रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषांचा असा होतो वापर, 5 दिवस राहते नशा
मुंबई : गेल्या काही वर्षांत अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. तसंच अंमली पदार्थांचं अर्थात ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. आज अनेक तरुण-तरुणी या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. या पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने कारवाई करत असते.
अंमली पदार्थांमध्ये चरस, गांजा, अफूसह काही औषधांचा वापर केला जातो. हे आपण जाणतो. पण सध्या अंमली पदार्थ म्हणून सापाच्या विषाचा वापर केला जात असल्याचं उघडकीस आलं आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी विषारी सापांची पिल्लं आणली जातात. जिभेवर त्यांना दंश करायला लावले जाते. या माध्यमातून नशा चढते. त्यामुळे नशेचा हा नवा स्नेक बाइट अर्थात सर्पदंश ट्रेंड रुजत आहे.
बिग बॉस ओटीटी -2 चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव सध्या एका मोठ्या प्रकरणात अडकला आहे. एल्विश विरुद्ध नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्टीचं आयोजन करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, या रेव्ह पार्ट्यांमध्ये बंदी असलेले साप आणण्यात आले होते तसंच विदेशी तरुणीही या पार्ट्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या.दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. वर्षाच्या शेवटच्या रात्री ड्रग्ज तस्कर जास्त सक्रिय होतात. वर्षाची शेवटची रात्र मादक बनवण्यासाठी तरुणाई रेव्ह पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या ड्रग्जचं सेवन करते. या पार्ट्यांमध्ये अशी ड्रग्ज सेवन केली जातात, ज्यावर कायदेशीर बंदी तर आहेच पण ती अत्यंत धोकादायकही आहेत.यामध्ये सर्पदंश अर्थात स्नेक बाइटचा समावेश आहे. सर्पदंश म्हणजे साप चावल्यानंतर आलेली नशा सर्वात धोकादायक असते. सापच्या एका चाव्यामुळे नशा करणारे दिवसभर नशेच्या मस्तीत राहतात. रेव्ह पार्ट्यांमध्ये सहभागी होणारे बहुतेक लोक सर्पदंशाचा आनंद घेतात, असं सांगितलं जातं. रेव्ह पार्टीत विषारी साप आणले जातात. पार्टीतले लोक नशेसाठी स्वतःला सर्पदंश करून घेतात. यासाठी किंग कोब्राचं पिल्लू किंवा ब्लॅक मांबा सापाचं पिलू पार्टीत आणलं जातं.
नशेसाठी पार्टीतले लोक या सापाला आपल्या जिभेच्या डाव्या बाजूला दंश करायला लावतात. या दंशाची नशा दिवसभर राहते. एक दिवसानंतर नशा हळूहळू कमी होते. परंतु, त्याचा परिणाम संबंधित व्यक्तीवर सुमारे पाच दिवसांपर्यंत राहतो. नशेसाठी सर्पदंश ही गोष्ट नक्कीच जीवघेणी ठरु शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.