दुष्काळ जाहीर करा मागणी करत 'प्रहार'च्या पदाधिका-याने जत तहसीलदारांची गाडी फाेडली
राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत जत तालुका समाविष्ट नाही. त्यामुळे जत मधील नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच आज (बुधवार) जतच्या तहसीलदार यांची गाडी फोडण्याचा प्रकार घडला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शुक्रवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्वपक्षीय नेत्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले हाेते. यावेळी जत तालुक्याला दुष्काळ यादीत समावेश न केल्यामुळे उपाेषणकर्त्यांनी शासनाच्या आदेशाची होळी केली हाेती.
दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत सांगली जिल्ह्यातील खानापूर, मिरज, शिराळा, कडेगाव या तालुक्यांचा समावेश झाला आहे. जत तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश न झाल्याने जत मधील नागरिक आक्रमक झाले. आज प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी जतच्या तहसीलदार यांची गाडी फोडली. बागडे हे जत तालुका दुष्काऴी जाहीर करा अशी मागणी करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.