सामना जिंकला तरीसुद्धा या विश्वकपाचा महानायक भारत किंवा भारतीय खेळाडू होणार नाहीत... ते अंतिम सामन्यातील  विजयी खेळाडू ठरतील... महानायक ठरला आहे तो मॅक्सवेलच..

सध्या एवढेच


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.