Breaking News ! जळगाव मध्ये 10 बालकांना विषबाधा; एकाची प्रकृती चिंताजनक
नांदेड येथील ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेला ७२ तास उलटत नाही तोच जळगावमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय. जळगावातील अमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना विषबाधा झाली आहे. दहा बालकांना संडास आणि उलट्यांचा त्रास होत आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अमळनेरमधील ग्रामीण रुग्णालयात सर्व बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजली पाटील, डॉ. प्रकाश ताडे यांनी या मुलांवर तातडीने उपचार सुरू केले. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना ही घटना कळताच त्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तसेच, बालकांच्या योग्य आरोग्य सेवा देण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी देखील रुग्णालयात जाऊन बालकांची चौकशी केली.
जळगावातील अमळनेर तालुक्यात गांधली गावात ही घटना घडली. ही सर्व मुले दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका मंदिराच्या प्रांगणात खेळत होती. यावेळी एका मुलीने एरंडीच्या बियांसारखा पदार्थ सोबत आणला होता. खेळणाऱ्या मुलांना भूक लागली म्हणून त्यांनी त्या बिया खाल्ल्या.
काहींनी एक दोन बिया तर काहींनी जास्त बिया खाल्या. त्यामुळे सुमारे साडे तीन वाजताच्या सुमारास सर्व मुलांना अचानक संडास आणि उलट्या होऊ लागल्या. पालकांनी घाबरून त्यांना घेऊन तातडीने रुग्णालय गाठले. सुरुवातीला दोन, नंतर पाच, नंतर तीन अशी एकापाठोपाठ दहा बालके उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली.गांधली येथील जोया सुलतान पिंजारी (वय ९), अयान सुलतान पिंजारी (वय ११), अर्जुन सुरेश भिल (वय १०), करण सोमा भिल (वय ९), अक्षरा सुनील भिल (वय १०), नर्गिस सुलतान पिंजारी (वय ३), गोकुळ प्रकाश भिल (वय १२), अश्विनी सुरेश भिल (वय ११), संगीता नारायण संदानशीव (वय १०), किरण अविनाश भिल (वय ११) अशी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांपैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.