Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चमत्कार, गाझातील ढिगाऱ्यात 37 दिवसांनी सापडले जिवंत बाळ

चमत्कार, गाझातील ढिगाऱ्यात 37 दिवसांनी सापडले जिवंत बाळ

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 50 दिवसांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू असून या युद्धात हजारो इमारती, घरे जमीनदोस्त झाली. गाझापट्टीचे अक्षरशः कब्रस्तान झाले. हजारो पॅलेस्टिनी जिवंत गाडले गेले. जे वाचले त्यांना अजूनही चमत्कार घडेल आणि आपले कुणीतरी ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर येईल अशी आशा आहे. हा चमत्कार घडलाही एका बाळाच्या बाबतीत. 37 दिवसांपूर्वी जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखालून या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला साधे खरचटलेलेही नाही. त्यामुळे 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण या बाळाच्या बाबतीत खरी ठरली.

या बाळाला बाहेर काढले तेव्हा ते शांतपणे सगळीकडे नजर फिरवत होते. बचाव पथकातील प्रत्येकाने त्याला छातीशी कवटाळून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याचे चुंबन घेतले. प्रत्येक जण त्याला पाहून भावुक झालेला दिसला. या बाळाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. 'गल्फ न्यूज'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी या बाळाचा जन्म झाला होता. इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या बॉम्बवर्षावात कित्येक घरे जमीनदोस्त झाली. हजारो पॅलेस्टिनी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यात या बाळाचाही समावेश होता.


आणखी 160 ओलीस हमासच्या ताब्यात

हमासने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला करून 240 जणांचे अपहरण केले. त्यापैकी 160 ओलीस अद्याप हमासच्या ताब्यात आहेत. युद्धविरामाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हमासने 12 ओलिसांना सोडले, तर इस्रायलने 30 पॅलेस्टिनींना सोडले. हमासने सोडलेल्या ओलिसांमध्ये 10 इस्रायली नागरिक असून दोघे थायलंडचे आहेत.

युद्धविराम आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू

दोन दिवसांचा युद्धविराम आज बुधवारी संपला, मात्र हमासच्या ताब्यात असलेल्या सर्व ओलिसांची सुटका झालेली नाही. त्यामुळे युद्धविराम आणखी वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांमार्फत सुरू झाले आहेत. मंगळवारी हमासने 12 ओलिसांना सोडले. यात 10 इस्रायली तर दोन थायी नागरिकांचा समावेश होता. अशा प्रकारे हमासने आतापर्यंत एकूण 81 ओलिसांना सोडले आहे. मात्र सर्व ओलिसांना सोडवण्याचा इस्रायलचा प्रयत्न असणार आहे.


9 महिला आणि चिमुरडीला सोडले

युद्धविरामाच्या पाचव्या दिवशी हमासने 9 महिला आणि एका चिमुरडीला सोडले. त्याबदल्यात इस्रायलने 30 पॅलेस्टिनींची सुटका केली. या महिलांपैकी अनेकांचे पती हमासच्या ताब्यात आहेत. दरम्यान, मुलांना गन पॉइंटवर हल्ल्याशी संबंधित व्हिडीओ दाखवल्याचा आरोप सुटका झालेल्या ओलिसांपैकी एकाने केला आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या मुलांपैकी कुणालाही रडण्याची परवानगी नव्हती. जर एखादे मूल रडलेच तर त्याला गोळी घालण्याची धमकी दिली जात होती, असेही सुटका झालेल्या ओलिसाने सांगितले.

तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बाळाला वाचवले

घराच्या ढिगाऱ्याखाली हे बाळ अडकले होते. त्याला बाहेर काढताना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास अथक प्रयत्न केले गेले. बाळाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर बचाव पथकातील प्रत्येकाने आनंदाने बाळाला आपल्या कुशीत घेतले. सर्वांनी देवाचे आभार मानले. बचाव पथकातील नूह अल शघनोबी याने या बाळाचे पह्टो आणि व्हिडीओ व्हायरल केले. त्याच्या कुटुंबाबद्दल मात्र कुठल्याच प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. चारही बाजूंना केवळ मातीचा ढिगारा, श्वासही कोंडलेला अशा स्थितीत हे बाळ तब्बल 37 दिवस ढिगाऱ्याखाली अन्नपाण्यावाचून जिवंत राहिले. हा दैवी चमत्कारच असल्याचे भाव बचाव पथकातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.