डीएसके यांच्या 195 मालमत्तांच्या लिलावास परवानगी द्या
मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा मुंबई येथील न्यायालयात अर्ज पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या 195 स्थावर मालमत्ता जप्त आहेत. या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी मुंबई येथील एमपीआयडी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात केला आहे. सध्याच्या बाजार मूल्यानुसार या सर्व मालमत्तेची किंमत 572 कोटी 12 लाख 95 हजार 60 रुपये आहे.
डीएसके आणि कुटुंबीयांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. सध्या डीएसके आणि पत्नीला जामीन झाला आहे. या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तांपैकी ज्या मालमत्तेवर कोणतीही बॅंक, शासकीय व निमशासकीय संस्था कंपनीची हरकत नाही, अशा मालमत्तेची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच चालू बाजारभावाप्रमाणे या मालमत्तेच्या मूल्याचा तक्ता नोंदणी महानिरीक्षकांकडून तत्कालीन विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
याबाबतची अधिसूचना दोनदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत एकूण 195 मालमत्तांचा समावेश आहे. यादीत असलेल्या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याबाबत तत्कालीन सरकारी वकील यांनी अर्ज केला होता. मात्र, अर्जावर न्यायालयाचा आदेश न झाल्याने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून लिलावाची पुढील कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नवले यांनी या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी मागितली आहे. त्याबाबतचा अर्ज त्यांनी नुकताच न्यायालयात केला आहे. डीएसके यांच्या 195 मलमत्ता जप्त आहे. त्यावर कोणताही बोजा नाही. त्यामुळे त्यांचा लिलाव झाल्यास मोठी रक्कम येणार आहे. त्यातून ठेवीदारांचे पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निकाल होणे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया जलदगतीने व्हावी, अशी ठेवीदारांची अपेक्षा आहे.
– ऍड. चंद्रकांत बिडकर, ठेवीदारांचे वकील
येथील मालमत्तांचा समावेश : बाणेर, बालेवाडी, बावधन, नगर रस्ता, पेरणे फाटा यासह डीएसके यांच्या राज्यात ठिकठिकाणी असलेल्या मालमत्तांचा समावेश जप्तीच्या यादीत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.