भिकाऱ्याला जिवंत जाळलं, स्वत:चा मृत्यू झाल्याचे भासवून विम्याचे 80 लाख हडपले..
अहमदाबाद : पैशांचा मोह वाईट.. त्या मोहापायी एखादा माणूस कोणत्याही थराला जाऊन कोणतेही कृत्य करू शकतो. त्यावेळी तो चांगल्या वाईटाचा, योग्य- अयोग्य याचा काहीच विचार करत नाही. त्याला फक्त दिसत असतो तो पैसा. पण तो पैसा मिळवण्याच्या हव्यासापायी केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि नंतर हातात पश्चातापाशिवाय काहीही उरतच नाही.
अशाच एका भीषण कृत्याचा अहबदाबाद क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केला. क्राईम ब्रांचने एका अशा आरोपीला अटक केली, ज्याचा 17 वर्षांपूर्वी एका कार अपघातात होरपळून मृत्यू झाला होता. कुटुंबियांनी त्याचे अंत्यसंस्कारही केले होते. त्यानंतर कुटुंबियांनी त्याच्या नावे असलेले इन्श्युरन्सचे 80 लाख रुपयेही मिळवले. आता त्याच मृत इसमाला क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हो हे खरं आहे… पण त्याच्या अटकेनंतर एक मोठ गुपित उलगडलं , ज्याचा खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले. आरोपी अनिल सिंह उर्फ राजकुमार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
खरंतर, कार अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो तर एक भिकारी होता. विम्याची 80 लाख रुपयांची रक्कम हडपण्यासाठी त्या इसमाने भिकाऱ्याची हत्या केली. आपली ओळख मिटवण्यासाठी त्याने भिकाऱ्याचा मृतदेह गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवून जाळला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते.
गौतमबुद्ध नगर मधील रहिवासी आहे आरोपी
अहमदाबाद मधील क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचे खरे नाव अनिल सिंह असून तो गेल्या काही वर्षांपासून राजकुमार नावाने रहात होता. त्याला मनमोहन नगर निकोल येथून अटक केली. अनिल सिंह उर्फ राजकुमारने अत्यंत चलाखीने एलआयसी इन्शुरन्समधून त्याच्या नावावर असलेले 80 लाख रुपयेही मिळवले. आरोपी राजकुमारचे खरे नाव अनिल असून तो उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी उघड केली. त्यानंतर त्याने राजकुमारच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवली आणि 2006 सालापासून तो अहमदाबादमध्ये राहत होता.
जेवण देण्याच्या बहाण्याने भिकाऱ्याला कारमध्ये बसवलं
अखेर 17 वर्षांनी याप्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी अनिल सिंह याने त्याच्या कुटुंबीयांसह हा बनाव रचला. रस्ता अपघातात आपला मृत्यू झाल्याचे त्याने भासवले. त्यानंतर एलआयसीच्या विम्याचे पैसे हडप करण्याची त्याची योजना होती. त्यासाठी 2006 साली आरोपी हा त्याचे वडील विजयपाल सिंह आणि भाऊ अभय सिंह, नातेवाईक महिपाल गडरिया आणि राकेश खाटिक यांच्यासोबत आग्राला पोहोचले होते. आग्रा टोलटॅक्सजवळ एका भिकाऱ्याला जेवण देण्याचे बहाणा करून त्याला गाडीत बसवले. त्यानंतर त्याला झोपेची गोळी देण्यात आली आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर त्यांनी भिकाऱ्याला गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवले आणि कार पेटवली. अशाप्रकारे भिकाऱ्याची हत्या केल्यानंतर आरोपींनी अनिल सिंगचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवले.
पोलिसांनी अटक करून तुरूंगात केली रवानगी
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर आरोपीने कागदावर स्वत:लाच मृत दाखवले. त्याच्या कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. आणि त्या इसमाच्या नावे असलेले विम्याचे 80 लाख रुपये कंपनीकडून घेतले. त्यानंतर अनिल सिंगने नाव बदलले आणि राजकुमार नावाने तो अहमदाबादमध्ये राहू लागला. तेथे त्याने ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड यांसारखी कागदपत्रेही बनावट नावाने बनवली गेली. पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करून आग्रा पोलिसांशी संपर्क साधला आहे. आग्रा पोलिस भिकाऱ्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.