Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार


मुंबई :  केंद्राप्रमाणे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महासंघासोबत झालेल्या बैठकीत दिली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली.


राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरील मुद्द्यावर विचार करत असल्याचे सांगितले.

तसेच या बैठकीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० ग्रेड पेची मर्यादा रद्द करण्याबाबत चर्चा झाली. जुनी पेन्शन योजना लागू करा, तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी अधिकारी महासंघाने १४ डिसेंबर रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुख्य सचिवांच्या सोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले.

यानंतर गुरुवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्याची सह्याद्री अतिथीगृहावर विशेष बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले, असे ग. दि. कुलथे यांनी म्हटले आहे.

ग. दि. कुलथे यांनी म्हटले की, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सुबोधकुमार समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासित केल्यानुसार जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह नवीन पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देणे यासर्वांबाबत न्याय देणारा असेल. तसेच महासंघाने पुकारलेल्या १४ डिसेंबरचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले असल्याचे, कुलथे म्हणाले.

दरम्यान, सध्या राज्य शासन सेवेतील वर्ग अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. 
संवर्ग ड च्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. तर सध्या केंद्रीय कर्मचारी, राज्य शासनातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी,  चतुर्थ सेवेतील कर्मचारी, तसेच २५ घटक राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.