ईडीच्या भीतीमुळे अजित पवार भाजपच्या वळचणीला, शरद पवार यांचा आरोप
ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे अजित पवार व त्यांचे सहकारी भाजपच्या वळचणीला गेले. मलाही भाजपसोबत येण्याचा आग्रह त्यांनी केला. तुम्ही आमच्यासोबत या नाहीतर ईडी आमच्या घरी येईल, असे सांगत ही मंडळी भाजपच्या वळचणीला गेली, असा घणाघाती आरोप करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटिरांवर जोरदार हल्ला चढवला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना शरद पवारांनी पक्षांतर्गत घडामोडींबरोबरच महाराष्ट्र तसेच देशातील राजकीय स्थितीबाबत महत्त्वाचे खुलासे केले. राज्य सरकारमध्ये मंत्री होण्याआधी संबंधित आठ नेते माझ्याकडे येऊन गयावया करत होते. आमच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या अडचणीतून तुम्ही मार्ग काढा. आम्ही भाजपला पाठिंबा दिला नाही तर आम्हाला 'ईडी'च्या चौकशीला सामोरे जावे लागेल, असे ते मला सांगत होते. या नेत्यांनी माझी सोबत सोडली. पण, अनिल देशमुख यांच्यासारखे काही नेते तुरुंगात गेले तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोरांबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून पह्डापह्डीच राजकारण करणाऱ्या भाजपला लगावला.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झालेली नसताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काही मंडळी दावा सांगत आहेत. स्वतŠला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेत आहेत. कायद्याला वगळून चुकीच्या मार्गाने पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
70 जणांनी माझी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केलीय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय 70 जणांनी घेतला होता. आज जे माझी निवड बेकायदेशीर असल्याचे बाहेर सांगत आहेत त्याच मंडळींनी त्यावेळी माझ्या निवडीचा प्रस्तावही मांडला होता आणि अुनमोदनही केले होते, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी अजितदादा गटाकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत करण्यात येणारे दावे फेटाळून लावले.
पक्षचिन्ह बदलले तरी लोक बदलत नाहीत
कारस्थाने करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच पक्षचिन्ह बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तुम्ही घाबरू नका. पक्षचिन्ह बदलले तरी लोक बदलत नाहीत, असा माझा अनुभव आहे, असे सांगत पवारांनी त्यांनी बैलगाडी या चिन्हावर लढविलेल्या पहिल्या निवडणूक चिन्हापासून ते घडय़ाळाच्या सध्याच्या चिन्हांपर्यंतचा दाखला देत येणाऱ्या परिस्थितीशी लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.
मोदींची ट्रेन नेहमीच विरोधकांच्या दिशेने
यापूर्वी जेव्हा पंतप्रधान देशाच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी जात असत तेव्हा त्या ठिकाणी ते कधीच राजकीय भाष्य करत नसत. सैनिकांचा किंवा लष्कराचा मुद्दा असेल तर पंतप्रधान त्या ठिकाणी जाऊन भेट देत. त्या ठिकाणी देशाच्या संरक्षणाविषयी बोलत असत. मात्र, आजचे पंतप्रधान जयपूरला जाऊन नवीन रेल्वे लाईनचे उद्घाटन करतात, कार्यक्रम रेल्वेने आयोजित केला आहे, रेल्वे बोर्डाकडून निमंत्रण आहे. तरी देखील पंतप्रधान मोदींची ट्रेन ही विरोधकांच्या दिशेने जाते, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
देशाचा मूड बदलतोय
देशाचा राजकीय मूड सध्या बदलतोय, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारला थेट इशाराच दिला. देशभरात भाजपाविरोधात वातावरण आहे. केरळ, तामीळनाडू, कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, ओडिशा या राज्यांत भाजपचे काय अस्तित्व आहे. भाजप सत्तेत आहे काय, असा सवाल करत आता सगळीच राज्ये आणि एकूणच देश भाजपला सत्तेपासून दूर ठेवू इच्छित आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपने वॉशिंग मशीन चिन्ह घ्यावे
ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत विरोधकांवर अनेक खोटे गुन्हे दाखल करून भाजप पक्ष पह्डण्याचे राजकीय कटकारस्थान करत आहे. भाजपच्या प्रमुख नेत्याने मोठे आरोप केले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिमंडळात सामिल करून घेतले. त्यामुळे भाजपने आता आपले कमळ हे पक्षचिन्ह बदलून वॉशिंग मशीन हे चिन्ह घ्यावे, असा खरमरीत टोला शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
राष्ट्रवादी कुणाची? आज सुनावणी
राष्ट्रवादीतून बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांनी आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत. त्यामुळे पक्ष आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे अशी मागणी करणारी याचिका निवडणूक आयोगापुढे केली आहे. यानंतर निवडणूक आयोगाने पक्षात फूट पडल्याचा निष्कर्ष काढत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटीस बजावून आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही गटांकडून प्रतिज्ञापत्र सादर झाल्यावर निवडणूक आयोगापुढे 6 ऑक्टोबरला प्रत्यक्ष सुनावणीस सुरूवात होणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.